काकोरी सीख कबाब
साहित्य॒:५०० ग्रॅम मटण खिमा, ३ मोठे चमचे कच्च्या पपईची पेस्ट, २ मोठे चमचे तळलेल्या कांद्याची पेस्ट, २ मोठे चमचे भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट, १ छोटा चमचा तळलेल्या लसूण पाकळ्यांची पेस्ट, २ मोठे चमचे काजू-खसखस-चारोळी पेस्ट, प्रत्येकी १/२ छोटा चमचा काळीमिरी पूड, जायफळ पूड, जावित्री पूड, लवंगपूड, एका मोठ्या वेलचीची पूड, एका छोट्या वेलचीची पूड, १ छोटा चमचा लाल मिरची पूड, १ छोटा चमचा हळद, १ छोटा चमचा गरम मसाला, १/२ छोटा चमचा केवड्याचे पाणी, १ चिमूटभर केशर, ५ मोठे चमचे भाजलेल्या डाळ्यांचे पीठ, २ मोठे चमचे साजूक तूप, चवीनुसार मीठ, धुवादम देण्यासाठी कोळसा, आवश्यकतेनुसार तेल.
सर्व्हिंगसाठी :थोडे बटर, कांदा
कृती :मटण खिमा स्वच्छ धुवून बारीक वाटून घ्या. आता एका मोठ्या परातीत हा वाटलेला खिमा, पपई पेस्ट, कांद्याची पेस्ट, खोबऱ्याची पेस्ट, काळीमिरी पूड, जायफळ पूड, जावित्री पूड, लवंग पूड, काजू-खसखस-चारोळी पेस्ट घालून हाताने चांगले एकत्र करून घ्या. वरील मिश्रणामध्ये मिरची पूड, दोन्ही वेलची पूड, हळद, गरम मसाला, केशर व केवड्याचे पाणी घालून चांगले मिक्स करा. मिश्रणाच्या ओलेपणाचा अंदाज घेऊन भाजलेल्या डाळ्यांचे पीठ किंवा बेसन भाजून त्यात घाला. चवीनुसार मीठ व एक चमचा तूप घालून चांगले मिक्स करून तीन ते चार मिनिटे ठेवून द्या. नंतर तयार कबाबच्या मिश्रणामध्ये एक छोटी वाटी ठेवून त्यामध्ये तापवलेला कोळसा ठेवा. त्यावर एक चमचाभर तूप घालून त्या मिश्रणाला दम द्या. मिश्रण ५ मिनिटे झाकून ठेवा. तयार मिश्रण हाताने मळून छोटे छोटे गोळे बनवा व ते स्टिकला किंवा सीखला लावा. कोळशाच्या शेगडीवर किंवा तव्यावर तेल टाकून काकोरी सीख कबाब खरपूस भाजून घ्या. काकोरी सीख कबाब गरम असतानाच त्यावर पातळ केलेले बटर घालून हिरवी चटणी व कांद्याबरोबर सर्व्ह करा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
कौस्तुभ नलावडे, पुणे