यशासाठी सभ्यतेचे नियम
१. क्रेडिट कार्ड ही एक तात्पुरती सोय असते. ही सोय गृहीत धरली आणि पैसे भरण्यात दिरंगाई झाली, तर व्याजाचा बोजा पार द.सा.द.शे. ४५% पर्यंतही वाढू शकतो.
आर्थिक अडचणीच्या काळात क्रेडिट कार्ड वापरणे वेगळे; पण गरज नसताना क्रेडिट कार्ड वापरू नये. अशा पद्धतीने क्रेडिट कार्डचा वापर करणे चुकीचे आहे. उगाच डोक्यावर कर्ज का चढवायचं? मी एवढ्या व्याजदराने कर्ज घेतल्यावर सर्वात आधी ते फेडायचा विचार करेन. म्हणून क्रेडिट कार्डचा वापर अगदी गरजेपुरताच करायला हवा. – वॉरन बफे
२. वर्षाला कमीत कमी एकदा पूर्ण वैद्यकीय तपासणी झालीच पाहिजे, मग तुम्ही कितीही धडधाकट आणि तरुण असा.
३. नकारात्मक विचारांचे टीकाकार, सहकारी, सल्लागार, मित्र टाळा. त्यांच्यामुळे तुमच्या आचार-विचारांवर नकारात्मक परिणाम होतो.
४. कुणावरही पूर्ण विश्वास टाकण्याआधी चाचण्या-चौकशी करून मगच विश्वास टाका, पण १००% नको. १०% तरी हातचे असावेत. माणसे काळानुसार बदलत असतात.
५. रागाच्या भरात कोणतेही कृत्य तडकाफडकी करू नका. एक रात्र मध्ये जाऊ द्या.
६. कोणत्याही कायदेशीर कागदावर तडकाफडकी सही करू नये, पूर्ण वाचल्याशिवाय गरज पडल्यास वकिलाला दाखविल्याशिवाय सही करू नये.अन्यथा नंतर पस्तावण्याची पाळी येते.
७. तुम्ही जपलेली मूल्ये आणि तुमचे काम हातात हात घालून जावयास हवे, नाही तर विरोधाभासातून मानसिक ताणतणाव-नैराश्य येते.
८. प्रत्यक्ष समोर कोणी बोलत असताना फोन अजिबात घेऊ नका, तो समोरच्याचा अपमान असतो. माणूस प्रत्यक्ष समोर असताना त्याला प्राधान्य देणे हे श्रेयस्कर.
९. शिक्षक, पोलीस, अग्निशमन अधिकारी, बँकर्स, पोस्टमन, सरकारी अधिकारी ह्यांच्याशी नेहमी सलोख्याने वागावे, उद्धटपणा-अरेरावी टाळावी.
१०. कर (टॅक्स) सल्लागार उत्तम असा निवडा, त्यावर सढळ हाताने पैसे खर्च करा. दीर्घ मुदतीत तुमच्या ते फायद्याचे ठरते.
११. महागडे ब्रँडेड कपडे, पर्सेस, घड्याळे ह्यांचा शौक असेल तर तो आपल्यापुरता मर्यादित असावा, दुसऱ्याला जळविण्यासाठी त्याचा शो-ऑफ करू नये.
१२. कुठल्याही ट्यूब किंवा बाटलीचे झाकण त्यांचा वापर झाल्यावर पुन्हा लावून ठेवावे.
१३. राजकारणी आणि राजकारणावर वायफळ चर्चा टाळावी, मतदान मात्र १००% करावे.
१४. रागावरील नियंत्रण कधीच सुटू देऊ नये. राग माणसाला बेभान करतो व बेभान माणसे कठीण परिस्थितीत बहुधा हरतात.
१५. उत्पन्नाच्या निदान १०% बचत दरसाल वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवावी.
१६. प्रतिकूल परिस्थितीसारखी संधी नाही. ज्याला प्रतिकूलतेतून अनुकूलता साधता येते तोच खरा यशस्वी होतो.
१७. दर सहा महिन्यांनी कपड्यांचे कपाट लावावे. तीन-चार वर्षे न वापरलेले कपडे दान करावे.
१८. देवाने दिलेले ठणठणीत आरोग्य ही गृहीत धरण्याची गोष्ट नाही. दररोज योग-व्यायाम ह्याला पर्याय नाही. सूर्यनमस्कार, जोर, बैठका, चालणे हा उत्तम व्यायाम आहे.
१९. केवळ विनोदासाठीसुद्धा तिरकस, तिखट, उपहासाने बोलणे योग्य नाही. अशा प्रकारे केलेल्या एखाद्या विनोदामुळे एखादा जुना-चांगला मित्र कायमचा गमावला जाऊ शकतो.
२०. उद्योगधंदा, नोकरी किंवा कुटुंबात सर्वात मौल्यवान बाब म्हणजे ‘विश्वासार्हता’ ही होय. तिला कधीही तडा जाऊ देऊ नका.
२१. स्वप्ने मोठी पाहावीत, पण त्यासाठी आयुष्यातील छोटे छोटे आनंद मात्र गमावून बसू नये.
२२. परत आली नाहीत तरी चालेल अशाच प्रकारातील पुस्तके इतरांना वाचायला द्या. एकदा वाचायला म्हणून दिलेली पुस्तके क्वचितच परत येतात.
२३. अनेक बातम्या ह्या पूर्वग्रहरचित आणि पेरलेल्या असतात, त्यावर १००% विश्वास न ठेवलेला बरा. बातम्या पेरणे हा एक स्वतंत्र धंदा असतो.व्हॉटस्अॅपवरील बातम्या, मजकूर खात्री केल्याशिवाय फॉरवर्ड करणे टाळावे.
२४. आपल्याला बचत करून पेलतील असेच खर्च करावे. ई.एम.आय.च्या ओझ्याखाली शक्यतो येऊ नये, ते महाग पडते.
२५. श्रीमंत शेजाऱ्यांबरोबर, सहकाऱ्यांबरोबर कधीही स्पर्धा करू नका. (इंग्रजीत ह्याला ्यद्गद्गश्चद्बठ्ठद्द ह्वश्च २द्बह्लद्ध ह्लद्धद्ग छ्वश्ठ्ठद्गह्यद्गह्य असे म्हणतात.)अशी स्पर्धा हे दुःखाचे मूळ ठरते, ती घातक आणि निरर्थकही असते.
२६. मिळण्याची खात्री असेल तेव्हाच नोकरीत प्रमोशन मागा. प्रमोशन मागून मिळाले नाही तर तो करिअरचा डेड-एण्ड ठरू शकतो.
२७. इतरांनी तुमच्याशी जसे वागावे असे तुम्हाला वाटते, तसेच तुम्ही इतरांशी वागले पाहिजे. इतरांना कसे करावे हे सांगण्यापेक्षा, काय करावे हे सांगणे चांगले.
२८. नवे मित्र-मैत्रिणी जरूर जोडावेत पण शक्यतो जुन्यांचा विसर पडू देता नये, फक्त त्यांनाच चिकटून मात्र राहू नये, बदलती परिस्थिती सगळेच मान्य करतात असे नाही.
२९. गॅलरीत, खिडकीत पक्ष्यांसाठी दाणे-पाणी ठेवावे. निदान एक तरी झाडाची कुंडी ठेवावी. प्रत्येक वाढदिवशी एक झाड लावावे.
३०. पत्रकार, कलाकार, चित्रकार, गायक, लेखक, संगीतकार ह्यांच्याशी मैत्री जमविण्याची संधी दवडू नये, ह्यामुळे आपले अनुभवविश्व अधिक खुलते.
३१. अंडरवल्र्ड, गुन्हेगारी, हिंसा दाखविणारे चित्रपट, मालिका, पुस्तके मनावर वाईट परिणाम घडवतात, तुम्हाला भित्रे बनवितात. त्यांच्यापासून शक्यतो दूर राहावे.
३२. तुमची मूल्यव्यवस्था, आदर्श, विवेकबुद्धी ही तुमची असते, दुसऱ्याने त्याचा अवलंब करावा अशी अपेक्षा बहुधा फोल ठरते. ती करू नये.
३३. आई-वडिलांची एकमेकांशी पहिली भेट, त्यांचा विवाह, त्यानंतरचे पहिले वर्ष आणि तुमचा जन्म, ह्याविषयीचे छाया-ध्वनिमुद्रण करून ठेवा.भविष्यात तो एक अमूल्य ठेवा ठरू शकतो.
३४. पौर्णिमेच्या रात्री निरभ्र आकाशाकडे पाहून जमिनीवर पडून राहा. आकाशातील चंद्र-तारे-ग्रह-नक्षत्रे-आकाशगंगा पाहून आपली पृथ्वी, देश, शहर आणि आपण किती नगण्य आहोत हे कळते. गर्वहरण होते.
३५. एका रात्रीत यश देणारी रात्र उजाडायला काही हजार रात्रींचे परिश्रम लागतात. यश एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात येते, इतकेच.
३६. स्क्रू ड्रायव्हर, पाने, पकड, वंगणे, कात्री, फूटपट्टी, सेलो टेप अशा गोष्टींची जागा ठरलेली असावी, अन्यथा ऐनवेळी त्या मिळत नाहीत.
३७. एका मर्यादेपलीकडे पैसा आनंद देऊ शकत नाही, उलट कधीकधी जटिल प्रश्न उभे करतो.
३८. जेव्हा नाही म्हणायचे असेल तेव्हा ठामपणे ‘नाही’ म्हणायला शिका. भीड भिकेची बहीण म्हणतात ते उगाच नाही.
३९. मनःशांती, आरोग्य आणि सुहृदांचे प्रेम ही सुखी जीवनाची त्रिसूत्री आहे. तिची जपणूक करणे ही तुमची आद्य जबाबदारी आहे.
४०. कुणी कधी घरी जेवायला बोलावले असल्यास, जेवण पुरे होण्याआधी पक्वान्नांची तोंडभरून स्तुती करा.
४१. ‘वेळच होत नाही’ ही एक तद्दन खोटी सबब आहे. तुम्हाला जितका वेळ उपलब्ध असतो, तितकाच वेळ देशाच्या पंतप्रधानांनाही असतो, ते देश चालवतात.
४२. सुरक्षाकवचाइतके असुरक्षित काहीच असू शकत नाही. अशा कवचात आपण सडून-गंजून जाऊ शकतो. असुरक्षितता आपल्याला कायम सजग ठेवते. आपल्यातील नावीन्यात-धैर्यात सातत्य आणि चैतन्य कायम ठेवते.
४३. आपण शहाणपण दाखवून नमते-पडते घेतल्यास कालांतराने आपली बाजू अधिक मजबूत होते.
४४. टी.व्ही., मोबाईल बंद ठेवून आठवड्यात निदान एक तास फक्त नवरा-बायकोच्या सुखसंवादासाठी राखून ठेवावा.
४५. आपण कमावलेल्या साधन-संपत्तीचा आनंद घेण्यासाठी आयुष्यातील काही वर्षे हातची बाकी ठेवा.
४६. दूरस्थ आई-वडील, मुले-बाळे ह्यांच्या सतत संपर्कात राहा.
४७. मोबाईल फोनच्या वापराचे वेळापत्रक करा. वापरावर स्वयंनिर्बंध घाला आणि त्याचे काटेकोरपणे पालन करा.
४८. मित्र, सहकारी, नातेवाईक ह्यांच्या विनंतीला फशी पडून भिडेखातर पैशाची गुंतवणूक-विमा पॉलिसी इ. काहीही कधीही घेऊ नका.
४९. पैशाच्या पाकिटात हजारभर रुपये दडवून ठेवावेत, अडचणीच्या वेळी कामास येतात.
५०. आज अंडी चोरणारा उद्या कोंबडी चोरणार. अंडीचोरांना वेळीच पायबंद घाला. दया दाखवू नका, नाहीतर पस्तवाल.
५१. स्तुती करणाऱ्या किंवा दया दाखविणाऱ्यांपासून नेहमी सावध राहा. ते ‘हिडन अजेंडा’ बाळगून असतात.
५२. अनेकदा ‘मौन’ हे अनेक नाजूक, जटिल प्रश्नांसाठी उत्तम उत्तर ठरते.
५३. स्वतःची सगळी व्यक्तिगत कामे स्वतःच नियमितपणे करावी. जर्मनीत हा नियम काटेकोरपणे पाळला जातो.
५४. कोणत्याही प्रकारचा सट्टा, जुगार आयुष्यात कधीही खेळू नये.
५५. मृत्यू आणि (वकिलाच्या सल्ल्याने केलेले) मृत्युपत्र ह्या गोष्टी अटळ आहेत, त्या टाळण्याचा प्रयत्न करू नका. हे योग्य प्रकारे न केल्यास तुमच्या वारसांना ते खूप त्रासदायक ठरू शकते.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
जयराज साळगावकर
(लेखक अर्थतज्ज्ञ व साहित्यिक आहेत.)