विकास आणि प्रगती
साधारण २०००च्या आसपास विश्व बँकेकडून आयोजित विदेशातील एका विकासावरच्या कार्यशाळेत मी भारताचा प्रतिनिधी म्हणून सहभागी झालो होतो. दोन दिवसांच्या या कार्यशाळेत राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न, आर्थिक विकासदर, राहणीमान, रोजगार, आवास, आहार आणि कॅलरीज अशा अनेक विषयांची चर्चा झाली आणि काय केले तर विकास होऊ शकतो याचेही धडे देण्यात आले. ती सर्व व्याख्याने, स्लाइड शो आणि सादरीकरण ऐकताना मला काहीतरी अपूर्ण आहे; ही चर्चा सर्वंकष पद्धतीने विषय हाताळत नाही आणि सांगणारे सगळे गोरे लोक असले तरी ते सांगतात ते सगळेच काही पटत नाही, असे आतून जाणवत होते.
कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात माझ्या मनातील शंका मी विचारली, या सगळ्या विकासाच्या आराखड्यात माणसाचा आनंद, सामाजिक सौहार्द, शांती आणि सर्वंकष कल्याणाला काही स्थान आहे की नाही? माझ्या प्रश्नाला मिळालेले उत्तर मला स्पष्ट आठवते. ‘‘विकासाच्या संकल्पनेत येणारे निकष संख्यात्मक (Quantifiable) असले पाहिजेत. उदा. उत्पन्नात वाढ, रस्ते, वीज यांची उपलब्धता, आहारातील पोषणमूल्य वगैरे. यात समाजातील सौहार्द, व्यक्तीचे चारित्र्य, मूल्यांचा सन्मान किंवा मानवी कल्याण यांसारख्या गुणात्मक (Abstract, Non Quantifiable) गोष्टींना स्थान नाही. थोडक्यात विकास म्हणजे आर्थिक विकास आणि राहणीमानातील बदल यासाठीचे प्रयत्न.’’
आज दुसऱ्या महायुद्धानंतर साधारण साडेसात दशकांनंतर विकास संकल्पनेने जगाचा विकास केला, की विनाशाच्या रस्त्यावर आणून सोडले याचा विचार करणे आवश्यक आहे. विकास आणि प्रगती यांची आपण गल्लत केली आहे का? आणि खरोखरच विकासातून जगाची प्रगती झाली असून जगात सुबत्ता, संपन्नता आली आहे का, याचा गंभीरपणे आणि तटस्थ राहून विचार करणे आवश्यक आहे.
दुसऱ्या महायुद्धानंतर भांडवलशाही आणि समाजवाद अशा दोन विचारधारांवर जग विभागले गेले. पहिल्या वर्गात अमेरिका आणि युरोप यांच्याबरोबरचे देश तर दुसऱ्या वर्गाचे नेतृत्व रशियाकडे येऊन त्यात पूर्व युरोप, आशिया व आफ्रिकेतील काही देश यांचा समावेश झाला. एका बाजूला भांडवलशाही दुसऱ्या बाजूला समाजवाद/साम्यवाद यातील राजकीय स्पर्धेतून शीतयुद्ध सुरू झाले, ते नव्वदीनंतर सोव्हिएत राष्ट्रसंघ कोसळल्यावर संपले. अमेरिकाप्रणीत भांडवलशाही म्हणजे लोकशाही, म्हणजेच विकास असा विचार जगभर पसरवण्यात आला.
पण या विचारसरणीने एका बाजूला जगभर अभूतपूर्व भौतिक (आर्थिक) संपन्नता आणली आणि दुसरीकडे आपल्या या वसुंधरेच्या विनाशाची शक्यताही जवळ आणली. भांडवलशाही ही आर्थिक संकल्पना असून लोकशाही हा समाजाच्या आणि देशाच्या सर्वांगीण (आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक प्रगतीचा, तसेच स्वातंत्र्य, समता व न्याय या मूल्यांवर आधारित) उत्थानाचा मार्ग आहे. या दोन्हींमधला फरक समजून घेण्यात आपण अयशस्वी ठरलो. आजच्या घडीला जगभर असणाऱ्या आणि स्थानिक पातळीवरही वारंवार अनुभवाव्या लागणाऱ्या अनेक दुर्दैवी घटना आणि प्रवाह यांच्यामागे भांडवलशाही आणि लोकशाही तसेच विकास आणि प्रगती या संकल्पना समजून घेण्यात आपण सर्वांनी केलेल्या गफलती कारणीभूत आहेत. आज दिल्लीमध्ये पाऊस नाही, पण पूर आला आहे. चीन आणि अमेरिका शत्रू राष्ट्रे बनून समोरासमोर उभे आहेत. भारतापुरते बोलायचे झाले तर आपल्या हिमालयात प्रचंड भूस्खलने होत आहेत, नद्या प्रदूषित झाल्या आहेत, शहरी भागात झोपड्या वाढल्या आहेत. सुविधांवर प्रचंड दबाव आला आहे. परिघावरचे अनेक समुदाय उदा. भटक्या व विमुक्त समूहातील लोक, छोटे शेतकरी, स्थलांतरित कामगार अजूनही मुख्य प्रवाहात येऊ शकत नाहीत. बेकारी वाढत आहे.
जे देशांतर्गत समस्यांविषयी तेच जागतिक समस्यांविषयी सांगता येईल. पृथ्वीवरील आजच्या सर्व गंभीर समस्या पाहिल्या तर त्याचे वर्गीकरण तीन समस्यांमध्ये करता येईल. पहिली समस्या आहे पर्यावरण बदल. यात जंगलांचा ऱ्हास, वायू प्रदूषण, जमीन प्रदूषण, जल प्रदूषण, जलस्रोत प्रदूषण, नैसर्गिक संसाधनांचा विध्वंस, प्लॅस्टिक प्रदूषण आणि या सर्व कार्बन पदचिन्हांमुळे (कार्बन फूटप्रिंट) पृथ्वीच्या तापमानात झपाट्याने होणारी वाढ यांचा समावेश होतो. हे रोखणे अशक्य नसले तरी अतिअवघड झाले आहे. दुसरी मोठी समस्या आहे, आर्थिक विषमतेची. आर्थिक विपन्नावस्थेमुळे वाट्याला येणारा भेदभाव, तणाव व अनेकदा होणाऱ्या दंगली यांचा यात समावेश होतो. तिसरी मोठी समस्या आहे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील सौहार्दाच्या अभावामुळे देशांतर्गत आणि देशादेशांमध्ये तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर उद्भवणाऱ्या व शांतता भंग करू पाहणाऱ्या प्रवृत्ती. यात युद्ध, यादवी संघर्ष, अतिरेकी प्रवृत्ती, दहशतवादी हल्ले, जात, धर्म, प्रदेश, भाषा व भूमी यांच्यावरून होणारे संघर्ष यांचा समावेश होतो.
या सर्वांच्या मुळाशी विकासाचे पाश्चिमात्य मॉडेल कारणीभूत आहे. कारण या विकासाच्या मुळाशी खासगी उद्योग आणि नफेबाजी आहे. खासगी उद्योग हे वस्तू व सेवांची मागणी व पुरवठा यातून तयार होतात व नफेखोरी या एकमेव हेतूने काम करतात. याचाच परिणाम म्हणून जगातील १० टक्के लोक ८५ टक्के संपत्तीचे मालक आहेत. शिवाय या सगळ्या प्रक्रियेचा आधार नैसर्गिक साधनांचा बेछूट अनियंत्रित वापर हा आहे. परिणामतः जंगले, नद्या, भूमी, समुद्र यांच्यावर आक्रमण झाले आहे. त्यातून सतत निर्माण होते मानवनिर्मित नैसर्गिक आपत्ती (उदा. भोपाळ गॅस दुर्घटना, फुकुशिमा आण्विक प्रकल्प दुर्घटना, आर्टिक व अंटाक्र्टिकचे अभूतपूर्व वितळणे आणि आता माळीण इर्शाळवाडी यासारखे भूस्खलन). या सर्वांचे पर्यवसान पृथ्वीचे तापमान वाढणे व समुद्राची पातळी उंचावून जाण्याने प्रलयकाळ जवळ आलेला असूनही त्याची चाहूल नाकारणे यात झाला आहे. देशांतर्गत यादवी युद्धांना आणि देशादेशांमधल्या संघर्षालासुद्धा नैसर्गिक संसाधनांच्या (सोने, युरेनियम, तेल व गॅस इ.) नियंत्रणाची भूक आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. यातूनच जीवघेणी स्पर्धा, विनाशक शस्त्रास्त्रांवरचा अब्जावधी डॉलर्सचा खर्च, अवैध देशांतर व शोषण यांची मालिकाच तयार झाली आहे. विकासाचे हे पारंपरिक मॉडेल विनाशाचे मूलभूत कारण ठरले आहे.
याचा अर्थ विकास वाईट असा नाही. विकासाला ‘मानवी चेहरा’ नसेल आणि विकासाच्या साहचर्याचा आधार नसेल तर असा विकास विनाशाकडे नेल्याशिवाय राहणार नाही. आज मानवी संस्कृतीतील सर्वात मोठ्या आव्हानाचे पर्व आहे. विकास (Development) आणि प्रगती (Progress) हा फक्त शब्दच राहिलेला नाही, यात माणसाच्या आणि पृथ्वीच्या जीवनमरणाचे प्रश्न दडलेले आहेत. जलचर, भूचर, पक्षी, प्राणी, कीटक, वनस्पती या सर्वांच्या लाखो प्रजाती नष्ट करण्याचे महापाप डोक्यावर घेऊन आता मानवी हस्तक्षेपाचा अपरिहार्य भाग म्हणून मनुष्य जातीची सामूहिक आत्महत्या होईल की काय, अशी परिस्थिती तुमच्या-माझ्यासमोर आहे.
भारताच्या दृष्टीने ही फार मोठी संधी आहे. भारताला तत्त्वज्ञान, मानवता, कला, साहित्य, ‘वसुधैव कुटुंबकम्’, ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ अशा विचारांची भक्कम बैठक आहे. योग विद्येचा गेल्या काही वर्षांतील प्रसार, सध्या सुरू असलेला भरड धान्याच्या वापराविषयीचा विचार, स्वतंत्र प्रज्ञेची विदेशनीती, सौर उर्जेतील विश्व नेतृत्व, जागतिक मंचावरती भारताचे उंचावत जाणारे स्थान यातून भारत जगाला एक नवी दिशा देऊ शकेल, अशी आशा निर्माण होतेय. विशेष म्हणजे पाश्चात्त्य वैचारिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जोखडातून मुक्त होण्याचा पहिला गंभीर प्रयत्न आज सुरू आहे. पण हे करताना आर्थिक, वित्तीय, तंत्रज्ञानविषयक‘विकासा’चा अभ्यास करून जगाला नवी सकारात्मक व प्रागतिक दिशा दाखवण्याची क्षमता भारताने ‘विकसित’ केली पाहिजे.सध्याच्या युगाला शास्त्रज्ञ अँन्थ्रोपोसिन (Anthropocene) म्हणजे ‘मानव युग’ म्हणतात. साधारण १९५० पासून सुरू झालेले हे नवयुग भविष्यात ‘डायनॉसॉर’ युगाप्रमाणे ओळखले जाईल. पण तेव्हा आपण अस्तित्वात नसू. आपण सर्वांनी आपल्याच हस्तक्षेपाने नष्ट केलेल्या पृथ्वीच्या विनाशाचे पुरावे मात्र सर्वत्र असतील.
हे जर होऊ नये असे वाटत असेल, तर बदलण्याची हीच वेळ आहे. यातील मानवी हस्तक्षेप आवरलाच पाहिजे. नद्या, जलाशय, समुद्र, जंगले, खनिजे, डोंगर, वन्यप्राणी, अन्य सूक्ष्म जीव, आकाश, पृथ्वी, वायू आणि चराचरात चाललेला मानवी हस्तक्षेप थांबवणे म्हणजे कार्बन पदचिन्हे कमी करणे होय. वस्तूंचा योग्य उपयोग, निसर्गाला प्राधान्य, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, प्रचंड ऊर्जा किंवा नैसर्गिक संसाधनांच्या वापरावर योग्य निर्बंध या आधारावर बनवलेली नवी अर्थव्यवस्था हीच आजची गरज आहे. भारत जर हे दिशादिग्दर्शन करू शकला, तर तो फक्त ‘विश्वगुरूच’ नव्हे तर ‘भवतारक’ म्हणून जगाला आदर्श ठरेल.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
डॉ. ज्ञानेश्वर मुळे
(लेखक राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आहेत.)