काळे गाजर-बीट कलाकंद
मिलेट टार्टसाठी साहित्य॒: १ कप मिक्स मिलेट पीठ (नाचणी, वरी, फॉक्सटेल), १/२ कप गव्हाचे पीठ, १/२ कप थंड लोणी, १ छोटा चमचा लिंबाचा रस, ५-६ छोटे चमचे बर्फाचे थंड पाणी.
टार्टची कृती : एका भांड्यात मिक्स मिलेट व गव्हाचे पीठ घ्या. थंड लोणी पिठामध्ये घालून मिश्रण ब्रेडक्रंब्ससारखे दिसेपर्यंत हाताने फेटून घ्या.लिंबाचा रस आणि पाणी शिंपडून पिठाचा गोळा तयार करून घ्या. जर मिश्रण थोडे कोरडे असेल तर तुम्ही थंड पाण्याचे काही थेंब वापरू शकता. पीठ झाकून सुमारे ३० मिनिटे थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. आता पीठ फ्रीजमधून बाहेर काढून सुमारे ३ मिमी जाडीपर्यंत लाटा आणि गोल कुकी कटर (जो तुमच्या टार्ट मोल्डपेक्षा थोडा मोठा असावा) वापरून गोलाकार कापून घ्या आणि टिन किंवा मोल्ड्स लावून घ्या. पीठ जास्त ताणू नका आणि लाटताना ते पुन्हा पुन्हा फिरवू नका. काट्याने सर्व बाजूंनी छेद द्या आणि प्रीहीटेड ओव्हनमध्ये सुमारे १८००/३५० F वर साधारण २५ मिनिटे बेक करा. पूर्णपणे थंड झाल्यावर टिनमधून टार्ट काढून घ्या.
कलाकंदसाठी साहित्य : १ कप किसलेले काळे गाजर, १/२ कप किसलेले बीट, १/२ ते १ कप खजूर व अंजीर सिरप (खजूर व अंजीर रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.) १/२ कप खवा, २ कप बदामाचे दूध, (पाव किलो बदाम २ तास पाण्यात भिजवून साले काढून घ्या
व मिक्सरमध्ये १ कप पाणी घालून बारीक वाटून घ्या), १ चिमूटभर वेलची पूड, १ चिमूटभर मीठ, २ छोटे चमचे तूप.
कृती: कढईत १ चमचा तूप घालून गाजर व बिटाचा कीस घालून २ मिनिटे परतवून घ्या. नंतर त्यात खजूर-अंजीर सिरप, बदामाचे दूध व चिमूटभर मीठ घाला. हे मिश्रण चांगले मिसळा आणि सतत ढवळत राहा. दूध आटत आल्यावर वेलची पूड घालून परत एकदा चांगले मिसळा. कलाकंद पॅनच्या बाजूने सुटले, की एक छोटा चमचा तूप घाला. कलाकंद तयार आहे. योग्य प्रकारे रेफ्रिजरेट केल्यास हे २ दिवस चांगले राहते.
सर्व्हिंग: एका प्लेटमध्ये तयार टार्ट ठेवा. त्यात कलाकंद घालून चमच्याने पसरवा. ड्रायफ्रूट्स व गोल्ड फॉईलने गार्निश करा.
टीप: काळे गाजर-बीट कलाकंद ऐन वेळेस टार्टमध्ये सर्व्ह करा, अन्यथा टार्ट मऊ होईल.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
शकील जमादार, कर्नाटक