मेथी एग पुलाव
साहित्य: ११/४ वाटी सुरती कोलम तांदूळ (साधारण ३ वाट्या भात तयार होतो), २ चमचे मोड आलेले मेथी दाणे, २ मोठे चमचे ओले खोबरे व १/२ चमचा जिरे वाटून घ्या, १ चमचा धणे-जिरे पावडर, १/२ चमचा गोडा मसाला, २ पाकळ्या बारीक चिरलेला लसूण, १ चमचा मिरपूड, २ मोठे चमचे तेल, २ मोठे चमचे साजूक तूप, १ वाटी बारीक चिरलेली मेथी, १ बारीक चिरलेला कांदा, १ कांदा (उभा चिरून तळलेला), १/४ चमचा साखर, १/२ चमचा हिंग, प्रत्येकी १ तमालपत्र, लवंग, वेलची, चवीप्रमाणे मीठ, २ अंडी फोडून त्यामध्ये मिरपूड घालून, फेटून पारसी पोळा बनवून त्याचे चौकोनी तुकडे करा.
कृती: सुरती कोलम तांदूळ धुऊन अर्धा तास ठेवा. नंतर तांदळाला मीठ, ओले खोबरे-जिरे यांचे वाटण लावा. पॅनमध्ये एक चमचा तेल आणि एक चमचा तूप घाला. त्यावर एक तमालपत्र, एक लवंग, एक वेलची घाला आणि त्यावर कोरडे केलेले तांदूळ घालून नीट परता. नंतर तीन वाट्या गरम पाणी घालून भात मोकळा शिजवा आणि थंड करण्यासाठी परातीत काढून ठेवा.
मोठ्या पॅनमध्ये एक चमचा तेल आणि एक चमचा तूप घाला. आता त्यात बारीक चिरलेला लसूण घालून गुलाबी होईपर्यंत परता. नंतर त्यावर हिंग आणि कांदा घालून परता. कांदा गुलाबी झाल्यावर मोड आलेल्या मेथ्या घाला. त्यावर जिरे आणि खोबऱ्याचे उरलेले वाटण, मिरपूड, धणे-जिरे पावडर आणि गोडा मसाला घालून परता. अर्धी वाटी गरम पाणी घालून झाकण ठेवून वाफ आणा. मेथी दाणे शिजल्यावर त्यात मीठ आणि साखर घाला. शेवटी त्यावर बारीक चिरलेली मेथी घालून परता आणि शिजवलेला भात घालून नीट एकत्र करा आणि वाफ आणा. गॅस बंद करून वरून तळलेला कांदा आणि पारसी पोळा घालून मिक्स करून गरमागरम सर्व्ह करा.
टीप: अंड्याऐवजी पनीरचे पातळ तुकडे शॅलो फ्राय करूनदेखील वापरता येतील.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
मिनौती पाटील