शिस्त | india army join | join indian army | indian military | command supply discipline program

कवायत आणि शिस्त | ब्रिगे. (नि.) रवींद्र पळसोकर | Drill and Discipline | Brig. (Retd.) Ravindra Palsokar

कवायत आणि शिस्त

संचलनात भाग घेतलेल्या सैनिकांची शिस्त आणि संघटित कवायत लक्षवेधक असते. त्यांचे चमकणारे पोशाख, बूट आणि रायफली समारंभाची शोभा आणखी वाढवत असतात. हे सैनिक जेव्हा प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देतात, तेव्हा प्रेक्षक टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक करतात. पण याच सैनिकांना जेव्हा सराव करताना पाहिले तर त्यांना शिक्षा झाली आहे की काय, असा संभ्रम निर्माण होऊ शकतो. कारण आरडाओरड, मोठ्या आवाजातील आदेश आणि घामाघूम झालेले शरीर… याशिवाय सैनिकांची तयारी होत नाही. काही दिवसांनी हेच जवान ताबारेषेवर गस्त घालतात तेव्हा आवाज होऊ न देता, जड शस्त्रसामग्री पाठीवर घेऊन देशाच्या सीमेचे रक्षण करत असतात. संचलन असो किंवा देशाचे संरक्षण; या दोन्ही प्रकारच्या कामात यशस्वी होण्यासाठी खडतर सराव, कवायत आणि शिस्त लागते. प्रशिक्षणाशिवाय हे गुण अंगी बाणवणे शक्य नाही. सामान्य नागरिकसुद्धा याचे अनुकरण करून आपली क्षमता व कार्यकुशलता वाढवू शकतात. निष्ठा, कर्तव्यपालन आणि वैयक्तिक कौशल्य या गुणांवर सैनिकांची क्षमता आधारित असते.आत्मसात केलेली हीच शिस्त त्यांना पुढे यशस्वी बनवते. नीतिमूल्ये आणि संस्कार घडवण्यासाठी याची आवश्यकता असते. यशस्वीपणे एकत्रित (संघटित) काम पार पाडणे, हा कवायतीचा मुख्य उद्देश असतो. संघटित कामगिरीला सर्वोच्च स्थान देऊनच अशी कारवाई केली जाते, ज्यामुळे संघटनेला खास वेगळे असे व्यक्तित्व प्राप्त होते. सामान्य जीवनातही हे दिसून येते. याचे उदाहरण म्हणजे काही शिक्षणसंस्था, प्रसारमाध्यमे, उद्योग समूह आपापल्या कार्यशैलीसाठी नावाजलेल्या आहेत. संघटना सर्वोच्च आहे, ही भावना रुजली तर संघनिष्ठा, शिस्त, कर्तव्याचे पालन आणि त्याला सक्षम करायला वैयक्तिक कौशल्य यांचे महत्त्व अधोरेखित होते. नमूद केलेले हे गुण सर्वांसाठी आवश्यक असल्याने त्यांचे प्रशिक्षण जितके लवकर सुरू करता येईल तितके ते अधिक उपयुक्त ठरेल. म्हणूनच सैनिकांच्या कवायतीचा उद्देश समजून त्याचे अनुकरण कसे करावे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

निष्ठा असावी याबद्दल दुमत नाही. देश, संघटना, सहकारी आणि घर असा अनुक्रम त्यासाठी लावला जातो. लहान वयात या गोष्टींचे महत्त्व समजणे कठीण असते. शालेय वयापासून ही नीतिमूल्ये शिकवल्यास मुलांवर हे संस्कार घडवण्यास मदत होते. घरातील वडील माणसांपासून, शिक्षक, तसेच नियमांचा आदर करणे आणि शाळेबद्दल अभिमान बाळगणे हे सर्व निष्ठेचेच धडे आहेत. स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिनी होणारे कार्यक्रम निष्ठा वाढवण्यास उपयोगी पडतात.

दुसरा महत्त्वाचा गुण कर्तव्यपालनचा आहे, पण यात अनेक उणिवा दिसून येतात. लहान मुलांना संकल्प समजणे कठीण असले, तरी सर्व घरांत दैनंदिन आयुष्यात नियमितपणाने आपोआप संस्कार रुजवण्याची प्रक्रिया सुरू असते. खरी अडचण आहे, ती समाजाला याची जाणीव करून देण्याची. त्यासाठी शिस्तीचे पालन उपयोगी ठरते. संस्था किंवा उद्यम कुठच्याही प्रकारचा असो; प्रत्येकाची स्वतःची अशी एक कार्यपद्धती ठरलेली असेल, तर काम करणाऱ्यांना कर्तव्यपालन करणे सोपे जाते. प्रत्येक कामासाठी सोपे असो वा अवघड; प्रशिक्षणाची गरज ही असतेच. अपवादाशिवाय नवीन कामाची सुरुवात करण्याआधी आणि मग त्याचा सराव करण्यासाठी किंवा नवीन तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी नियमित प्रशिक्षणाची गरज असते. काही गोष्टी रोज केल्यास कुशलता वाढणे साहजिक आहे. त्यातही प्रशिक्षणाने सुधारणा करता येते. कामाचा भार अधिक असतो किंवा इतर कामे पूर्ण करायची असतात तेव्हा प्रशिक्षणाला डावलले जाते. कवायत आणि शिस्त अशा वेळी उपयोगी ठरतात. कारण, काम सुरू करण्याआधी थोडा वेळ तरी सर्वजण एकत्र आले तर दिवसाचे आदेश, कर्तव्याची उजळणी आणि सामूहिक कारवाई (उदा. राष्ट्रगीत म्हणणे, कामात मदत) योग्य प्रकारे पार पाडली जातील असा अनुभव आहे. लहान वयात म्हणजे अगदी प्राथमिक वर्गांपासून या पद्धतीने मुलांना उत्तेजन मिळाले आणि शिस्तीची सवय लागली, तर असे उपक्रम कार्यान्वित करणे शक्य होऊ शकते. शिक्षा अपवादाने वापरली, तर अधिक परिणामकारक ठरते. वैयक्तिक कर्तव्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने सांभाळली तर देशाला त्याची मदत होईल, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

कवायतीचा मुख्य उद्देश म्हणजे संघटनेला सर्वात अधिक महत्त्व देणे. स्वार्थ मागे ठेवून एकत्रित काम करून संघटनेसाठी झटायचे! सैन्यदलांत संचलन, शारीरिक शिक्षण, खेळ, एकत्र राहणे, जेवणे याकडे अधिकाधिक महत्त्व दिले जाते व आपले व्यक्तिमत्त्व संघटनेत विलीन करून कार्य सफल करणे, हे एकमेव ध्येय असते. लढाईत यशस्वी होण्यासाठी सैनिक पहिले आपले सहकारी, मग तुकडी, सैन्य आणि ध्वज अशी मालिका आत्मसात करतात.भारतीय सैन्यदलाने याचे प्रात्यक्षिक नेहमीच दिले आहे; मग ते युद्ध असो वा आपत्तिकाल! सामान्य जीवनात याचे अनुकरण करणे कठीण नाही, कारण येथेसुद्धा संघटनेला ध्यानात ठेवून कारवाई आणि कार्यक्रमांचे नियोजन केले, तर उद्देश सफल होण्यासाठी आवश्यक असणारे पोषक वातावरण निर्माण करता येते. विविध ठिकाणी सणांच्या किंवा राष्ट्रदिनाच्या निमित्ताने कार्यक्रमांचे नियोजन हे सर्वच प्रशंसनीय आहे, कारण एकजुटीने देशाची प्रगती होते.

अखेरचा मुद्दा वैयक्तिक कौशल्याचा आहे. संघटनेचे सदस्य आपापल्या कामात कुशल असले, तर साहजिकच त्या संघटनेची अथवा गटाची कामगिरी इतरांपेक्षा चांगली असेल. खेळाच्या मैदानात हे प्रामुख्याने उठून दिसते. आपल्या देशात विविध खेळात सहभागी होण्याच्या संधी उपलब्ध आहेत.ठिकठिकाणी कोचिंगसाठी संस्था आहेत, स्पर्धा नियोजित केल्या जातात, सोयीसुविधा वाढत आहेत. वैयक्तिक नैपुण्य वाढवण्यासाठी सराव आणि तज्ज्ञांची मदत आवश्यक असून त्याची उपलब्धता आता वाढली आहे. वैयक्तिक आणि संघटित प्रावीण्य वाढवण्यासाठी तज्ज्ञ सांगतात, मानसिक खंबीरपणा आणि एकाग्रता याशिवाय काहीही साध्य करणे अवघड आहे आणि यातील प्रमाण अनुक्रमे ९० टक्के ते १० टक्के इतके आहे. उच्च दर्जाच्या खेळाडूंसह सर्वसामान्य व्यक्तीलाही हे तितकेच लागू पडते. सारांश, संघटना आणि व्यक्ती यांच्यात सामूहिक हिताला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. यासाठी निष्ठा, कर्तव्य, कौशल्य हे पोषक गुण आहेत. कवायत आणि संघटित कारवाई करून सामान्य जीवनात शिस्त येईल. एक उदाहरण द्योतक आहे. काही दिवसांपूर्वी कामानिमित्त एका शासकीय कार्यालयात गेलो असता तेथे जवळच एका झोपडीवजा इमारतीत अनेक खोल्यांची खासगी शाळा भरलेली पाहिली. आसपासच्या वंचित समाजातील मुलेमुली नीटनेटका गणवेश घालून एकत्र होत होती. घंटा वाजल्यावर खोल्यांतून सर्व विद्यार्थी बाहेर आले आणि ध्वजस्तंभासमोर शिस्तीने उभे राहिले. कुठेही गोंगाट, गोंधळ किंवा आवाज नव्हता. क्षणात शाळेच्या रोजच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. एक-दोन गाणी, मुख्य शिक्षकांचे आदेश आणि राष्ट्रगीत होऊन त्याच शिस्तीने सर्व मुले आपापल्या वर्गात परतली आणि शाळा सुरू झाली. कार्यक्रमाचे नियोजन आणि शिस्त सैनिकांना शोभणारी होती. हे पाहून माझ्यासारख्या माजी सैनिकाच्या डोळ्यांत नकळत पाणी आले व मनात विचार आला, की देशाचे भवितव्य उज्ज्वल आहे!

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


ब्रिगे. (नि.) रवींद्र पळसोकर

(लेखक लष्कराच्या पायदळातील निवृत ब्रिगेडियर आहेत.)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.