फणसाच्या आठळ्या आणि बेलफळाचे सूप
साहित्य: १ मध्यम आकाराचे बेलफळ, फणसाच्या १० बिया (आठळ्या), १ कप दूध, १ तमालपत्र, १ मध्यम आकाराचा पातीचा कांदा (पातीसकट कापून), १ गाजर कापून, १ टोमॅटो कापून, २ छोटे चमचे हिरव्या सालीच्या मूगडाळीचे भाजलेले पीठ, १ मोठा चमचा लोणी, १ छोटा चमचा आले पेस्ट किंवा लांब काप, ६ कप पाणी, चवीप्रमाणे मीठ व मिरपूड.
कृती: फणसाच्या आठळ्या साल काढून कापून उकडा. त्यानंतर या आठळ्या वाटा. बेलफळ मधोमध फोडा. त्याच्या आतला मगज काढा. हा मगज भांड्यात घेऊन त्यात थोडे पाणी घालून स्मॅश करा. नंतर हाताने कुस्करून गाळा (बिया आणि चोथा बाजूला राहतो). लोण्यामध्ये हिरव्या सालीच्या मूगडाळीचे पीठ व दूध एकत्र करून शिजवा व त्याचा सॉस बनवा. त्यानंतर त्यात वाटलेल्या फणसाच्या आठळ्या घाला आणि पुन्हा एकदा शिजवा.सहा कप पाण्यात तमालपत्र, मिरपूड, आल्याची पेस्ट किंवा लांब काप, कापलेला पातीचा कांदा (पातीसकट), कापलेले गाजर, कापलेला टोमॅटो, मीठ घालून उकळून स्टॉक करा. बेलफळाचा गाळलेला मगज वाफवा. व्हाइट सॉस आणि स्टॉक एकत्र करून उकळवा. वाफवलेले बेलाचे मगज त्यात घाला. पुन्हा थोडे गरम करा. पातीचा कांदा, टोमॅटो आणि गाजराचे तुकडे यांनी सजवा व गरमागरम वाढा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
स्मिता तोरसकर, ठाणे