फक्त दहा पत्ते!
पाच-तीन-दोन हा पत्त्यांमधला तसा साधासोपा खेळ. पत्त्यांचा हा खेळ आपल्यापैकी प्रत्येक जण कधी ना कधी खेळलेला असेलच. तीन जणांमध्ये तीस पत्ते वाटून रंगत जाणाऱ्या या खेळात प्रत्येक खेळाडूला पाच, तीन किंवा दोन हात करायचे असतात. टाइमपास म्हणून जरी हा खेळ खेळला जात असेल, तरी आयुष्यातील काही महत्त्वाचे धडे हा खेळ शिकवून जातो, हे लक्षात घ्यायला हवे.
पाच हात करणारा खेळाडू हुकूम सांगतो/ठरवतो. डावाच्या सुरुवातीला हातात येणारे पहिले पाच पत्ते पाहून हा हुकूम त्याने सांगायचा असतो. वाटते तेवढी ही गोष्ट अजिबात सोपी नाही, कारण अनिश्चित परिस्थितीत घेतलेला तो निर्णय असतो. एक म्हणजे, हुकूम ठरविण्यासाठी अत्यंत कमी पर्याय असतात. दुसरे म्हणजे, हातात येणाऱ्या नंतरच्या पाच पत्त्यांवर तुमचा हा हुकूम फळणार की नाही, ते ठरणार असते. इथे मिळतो आयुष्यातील पहिला धडा – तुमचे पत्ते पाहून तुम्ही कितीही खूश झाला असाल किंवा तुमचा अपेक्षाभंग झालेला असला, तरी लगेचच तसे दाखवायचे नसते. आयुष्यातही काही प्रसंग असे येतात, जेव्हा आपले सगळे पत्ते उघड करायचे नसतात. अशा प्रसंगी थोडे थांबा. कोणतीही प्रतिक्रिया देण्यावर तुमची ऊर्जा खर्च करण्याऐवजी त्या प्रसंगावर लक्ष केंद्रित करा.
हातात वाईट पत्ते येणे, हा नशिबाचा भाग असतो. पण त्या पत्त्यांनी तुम्ही कसे खेळता, हा तुमच्या कौशल्याचा व तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा भाग असतो. हा आहे या खेळातून मिळणारा दुसरा धडा! तुमच्या निवडीचे महत्त्व समजून घ्या आणि इतर खेळाडू कसे खेळत आहेत, यावर लक्ष ठेवा. फक्त हातातल्या पत्त्यांवर विसंबून राहू नका. असे केल्याने तुमच्याकडील स्रोतांचा योग्य वापर तुम्हाला करता येईल आणि हातातल्या पत्त्यांनी डाव जिंकण्याची शक्यता वाढेल.
साध्या पत्त्याच्या खेळाचे हे खूपच गंभीर रूप वाटत आहे का? खरे तर या साध्याशा खेळाला लहान मुलांचा खेळ समजण्याची चूक करू नका. यात किती खोल मथितार्थ दडला आहे, हे लक्षात घेतले तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. या खेळातील प्रत्येक टप्प्यावर आयुष्यातील महत्त्वाचे धडे आपल्याला मिळत राहतात. उदा. डाव जिंकल्यावर तुमचे वर्तन कसे असावे? दुसऱ्या खेळाडूच्या कमनशीबावर किंवा चुकांवर तुम्ही आनंद साजरा करणे किंवा छद्मीपणाने हसणे आणि खुश होणे कितपत योग्य आहे? हाच तुमचा धडा क्रमांक ३ – तुमच्या यशाचा आनंद घ्या! तुमचे नशीब तुमच्या बाजूने होते आणि तुम्ही आपले कौशल्य अचूक वापरले याबद्दल खूश व्हा, पण त्या जिंकण्यात थोडी सुसंस्कृतता/सभ्यता असू दे. प्रतिस्पध्र्याची थट्टा केल्याने तुम्ही त्याचा आत्मसन्मान दुखावता. यामुळे प्रतिस्पर्धी तुमच्या विजयात सहभागी होत नाही.
पाच-तीन-दोनच्या या खेळातून कर्जाचे व्यवहार कसे हाताळायचे, हेही शिकता येते. गरजेपेक्षा जास्त हात तुम्ही केले म्हणजे दुसऱ्या खेळाडूचे कमी हात झाले, असा अर्थ होतो. पुढच्या फेरीत तुम्ही त्या खेळाडूकडून हे हात मागता. काही वेळा हा प्रतिस्पर्धी या हातांच्या कर्जविळख्यात अडकत जातो. ही परिस्थिती तुम्ही कशी हाताळता यातूनही आयुष्यातील एक धडा शिकायला मिळतो. हाच धडा क्र. ४ – तुम्ही उत्तम परिस्थितीत असाल आणि दुसरी व्यक्ती कर्जात बुडाली असेल, तर काही वेळा मिळणारा लाभ तुम्ही सोडून देऊ शकता. दुसऱ्याचे थोडे कर्ज तुम्ही माफ केल्याने समोरच्या व्यक्तीला पुन्हा उभे राहण्याची संधी मिळू शकते. तुम्हाला योग्य वाटले, तर काही अंशी असे कर्ज माफ करावे. पण समोरच्या व्यक्तीकडे वाईट पत्ते असूनही ती व्यक्ती निष्काळजीपणे, विचार न करता खेळत असेल तर तसे नमूद करायला विसरू नका. महत्त्वाचे म्हणजे आपले चांगले चालले आहे म्हणून आत्मसंतुष्ट होणे टाळायला पाहिजे, ही शिकवणसुद्धा यातून घ्यायला हवी!
तुमचे कर्ज परत घेण्याचा मार्गही सन्मानाचा असू दे. उदा. समोरच्या खेळाडूने तुमचे हात द्यायचे कबूल केले असेल, तर त्याचा हात झाल्या झाल्या लगेचच ओढून घेऊ नका. ती व्यक्ती तुम्हाला हात परत करण्याची वाट पाहा. हाच आहे, पुढचा धडा क्र. ५ – तुमच्या देण्याची जाणीव असलेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवा. समोरची व्यक्ती कर्ज विसरली असेल किंवा परतफेड टाळत असेल, तरच त्याची मागणी करावी.
समोरच्या खेळाडूने परिस्थिती चांगली असल्यामुळे तुमचे कर्ज माफ केले, तरी या ठिकाणी एक महत्त्वाचा धडा शिकायला हवा. धडा क्र. ६ – चेहरा दुःखी करून डोळ्यांमध्ये करुणा आणली, तर कुणीतरी तुमचे कर्ज माफ करेल, असे गृहीत धरून कधीही खेळू नका. दुसऱ्याच्या मदतीवर वा सहानुभूतीवर अवलंबून न राहता प्रामाणिकपणे आणि विचारपूर्वक खेळा. तुमच्या आयुष्याला यामुळे वेगळे वळण मिळू शकते.
या खेळात पराभवाशी संबंधित धड्यांचे काय? तुम्ही पराभव खिलाडू वृत्तीने स्वीकारता की चिडून? तुम्ही खट्टू होता, चिडचिड करता की समोरच्याबद्दल द्वेष वाटून खेळाचा आनंद घेणेच थांबवता? याहूनही वाईट म्हणजे तुम्ही फसवणूक करता किंवा दुसऱ्या खेळाडूंना वा नशिबाला दोष देता की पत्ते फेकून देऊन तिथून निघून जाता? पराभव कसा स्वीकारायचा हा सातवा धडा यातून शिकायला हवा- तुमच्याकडे जे आहे, भले ते तुमच्या अपेक्षेनुसार वा इच्छेनुसार नसले; तरी त्याचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करा. असे म्हणतात, की आयुष्याने तुम्हाला लिंबं दिली, तर त्याचे सरबत करा. हे विधान इथे चपखल बसते! इतरांच्या चांगल्या नशिबाचा आनंद घेण्यातही आनंद असतो. एकदा तुमचा यावर विश्वास बसला आणि तसे जगू लागलात, तर रोजच्या जगण्यात असुरक्षितता व द्वेषाचा लवलेशही राहणार नाही.
पाच-तीन-दोन या खेळातील आपल्या आयुष्याशी संबंधित शेवटचा धडा क्र. ८ – समरसून जगा, मजा करा, हसतखेळत राहा, स्वतःचीही मस्करी करा.हारजीत हे दोन्ही आयुष्याचे घटक आहेत. ते येतात आणि जातात. त्यामुळे जीवनाचा आनंद घ्या आणि दुसऱ्या खेळाडूंसोबतही आनंदाने राहा. हे खेळाडू जे तुमचे आयुष्यभरासाठीचे सोबती आहेत, मौल्यवान अशी ही ठेव आहे त्यांची कदर करा!
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
गौरी डांगे
(गौरी डांगे ह्या अनुभवी कौन्सिलर व लेखिका आहेत.)