कर्ज: एक गुंतवणूक
सध्याच्या काळातील गतिमान आर्थिक जगामध्ये कर्ज घेणे आणि गुंतवणूक करणे, याचा निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घ्यायला हवा. स्वतःच्या नावावर स्थावर मालमत्ता किंवा घर असणे दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी महत्त्वाचे आणि आवश्यक आहे, असे वाटल्यामुळे कर्ज काढून मालमत्ता घेण्याकडे हल्ली अनेकांचा कल झुकलेला दिसतो. मात्र यामध्ये गुंतवणूक आणि कर्जफेड या दोन्ही उद्दिष्टांचा एकत्रित विचार करावा लागतो.
स्वतःच्या मालकीचे घर असणे, हा आयुष्यातील एक भावनिकदृष्ट्या समृद्ध करणारा अनुभव असतो. नवीन घर घेताना झालेल्या आनंदाच्या भरात थोडा वेळ काढून तुमचे आयुष्यभराचे स्वप्न साकारतानाच तुम्ही यासोबत कोणत्या कर्जविषयक जबाबदाऱ्या अंगावर घेत आहात, याचाही विचार व्हायला हवा. गृहकर्ज घेणे आवश्यक असले तरीही त्यातील दीर्घकाळ व्याज परत करण्याची प्रक्रिया दुर्लक्षित करून चालणार नाही.
कर्ज काढून सेकंड होम किंवा गुंतवणुकीच्या दृष्टीने स्थावर मालमत्तेत पैसे गुंतवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हे व्याजाचे गणित समजून घेणे फारच महत्त्वाचे आहे. त्यावरूनच भविष्यातील तुमचे निर्णय चूक किंवा बरोबर ठरणार आहेत. हा विषय समजून घेण्यासाठी मेघनाचे उदाहरण घेऊ या. तरुण व्यावसायिक असलेल्या मेघनाला एक आर्थिक निर्णय घ्यायचा आहे. तिच्याजवळ असलेले पैसे गुंतवावेत की एखादे नवीन घर विकत घ्यावे, हा विचार करताना जेव्हा ती विविध पर्यायांचा अंदाज घेते तेव्हा त्यापैकी कोणता पर्याय निवडायचा हे नवे आव्हान तिच्यासमोर येते. तिच्यासमोर असलेले विविध पर्याय पुढीलप्रमाणे :
पर्याय पहिला : भाड्याने घर घेणे आणि पैसे गुंतवणे किंवा गृहकर्ज घेणे.
विचार पहिला
मेघनाने एक कोटी रुपयांचे २० वर्षे कालावधीचे गृहकर्ज घेतले आणि जर त्याचा व्याजदर ८ टक्के असेल तर संपूर्ण कर्जाची परतफेड होईपर्यंत २० वर्षांच्या या संपूर्ण कालावधीत जवळपास दोन कोटी रुपये बँकेला परत केले जातील.
विचार दुसरा
मेघनाने घर विकत न घेता महिन्याला गृहकर्जाचा जो हप्ता लागू होईल त्यातून भाड्याने घर घ्यावे. भाड्याचे पैसे वजा जाऊन जे पैसे उरतील, ते म्युच्युअल फंडात गुंतवले तर दीर्घकाळात मोठा फायदा होऊ शकतो.
समजा मेघनाचे सध्याचे घरभाडे २५०००/- रुपये असेल आणि तिच्याकडे ४२०००/- रुपये वरकड उरले, तर तिने म्युच्युअल फंडाच्या इक्विटी फंड योजनांमध्ये वीस वर्षे गुंतवणूक केल्यावर १२ टञ्चके दराने परतावा मिळाला तर तिच्या गुंतवणुकीचे मूल्य घसघशीत म्हणजेच ३.४४ कोटी रुपये इतके असेल.
हा पर्याय न अवलंबता जर तिने घर विकत घेतले असते तर त्या घराची किंमतसुद्धा एवढ्या दराने वाढली नसती. त्याउलट वीस वर्षे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यावर तिच्याकडे जे पैसे जमा होतील, त्यातून तिने घर विकत घेऊनही काही रक्कम तिच्या हातात उरेल.
पर्याय दोन :
जागा विकत घेणे आणि त्यातून भाड्याचे उत्पन्न कमावणे.
घर विकत घेणे, हा गुंतवणूक पर्याय म्हणून वापरायचा असेल तर आपण असे घर विकत घेतले पाहिजे की ज्यातून दर महिन्याला चांगले घरभाडे मिळेल. घरभाड्याच्या या रकमेतून आपला गृहकर्जाचा हप्ता वसूल होईल आणि थोडीफार रक्कम हातात शिल्लक असेल.
यामुळे असा विचार मांडला जातो, की जागा विकत घेण्यापेक्षा भाड्याने घेणे फायद्याचे ठरते. पण हे गणित दरवेळी आपल्या फायद्याचेच असेल असे नाही. कारण, रिअल इस्टेट बाजार दरवेळी स्थिर असतातच असे नाही. आपण जागा विकत घेताना रिअल इस्टेट बाजारात मंदी असेल, तर तुलनात्मकदृष्ट्या स्वस्तात जागा विकत मिळते. याउलट, बाजारात तेजी असली तर जागेचा भावही वाढतो आणि आपल्याला गृहकर्जाचा हप्तासुद्धा जास्त बसतो. पण प्रत्येक वेळी घर विकत घेताना आपण असे पक्के अंदाज बांधू शकत नाही.
गृहकर्ज आणि करबचत
भारतात गृहकर्ज घेण्याचे जे फायदे आहेत, त्यातील सर्वाधिक आकर्षक वाटणारा फायदा म्हणजे करामध्ये मिळणारी सवलत! आपण जे गृहकर्ज घेतो, त्या गृहकर्जाचा दर महिन्याचा हप्ता दोन भागांमध्ये विभागलेला असतो – कर्जाची रक्कम आणि व्याजाची रक्कम. भारतीय आयकर कायद्यानुसार या दोन्ही रकमांवर सवलत मिळायची सोय आहे. सेक्शन ८०C आणि २४ यामधून गृहकर्जाची रक्कम आणि व्याजाची रक्कम या दोघांवर सूट मिळते.याचा फायदा असा, की गृहकर्ज घेऊन त्यातून मेघनाला कर (टॅक्स) वाचवण्याचे आणि संपत्ती निर्मिती किंवा ती जागा भाड्याने देऊन मिळणारे पैसे असे दुहेरी फायदे होतील. गृहकर्ज वगळता वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज या प्रकारात अशी सवलत मिळत नाही आणि त्यामुळे गृहकर्ज घेणे अधिक आश्वासक वाटते.
थोडक्यात, वैयक्तिक आर्थिक निर्णयाचा विचार करता स्थावर मालमत्ता विकत घेण्यासाठी कर्ज उभारणे किंवा धोरणात्मक निर्णय घेऊन बाजारात गुंतवणूक करणे या दोन्ही पर्यायांचा साधकबाधक पद्धतीने विचार करावा लागेल.
स्वतःचे घर असणे यामध्ये मानसिक समाधान, स्थिरता आणि भविष्यातील घराची किंमत वाढणे हे फायदे असतात तर भाड्याच्या घरात राहणे किंवा घर भाड्याने देणे यामध्ये पैसे गुंतवणूक करण्यासाठी मिळतात. घर विकत घेण्यासाठी कर्ज घेतले असेल तर त्यामधून मिळणारे करबचतीचे लाभ वेगळेच!
प्रत्येक व्यक्तीची आर्थिक स्थिती, गुंतवणुकीची ध्येये आणि कालावधी यावर त्या व्यक्तीचा निर्णय ठरत असतो. आपली जोखीम घेण्याची प्रवृत्ती किती आहे, दीर्घकाळातली गुंतवणूक उद्दिष्टे कोणती या सगळ्यांचा योग्य विचार करूनच मेघनाने तिच्या आयुष्यातील आर्थिक प्रवासाला सुरुवात करताना गृहकर्ज की गुंतवणूक याचा निर्णय घ्यायला हवा.
माझा सल्ला :
भावनिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्याने आणि स्वतःच्या मालकीच्या घरात राहण्याचा फायदा मिळत असल्याने पहिले घर विकत घेण्याकडे माझा कल असेल, कारण त्या घरात मी राहणार आहे! मात्र अतिरिक्त निवासी मालमत्ता किंवा गुंतवणुकीचा विचार करता या संदर्भात योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी मी आर्थिक मॉडेल्स किंवा सल्लागारांवर अवलंबून राहीन. त्यानंतर माझ्याकडे असलेल्या पैशातून नवीन घर विकत घ्यायचे का गुंतवणूक करायची, याचा परिस्थितीनुसार तज्ज्ञांद्वारे आढावा घ्यावा लागेल. यामुळे निश्चित होऊ शकते, की हा निर्णय आर्थिक विवेकबुद्धीवर आधारित आहे की इतर कोणत्या कारणाने प्रभावित आहे.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
प्रेमल मेहता
(लेखक वेल्थ फर्स्ट अॅडव्हायझर्स प्रा. लि.चे संचालक आहेत.)