फराळी पेस्तो ग्रिल्ड प्लॅटर
साहित्य: प्रत्येकी ४-५ छोटे बटाटे, अरवी, प्रत्येकी २ रताळी, कच्ची केळी, प्रत्येकी १५० ग्रॅम लाल भोपळा, सुरण, पनीर, ४-५ स्लाइस अननस, ८-१० कोवळी भेंडी.
फराळी तंदूर मसाल्याचे साहित्य : प्रत्येकी १ छोटा चमचा लाल तिखट, जिरे पावडर, आमचूर पावडर, प्रत्येकी १/२ छोटा चमचा काळे मीठ, सुंठ पावडर, सैंधव, दालचिनी पावडर, १/४ छोटा चमचा लवंग पावडर, १ चिमूट जायफळ पावडर.
पेस्तोचे साहित्य: १०-१२ काजू / अक्रोड / पाइननट्स, १५ तुळशीची पाने, लिंबू, मिरी पावडर, चीज (मिरी व चीज उपासाला चालत असल्यास), चवीनुसार मीठ.
मॅरिनेशनसाठी साहित्य: ४ मोठे चमचे चक्का, २ मोठे चमचे उपवास भाजणी / शिंगाडा / राजगिरा पीठ, प्रत्येकी २ छोटे चमचे तंदूर मसाला, बटर, ब्राऊन शुगर, ३ छोटे चमचे पेस्तो, प्रत्येकी १/२ छोटा चमचा जिरे पावडर, लाल तिखट, सैंधव, ३-४ छोटे चमचे तेल, १/२ लिंबू, १ कोळसा, १ छोटा चमचा तूप.
सर्व्हिंगसाठी: साबुदाण्याची ताकातली लापशी (भिजवलेला साबुदाणा, पाणी, मीठ, जिरे पावडर, हिरवी मिरची व गोड ताक).
कृती: एका पॅनमधे पाणी घ्या, त्यात १ चमचा मीठ घालून उकळत ठेवा. पाण्याला उकळी आली की त्यात बटाटे, आरवी घालून ४-५ मिनिटे बुडवून बाजूला काढून ठेवा. सुरण व रताळ्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून २-३ मिनिटे उकळी काढून बाजूला ठेवा. भोपळ्याच्या फोडी उकळत्या पाण्यात एक मिनिटे बुडवून बाजूला काढा. भेंडी धुऊन कोरडी करून त्यांना चीर द्या. पनीरचे तुकडे करा.पेस्तोसाठी दिलेले साहित्य मिक्सरमधून काढा. एका बाऊलमध्ये मॅरिनेशनचे साहित्य व पेस्तो एकजीव करून घ्या.भोपळा व अननस सोडून सर्व गोष्टी मॅरिनेट करा. गॅसवर कोळसा लाल करून तो एका छोट्या वाटीत घ्या. ती वाटी मॅरिनेट करत ठेवलेल्या भाज्यांच्या बाऊलमध्ये ठेवून तापलेल्या कोळशावर एक चमचा तूप घाला. धूर आल्यावर तो बाऊल झाकून ठेवा. अशा तऱ्हेने भाज्यांना स्मोक द्या. मॅरिनेट केलेल्या भाज्या तासभर मुरू द्या. ग्रिलिंग पॅनवर थोडे बटर, ब्राऊन शुगर घालून अननसाच्या स्लाइस ग्रिल्ड करा. भोपळ्याच्या स्लाइसवर तयार केलेला तंदूर मसाला, किंचित तेल घालून ग्रिल्ड करून घ्या. मॅरिनेटेड पनीर, अरवी, सुरण, रताळी ग्रिलिंग रॉडला अथवा सॉते स्टिक्सना लावून घ्या. ग्रिलिंग पॅन चांगले तापवून घ्या. त्यावर ह्या स्टिक्स ठेवून वर थोडे थोडे तेल स्प्रे करून दोन्ही बाजूने खरपूस होऊ द्या. भेंडी ग्रिलिंग पॅनवर थेट ग्रिल करा. हे सर्व एका सर्व्हिंग प्लेटमध्ये सजवून घ्या. २-३ चमचे भिजवलेला साबुदाणा पाण्यात शिजवून घेऊन त्याला जिरे, मीठ, मिरची लावा. त्यात गोड ताक घाला. एका वाटीत गरम निखारा घेऊन त्यात तूप घाला, त्या वाटीवर बरोबर बसेल असा एक काचेचा ग्लास ठेवा म्हणजे त्यात सर्व धूर जमेल. ह्या ग्लासमध्ये साबुदाणा लापशी घाला, स्मोकी फ्लेवर लापशी तयार होईल. लापशीवर थोडी कोथिंबीर, जिरे पावडर भुरभुरवा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
केदार बिवलकर, मुंबई