तिखट पुरणवडी
साहित्य॒: १ वाटी चणाडाळ, १/२ वाटी मूगडाळ, १/४ वाटी मटकी डाळ, १/४ वाटी मसूर डाळ, १/४ वाटी तुरडाळ, १/४ वाटी तांदूळ, प्रत्येकी छोटा चमचा हिंग, जिरे, ओवा, बडीशेप, धणे, ६-७ हिरव्या मिरच्या, आवश्यकतेनुसार कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना, आले, ५-६ लसूण पाकळ्या, थोडे तीळ, तेल, चवीनुसार मीठ, थोडीशी चिंच, २ वाट्या गव्हाचे पीठ व आवश्यकतेनुसार पाणी.
कृती: वरील सर्व डाळी एकत्र करून एका मोठ्या पातेल्यात ४-५ तास भिजत ठेवा. त्यानंतर त्या डाळी स्वच्छ धुवून त्यातील पाणी काढून घ्या.मिक्सरच्या भांड्यात भाजलेले जिरे, धणे, बडीशेप, ओवा बारीक करून घ्या. नंतर त्यात हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, लसूण पाकळ्या, थोडी कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता टाकून बारीक वाटा. वाटलेले वाटण एका मोठ्या भांड्यात काढून त्यात चवीनुसार मीठ, हिंग, थोडे तीळ घालून चांगले एकजीव करून तिखट मिश्र डाळींचे पुरण तयार करून घ्या. आता पोळीसाठी एका परातीत गव्हाचे पीठ चाळणीने चाळून त्यात थोडे मीठ व तेलाचे मोहन घालून पीठ मळून घ्या, थोडे मुरू द्या. छोटे छोटे कणकेचे गोळे करून घेऊन त्याच्या एक एक करून पातळ पाऱ्या लाटा. पहिल्या पारीवर तिखट पुरण सर्वत्र पसरून लावा, त्यावर दुसरी पारी ठेवा व पुन्हा पुरण पसरवा. त्यानंतर त्याचा रोल करा. रोल करताना आतून बाहेरून चारही बाजूंना थोडे-थोडे पुरण लावा. याप्रमाणे २-३ रोल तयार करून घ्या. वाफेच्या चाळणीला तेल लावून त्यात ठेवा. गॅसवर मोठ्या कढईत पाणी, थोडी चिंच किंवा लिंबाचा तुकडा घालून त्यावर स्टँड ठेवा. त्या स्टँडवर रोलची चाळणी ठेवा. झाकण ठेवून गॅस मंद करा व १५-२० मिनिटे चांगले वाफवून घ्या. रोल वाफवून थोडे थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडा. ह्या वाफवलेल्या पौष्टिक वड्या ओले खोबरे व ओल्या शेंगदाण्याच्या चटणी किंवा पुदिना चटणीसोबत तसेच सांबरसोबतही खाऊ शकता. शॅलो/डीप फ्राय करूनही ह्या वड्या खाता येतात.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
सुरेखा भामरे, पुणे