उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म!’
हल्ली वेळेची व कष्टांची बचत करण्याच्या हेतूने दोन-चार दिवस पुरेल इतके अन्नपदार्थ एकदाच शिजवून ते फ्रीजमध्ये भरून ठेवले जातात आणि आयत्या वेळी गरम करून खाल्ले जातात. मात्र वरचेवर अन्न गरम करून खाण्यामुळे तसेच फ्रीजमधील अन्नपदार्थ सेवन करण्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, हे लक्षात घ्यायला हवे.
आयुर्वेद शास्त्राने अन्न शक्यतो ताजे-गरम घ्यावे असे सांगितले आहे. ताजे गरम अन्न रुचकर लागते, पचनशक्तीचे वर्धन करते. एवढेच नाही, तर यामुळे पचन सुलभ होते. वातानुलोमन झाल्याने गॅसेसचा त्रास होत नाही. शिळ्या अन्नपदार्थांच्या सेवनाने किंवा पदार्थ वारंवार गरम केल्याने त्यातील पोषणमूल्य कमी होते. असे अन्न अग्निविकृती निर्माण करते. अशा अन्नपदार्थांच्या सेवनाने अजीर्ण, आम्लपित्त इ. विविध रोगांना आमंत्रण मिळते.
हल्ली कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र जेवण घेण्याची पद्धत लोप पावत चालली आहे किंवा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या जेवणाच्या वेळा एकच असतात असे नाही. अशा वेळी फ्रीजमध्ये अन्नपदार्थ ठेवून ते वाढून घेताना वारंवार गरम केले जातात. अन्न पुन्हापुन्हा गरम करण्याने अन्नामधील पोषकांश नष्ट होतात, तसेच ते बेचव होते. अतिउष्णतेने पदार्थातील पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे विशेषतः ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्त्वांचा नाश होतो. गाजर, बीट तसेच पालकासारख्या लोह आणि नायट्रेटयुक्त हिरव्या पालेभाज्या वरचेवर गरम केल्यास त्यातील नायट्रेटचे रूपांतर नायट्राईटस्मध्ये होते. त्या परत परत गरम केल्यास त्यातील शरीरास उपकारक असे ल्युटिन कमी होऊन त्यांचे पोषणमूल्य कमी होते.
हल्ली तर अन्नपदार्थ गरम करण्या-साठी मायक्रोवेव्हचा वापर केला जातो. काही शास्त्रीय शोधनिबंधात, मायक्रोवेव्हमध्ये अन्नपदार्थ अतिउच्च तापमानाला तापविल्यास अॅक्लिरामाईड-सारखे कार्सिनोजेनिक (कर्करोगास कारणीभूत ठरणारे) द्रव्य निर्माण होते, असे निरीक्षण नोंदविले आहे. मायक्रोवेव्हमध्ये कमी तापमानाला कमी काळ अन्न गरम केल्यास अॅक्लिरामाईडची निर्मिती मंदावते. परंतु आजच्या धावपळीच्या जगात दुपारी व रात्री ताजे जेवण बनवणे किंवा प्रत्येक वेळी ताजे अन्नपदार्थ शिजवून खाणे शक्य नाही. यामुळे सकाळी एकदाच बनवून ठेवलेले/फ्रीजमध्ये साठवून ठेवलेले पदार्थ गरम करून सेवन केले जातात. सतत असे पदार्थ गरम करून निर्माण होणाऱ्या अग्निविकृतीचा धोका टाळण्यासाठी अन्न गरम करताना शक्यतो आवश्यक तेवढेच अन्न काढून गरम करून घ्यावे. जेणेकरून अन्नाचे पोषणमूल्य कमी होणार नाही.
फ्रीज ही आपल्या दैनंदिन जीवनातील गरजेची गोष्ट झाली आहे. अन्नपदार्थांतील रासायनिक प्रक्रिया या कमी तापमानाला अतिशय धीम्या गतीने होतात. त्याचप्रमाणे सूक्ष्म जीवाणूंची वाढही कमी तापमानाला अतिशय मंद गतीने होते. परंतु फ्रीजमध्ये अन्न ठेवत असताना त्याचा वापर योग्य पद्धतीने करणे महत्त्वाचे आहे. फ्रीजचे तापमान ४ अंश सेल्सिअस व त्यापेक्षा कमी असावे लागते. त्यामुळे अन्नपदार्थ फ्रीजमध्ये ठेवताना त्याचे तापमान योग्य आहे का नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे. सतत फ्रीजची उघडझाप होत असल्यास आतील तापमानाचे योग्य नियंत्रण होत नाही. परिणामी, अन्न संरक्षण व्यवस्थित होत नाही. फ्रीजमधून पदार्थ आवश्यक तेवढ्याच मात्रेत बाहेर काढावा व गरम करावा. फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ बाहेर काढून गरम करताना त्याचे तापमान रूम टेंपरेचरपर्यंत (सामान्य) आल्यावरच गरम करावेत. तसेच फ्रीजमध्ये पदार्थ ठेवताना गरम असू नयेत, कारण तापमान नियंत्रणातील असंतुलनामुळे त्यात सूक्ष्म जंतूंची वाढ होते व अन्न लवकर खराब होते.
प्रथिनयुक्त अन्नपदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असते. म्हणून फ्रीजमध्ये ते नेहमी वरच्या कप्प्यातच ठेवावेत. फ्रीजमध्ये भाज्या आणि फळे स्वतंत्र कप्प्यात ठेवावीत. कारण फळे पिकताना बाहेर पडणाऱ्या इथिलीन वायूमुळे भाज्या लवकर खराब होतात. मांसाहार शक्यतो ४ ते ५ अंश सेल्सिअसला ठेवावा. कच्च्या स्वरूपातील मांसाहार, ताजे मासे २-३ दिवसांपेक्षा जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवू नयेत. इतर अन्नपदार्थांना वास लागू नये म्हणून मांसजन्य पदार्थ झाकण असलेल्या डब्यात ठेवावेत. शिजवलेले मांस, चिकन, मटण, मासे शक्यतो ३-४ दिवसांपेक्षा अधिक काळ फ्रीजमध्ये ठेवू नयेत.
३-४ दिवसांपेक्षा अधिक काळ अन्नपदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यात (अन्नपदार्थाची चव, वास यात बदल न होता) अनारोग्यास कारणीभूत होणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंची वाढ होते. फ्रीजमध्ये थंड तापमानात असल्यामुळे पदार्थाची चव, वास न बदलल्याने पदार्थ खराब झालेले कळत नाहीत. अशा अन्नाचे सेवन केल्याने विषबाधा होऊ शकते. पाण्याचा वापर करतानाही पाणी शक्यतो एकदाच उकळवून ठेवावे. पिण्यासाठी कोमट पाणी हवे असल्यास ते थर्मासमध्ये भरून ठेवावे.
थोडक्यात, पूर्णब्रह्म अशा अन्नाचे सेवन करताना ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म!’ ही उक्ती आपण प्रत्येकाने कृतीत उतरवणे आवश्यक आहे.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
डॉ. सदानंद सरदेशमुख
(लेखक आयुर्वेद पीएच.डी. आहेत.)