बेक्ड सुरण फलाफल विथ बीटरूट हमस
बीटरूट हमससाठी साहित्य:
१ बीट, १/२ कप काबुली चणे (रात्रभर भिजवलेले), १ ग्लास पाणी, ३/४ छोटा चमचा मीठ, ११/२ छोटा चमचा तीळ, १ छोटा चमचा लसूण, २ छोटे चमचे ऑलिव्ह ऑइल, १/४ छोटा चमचा काळी मिरी पावडर, १ मध्यम आकाराच्या लिंबाचा रस.
कृती: प्रथम बीट स्वच्छ धुऊन त्याची साले काढा. बीट बारीक चिरून कुकरमध्ये शिजवा. भिजवलेल्या काबुली चण्यांमध्ये मीठ व पाणी घालून कुकरमध्ये पाच ते सहा शिट्या येईपर्यंत मऊ शिजवा. शिजवलेले बीट व काबुली चणे थंड होऊ द्या. एक-दोन मिनिटांसाठी तीळ भाजा. मिञ्चसरच्या भांड्यात प्रथम तीळ व ऑलिव्ह ऑइल वाटून ताहिनी पेस्ट तयार करा. नंतर त्यात बीट, काबुली चणे, लसूण, काळी मिरी पावडर, लिंबू रस घालून बारीक पेस्ट करा. बीटरूट हमस तयार आहे.
टीप: मिञ्चसरमध्ये हमस वाटताना कोरडे असेल तर छोले किंवा बीट शिजवल्यावर उरलेले पाणी यासाठी वापरू शकता.
सुरण टार्ट्ससाठी साहित्य:
२ कप गव्हाचे पीठ, १ कप सुरण (साले काढून बारीक चिरलेला), २ छोटे चमचे कलोंजी, १ छोटा चमचा बेकिंग पावडर, २-३ छोटे चमचे तूप, ३-४ छोटे चमचे दही, चवीनुसार मीठ, १/४ छोटा चमचा काळी मिरी पावडर, पाणी आवश्यकतेनुसार, थोडेसे ऑलिव्ह ऑइल.
कृती: प्रथम सुरणाचे बारीक तुकडे शिजवा व मिञ्चसरमध्ये त्याची पेस्ट करा. एका पातेल्यात गव्हाचे पीठ घेऊन त्यात तूप गरम करून घाला. नंतर त्यात मीठ, काळी मिरी पावडर, बेकिंग पावडर, दही, कलोंजी आणि सुरणाची पेस्ट घालून घट्ट पीठ मळा. आवश्यक असल्यास पाणी वापरा. अर्धा तास पीठ भिजू द्या. ओव्हन १८०० पर्यंत गरम करा. थोड्याशा ऑलिव्ह ऑइलने सहा मिनी टार्ट मोल्ड (सात सेमी व्यासाचे) ब्रश करा. पीठ या मोल्डमध्ये पसरवा आणि कुरकुरीत किंवा हलके सोनेरी होईपर्यंत वीस-पंचवीस मिनिटे बेक करा.
सोनेरी टार्ट ओव्हनमधून काढा आणि पूर्णपणे थंड होऊ द्या. आता बीट हमस टार्टमध्ये भरा आणि सर्व्ह करा.
टीप: सुरण कापताना हाताला थोडे मीठ व तेल चोळा. त्यामुळे हाताला खाज सुटणार नाही. सुरण शिजवताना त्यात एक छोटा चमचा लिंबाचा रस घाला, याने घसा खवखवणार नाही.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
असिफा जमादार, बेळगांव