रताळे चाट
लाल चटणीसाठी साहित्य: २ चमचे तेल, १/४ छोटा चमचा मेथीदाणे, १ छोटा चमचा जिरे, १ छोटा चमचा बडीशेप, एका वेलचीचे दाणे, १ मोठा कांदा, १/२ इंच आले, २-३ लसूण पाकळ्या, १०-१५ सुक्या लाल मिरच्या (बिया काढून रात्रभर भिजवलेल्या), १ छोटा चमचा व्हिनेगर, १ छोटा चमचा मोहरीचे तेल, १ छोटा चमचा गूळ पावडर, १/२ कप पाणी, चवीनुसार मीठ.
रताळे चाटसाठी साहित्य: २-४ उकडलेले रताळे, १/४ कप तूप, लाल मिरचीची चटणी, २-३ हिरव्या मिरच्या, १ मोठा कांदा चिरलेला, मुरमुरे (मिसळण्यासाठी तसेच सजावटीसाठी), तळणासाठी तूप व सजावटीसाठी कोथिंबीर.
लाल चटणीसाठी कृती: कढईत तेल तापवून घ्या, त्यात मेथीदाणे टाका. त्यात जिरे, बडीशेप, वेलचीदाणे, कांदा, आले, लसूण घालून एक मिनिट परतून घ्या. आता त्यात भिजवलेल्या लाल मिरच्या घालून ५ मिनिटे शिजवा. (ज्या पाण्यात मिरच्या भिजवल्या आहेत, ते पाणी घालू नका.) व्हिनेगर व चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. एक मिनिट मध्यम आचेवर शिजवा. मोहरीचे तेल, गूळ पावडर आणि पाणी घालून मिरच्या मऊ होईपर्यंत ५ मिनिटे शिजवा. थंड झाल्यावर बारीक पेस्ट करा.
रताळे चाट कृती: उकडलेले रताळे अर्धगरम कोळशावर ठेवा आणि सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्या. (भाजण्यापूर्वी रताळे अर्धे शिजवू शकता, जेणेकरून ते लवकर भाजेल. कोळसा नसल्यास रताळे गॅसवर भाजून घ्या.) रताळे थंड झाल्यावर ते सोलून त्याचे मोठे तुकडे करा आणि बाजूला ठेवा.
चाटसाठी एका भांड्यात आले, हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर घालून चांगले मिसळा आणि बाजूला ठेवा. कढईत तूप गरम करून त्यात रताळे घालून सर्व बाजूंनी छान कुरकुरीत होईपर्यंत तळा व ते एका वाडग्यात काढून बाजूला ठेवा. त्याच पॅनमध्ये तयार लाल चटणी घालून एक मिनिट परतवा. थोडे पाणी घालून नीट ढवळून घ्या. चवीनुसार मीठ व तळलेले रताळे घालून चांगले मिसळा.त्यात चिरलेला कांदा, हिरव्या मिरचीचे मिश्रण आणि मुरमुरे घालून चांगले मिक्स करा. मुरमुरे आणि कोथिंबीरीने सजवा आणि गरम सर्व्ह करा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
चैत्राली अंतरकर, पुणे