मूल

मूल…लाडावलेले की बिघडलेले? | परिणीता गणेश | Children of Today – Misunderstood or Spoiled? | Parinita Ganesh

मूल…लाडावलेले की बिघडलेले?

मुलांवरील प्रेम व्यक्त करायचे म्हणजे त्यांचे लाड करायचे, ही आजच्या पालकांची व्याख्या. मात्र असे लाड करताना आपण अतिलाड करून त्यांना बिघडवत तर नाही ना किंवा भौतिक सुख म्हणजेच मुलांचा आनंद असतो का, या प्रश्नांची उत्तरे पालकांनी शोधायला हवीत. अतिलाड झाल्यामुळे मुले हट्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच आपल्या मुलांचे लाड करताना पालकांना प्रेम, आनंद आणि लाड यांमध्ये संतुलन राखता यायला हवे. अतिलाडामुळे मूल बिघडू नये, ही जबाबदारी सर्वस्वी पालकांचीच असते.

बिघडलेले मूल कसे असते? जे कायम आरडाओरडा करते आणि चिडखोर असते? सतत त्रागा करते? क्षुल्लक कारणांवरून रागावते? एखादी वस्तू मागते आणि त्याला ती वस्तू लगेच हवी असते? अनेकदा सांगूनही पसारा करते? उद्धटपणा करू नको असे कितीही बजावले तरी उद्धट वागते? अशा प्रकारच्या वर्तनावर गैरवर्तनाचा शिक्का सहज मारला जाऊ शकतो. वस्तुस्थिती ही आहे की, लहान  वयात मेंदू आणि चेतासंस्था अजूनही विकसित होत असतात. प्रीफंटल कॉर्टेक्स हा मेंदूचा भाग तर्कसंगत विचार, भावनांचे नियंत्रण, उत्स्फूर्ततेचे नियंत्रण, कारण-परिणामांचे नाते, आपला अनुभव व्यक्त करण्यासाठी भाषेचा वापर इत्यादींशी संबंधित असतो. वयाच्या पाचव्या वर्षापासून ही वाढ सुरू होते आणि ती वयाच्या २५ व्या वर्षांपर्यंत सुरू असते.त्यामुळे प्रौढांना त्यांच्याकडून असलेल्या अवास्तव अपेक्षांची पूर्तता करणे लहान मुलांना आणि पौगंडावस्थेतील मुलांना अजूनच कठीण जाते. कारण वर नमूद केलेले वर्तन हे ८ वर्षांच्या मुलांचा विचार करता त्यांच्या वयानुसार होणाऱ्या वाढीशी सुसंगत असते. अशा वेळी मुलांना त्यांना समजून घेणारा पालक हवा असतो. मुलाकडे स्वतःला शांत करण्यासाठी काहीच साधन नसते, हे समजून घेणाऱ्या व्यक्ती म्हणजे संतुलित पालक.

पारंपरिक पालकत्वाचे मार्ग जसे की मुलांना एकटे ठेवणे, त्यांच्याशी न बोलणे, त्यांना ओरडणे किंवा मार देणे या पद्धती आता कालबाह्य करायला हव्यात. मुलांना दिल्या जाणाऱ्या अशा वागणुकीमुळे त्यांच्या मनावर कायमचा परिणाम होतो आणि त्यांच्या वाढीसाठी तो हानिकारक ठरतो. त्यामुळे प्रत्येक मूल मुळात ‘गुणी’ असते हे गृहीत धरूनच प्रत्येक पालकाने त्याच्याशी संवाद साधावा. जेव्हा मूल चिडते, आकांडतांडव करते तेव्हा ते ‘दुर्गुणी’ नसते, ते या भल्यामोठ्या जगात लहान मुले कशी असावीत, ह्याचा शोध घेत असतात. अशा वेळी त्यांना देखभाल हवी असते, शिक्षा नाही! त्यांच्याकडे कुणीतरी लक्ष द्यावे, असे त्यांना वाटत असते, दुर्लक्ष करणे अपेक्षित नसते. कुणीतरी आपल्याला जवळ घ्यावे असे वाटत असते, एकटे सोडावे असे वाटत नसते. मारून किंवा ओरडून आपल्याला अपेक्षित परिणाम साध्य होणार नाही हे ज्या पालकांना जाणवते, त्यांची परिस्थिती काहीशी कठीण होऊन बसते. कारण ते लहान असताना चूक झाल्यावर त्यांना जो अनुभव आला होता, तो पूर्णपणे विसरून ती पाटी कोरी करावी लागते.

वादळात शांत कसे राहावे?

असे म्हणतात की, चंद्रासाठी हट्ट करणे हा तुमच्या मुलाचा हक्क आहे आणि त्याला नकार देणे ही तुमची जबाबदारी आहे. मुलाला न दुखवता नकार कसा द्यायचा ते आपण पाहू या :

१) स्पष्ट मर्यादा आखा. तुमचे मूल या मर्यादा लक्षात ठेवेल किंवा त्यांचे पालन करेल अशी अपेक्षा ठेवू नका. जेव्हा तुम्ही बंधने घालता तेव्हा त्याच्या विरुद्ध घडण्याची शक्यता असते, हेही लक्षात ठेवा. या मर्यादा/बंधने मुलांना समजावून आणि हळुवारपणे पुन्हा सांगा. तसेच त्यांना हवी असलेली वस्तू मिळाली नाही तर त्यांना कसे वाटते, याचीही त्यांना आठवण करून द्या.

२) मुलाच्या अनियंत्रित मज्जा-संस्थेला नियंत्रित मज्जासंस्था असलेल्या संतुलित पालकाची गरज असते. एखाद्या बाबतीत बंधन घातल्यामुळे नाखूश असलेल्या मुलाला त्याचा रोष समजून घेणारी आणि त्याच्याशी शांतपणे, प्रेमाने वागणारी प्रौढ व्यक्ती हवी असते. उदा. ‘‘बाबांनी तुला अजून एक चॉकलेट न दिल्याने तुला खूप राग आला आहे, हे मला समजते. ते साहजिकच आहे. पण तरीही मी तुला आणखी एक चॉकलेट देऊ शकत नाही.’’

३) आक्रमक होणे, रागावणे, रागाने पाहणे याऐवजी नजर प्रेमळ करणे, गुडघ्यावर बसून त्यांच्या उंचीपर्यंत येत आवाज मृदू ठेवणे यामुळे मुलाचा राग शांत होण्यास मदत होऊ शकते. याउलट संतप्त वर्तनामुळे ते आपल्या भावना भीतीने थोपवतील, पण मज्जासंस्थेचे नियंत्रण करण्यास त्यांना मदत होऊ शकत नाही. त्याऐवजी त्यांना खोल श्वास घेण्यास सांगा, उड्या मारायला सांगा, सोफ्यावर उशी आपटायला सांगा, जेणेकरून मूल शांत होईल. उदा.‘‘चल, आपण दोघे मिळून श्वसनाचे व्यायाम करूया का?’’ किंवा ‘‘आईला जेव्हा राग येतो, तेव्हा ती सशासारख्या उड्या मारते. तूसुद्धा मारून पाहतोस/पाहतेस का?’’

४) एकच कृती अनेकदा करावी लागू शकते, हे लक्षात ठेवा. उत्स्फूर्त वागण्यावर नियंत्रण करण्यास आणि संतुलित प्रतिक्रिया देण्यास मदत करणारा मेंदूचा भाग मुलांमध्ये अजूनही विकसित झालेला नसतो. एकच कृती अनेकदा करून मूल शिकत जाते. जसजसे वय वाढत जाते, तसतसे हे अधिक सोपे होते.

५) तुम्हीही माणूस आहात. तुमच्याकडूनही चूक होऊ शकते, दरवेळी परिपूर्ण असणे शक्य नाही किंवा काही वेळा पारा चढणे साहजिक आहे. बहुतेक पालक त्यांच्या लहानपणीच्या अनुभवांच्या आधारे लहान मुलांशी वर्तन करत असतात. तुमचा आवाज चढला तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करा, लहान मुलांशी अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधण्यासाठी मार्ग शोधण्याचा तुम्ही प्रयत्न कराल हे त्यांना सांगा. पण जिथे आवश्यक आहे तिथे बंधन/मर्यादा निश्चित करा.

६) काही वेळा काही गोष्टीसाठी होकारही द्या, जेणेकरून तुमच्यातील संवाद कायम राहील.

७) लहान मुलांना घरातील कामांमध्ये लहानपणापासूनच सामावून घ्या. त्यामुळे त्यांना लहान वयापासूनच जबाबदारीची जाणीव होईल. पसारा आवरणे, दप्तर भरणे, किराणा सामान आणणे ही जबाबदारी त्यांच्यावर दिल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि भविष्यासाठी ते मूल सज्ज होते.मुले स्वावलंबी होतात आणि सगळे आयते मिळण्याची सवय जडत नाही.

८) अनेक पालकांना ताठरपणा आणि परवानगी यात संतुलन साधणे कठीण जाते. काही पालक प्रत्येक गोष्टीला परवानगी देतात. कारण त्यांना वाद नको असतात किंवा मुलांचे आपल्यावरील प्रेम कमी होईल, असे त्यांना वाटते किंवा अवघड परिस्थिती त्यांना नको असते. पण पालक प्रत्येक गोष्टीला परवानगी द्यायला लागले तर योग्य आणि अयोग्य यातील फरक याची समज विकसित करणे त्यांना कठीण जाईल. त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीला नकारच दिला तर ते मूल जोखीम घेण्यास कचरेल, संवाद साधणे कठीण जाईल. प्रत्येक गोष्टीची उणीव असल्याची भावना त्याच्यात निर्माण होईल आणि न्यूनगंड तयार होण्याची शक्यता आहे. यात संतुलन साधण्यासाठी तुमच्या कुटुंबातील मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न करा. नियम प्रत्येकाला सारखेच असतील याची काळजी घ्या. जी गोष्ट मुलांना लागू आहे, तीच मोठ्यांनाही लागू असेल. इतके सगळे केल्यानंतरही मूल हट्टीपणा करत असेल तर त्याला एकटे सोडा. तुमचे मार्गदर्शन समजून-उमजून घेण्याची मुलाच्या मेंदूची क्षमता आता तरी नाही, हे लक्षात घ्या. त्याला जसे वाटते तसे त्याला आता वागू द्या.

अमेरिकन लेखक-संगीतकार डेव्ह विलीस म्हणाले होते, ‘‘परिपूर्ण पालक कधीच नसतात आणि परिपूर्ण मूलही नसते. पण पालकत्वाच्या आणि मुलाच्या प्रवासात अनेक परिपूर्ण क्षण असू शकतात. अनेक दोष असलेले हे आयुष्य परिपूर्णपणे जगण्याचा प्रयत्न करा!’’

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


परिणीता गणेश

(लेखिका प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञ आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.