‘ए-२’ तुपाच्या नावाखाली
भारतीय आहारात तुपाला सुपरफूड मानले जाते. त्यातच आता ‘ए-२’ तूप, ‘बिलोना तूप’ असे तुपाचे काही नवीन प्रकार बाजारात आलेले पाहायला मिळतात. मेंदूचे व पचन संस्थेचे कार्य, मानसिक आरोग्य, हृदय व डोळ्यांसाठीही ‘ए-२’ तूप हितकारक असल्याचे म्हटले जाते. या तुपाला येत असलेली मागणी पाहता ‘ए-२’ तूप म्हणजे नेमके काय हे समजून घ्यायला हवे.
‘ए-२’ तूप हे देशी गाईच्या दुधापासून बनवलेले असते व या तुपाच्या पॅकवर तसा उल्लेख केलेला असतो. तर ज्या तुपावर ‘ए-२’ असे लिहिलेले नसते, ते तूप जर्सी गाय किंवा म्हशीच्या दुधापासून बनवलेले असते. ‘ए-१’ आणि ‘ए-२’ हे विशिष्ट प्रकारचे polypeptide (प्रथिने) असतात, जे ‘ए-१’ / ‘ए-२’ दुधात आढळतात. ‘ए-१’ दूध पिऊन मधुमेह, हृदयाचे विकार वाढतात असे वादग्रस्त आणि अजूनही शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध न झालेले दावे ‘ए-२’ दुधाचे विक्रेते करत असतात. याच्याही पुढे जाऊन तुपाचा विचार करायचा झाल्यास, कढवलेले तूप म्हणजे निव्वळ फॅट (मेद / चरबी) असतात, तर त्यात ‘ए-१’ किंवा ‘ए-२’ ही प्रथिने असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
जेव्हा लोणी कढवून त्याचे तूप बनवले जाते, तेव्हा त्यातील प्रथिने (casein) हे बेरी बनून तळाला चिकटतात, तर वर तरंगणारा थर अर्थातच तूप (केवळ फॅट) असते. जर तुपात अजिबात प्रथिने नसतात, तर मग त्यात ‘ए-१’ / ‘ए-२’ Peptide / Protein हे घटक असण्याचा संबंधच येत नाही. तर मग प्रथिने नसलेल्या ‘ए-२’ तुपाच्या कपोलकल्पित गुणांसाठी चौपट किंमत देऊन हे तूप का खरेदी करायचे, हा प्रश्न साहजिकच उभा राहतो.
खरेतर, घरी सायीला विरजण लावून त्यापासून लोणी काढून कढवलेले तूप अधिक हितकारक असते; मग ते गाईचे असो वा म्हशीचे. पण घरी न बनवता जर तूप बाजारातून विकत आणायचे असेल तर ‘ए-१’ / ‘ए-२’ च्या पर्यायांपेक्षा या तुपाची चव घरच्या तुपासारखी आहे का ते बघा. हे तूप विरजण लावून काढलेल्या लोण्यापासून बनवलेले आहे की नाही, हे तपासणे अधिक श्रेयस्कर. आणि हो, तूप जरी कितीही घरचे उत्कृष्ट दर्जाचे असले तरी दिवसातून दोन चमच्याहून अधिक खाऊ नका म्हणजे मधुमेह किंवा हृदयाचे विकार तुमच्या जवळ येणार नाहीत !
बद्री गाय च तुप हा विषय घ्या…. महाराष्ट्रात खूप कमी लोकांना या गाई च्या तूपा बद्दल माहीत आहे