तुका आकाशाएवढा
ज्या कारणामुळे महाराष्ट्र देशाला ‘महा’राष्ट्र म्हणण्यात येते. त्यातील एक कारण म्हणजे महाराष्ट्राची संतपरंपरा. तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी पाया घातलेल्या या परंपरेचे सतराव्या शतकातील संत तुकाराम हे कळस ठरले. त्यांच्या हातून वारकरी संप्रदाय पूर्णतेला पोहोचला.
तुकोबांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ज्ञानदेव, नामदेव, कबीर आणि एकनाथ या आपल्या पूर्वसूरींचे विचार आत्मसात केले होते. ते त्यांच्या अभंगांतून ठायीठायी व्यक्त झालेले दिसतातच. शिवाय त्यांचे स्वतःचे असे, त्यांच्या अनुभवातून सिद्ध झालेले विचारही अभंगांमध्ये आहेत. त्यामुळे तुकोबा स्वतःचे वैचारिक व वाङ्मयीन व्यक्तित्व कायम ठेवूनही वारकरी परंपरेचे प्रतिनिधी होऊ शकले. अठराव्या शतकाच्या अखेरीस होऊन गेलेले कविवर्य मोरोपंत यांनी अशी ग्वाही दिली आहे की तुकोबांचे अभंग म्हटल्याशिवाय, त्याचा आधार घेतल्याशिवाय कोणतेही कीर्तन पूर्ण होऊ शकत नाही.
तुकोबांचे व्यक्तित्व आणि विचार एवढे प्रभावी होते की त्यांच्या समकालीनांवर, ज्यांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिले-ऐकले होते त्यांच्यावर त्यांचा प्रभाव पडलाच परंतु त्यांच्या पश्चातही हा प्रभाव ओसरला नाही. तुकोबांपासून थेट आजच्या काळापर्यंत महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत असलेली जी कर्तबगार मातब्बर मंडळी होऊन गेली त्या सर्वांना तुकोबांची दखल घेणे भाग पडले, त्यांना प्रतिसाद देणे भाग पडले. हे झाले वैयक्तिक पातळीवर परंतु विशेषतः एकोणिसाव्या शतकात व विसाव्या शतकांतील म्हणजे ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील व्यक्तींवर व संस्थात्मक व्यवहारांवरही तुकोबांचा प्रभाव पडला.
तुकोबांचा हा प्रभाव इतका सर्वस्पर्शी व सर्वंकष होता की त्यांच्या काळापासून आजपर्यंतच्या अशा या प्रभावांच्या खुणांची मांडणी केली असता त्यातून महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहासच सिद्ध होऊ शकतो. त्याला आपण तुकारामकेंद्रित इतिहास असे म्हणू शकतो. विशेष म्हणजे सांस्कृतिक इतिहास ही एक व्यापक संकल्पना असून तिच्यात सामाजिक, राजकीय, धार्मिक, तात्त्विक, वाङ्मयीन अशा सर्व बाबींचा समावेश होतो.
या तीन-चार शतकांमधील ब्रिटिश राज्य येण्यापूर्वीचा कालखंड बाजूला ठेवू, तो यासाठी की आज आपले त्या काळाशी थेट नाते जोडता येत नाही.आपण आज जे कोणी व जे काही आहोत त्यातील हा भाग वजा करायचा असा नव्हे, तर आज जिला आधुनिकता असे म्हणण्यात येते तिची जडणघडण ब्रिटिश सत्तेच्या काळात झालेली आहे आणि या जडणघडणीत तुकोबांचा मोठा वाटा आहे.
आधुनिकता याचा अर्थ अद्ययावत यंत्रांचा उपयोग, बाह्य पोशाख, वेगळे शिष्टाचार असा घेणे हे वरवरचे ठरेल. आधुनिकतेचा गाभा म्हणजे मूल्यप्रणाली. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही फ्रेंच राज्यक्रांतीतून पुढे आलेली मूल्यत्रयी हा आधुनिकतेचा वैचारिक गाभा होय. गेल्या शतकातील
ज्येष्ठ व श्रेष्ठ व्यक्ती दिलीप पुरुषोत्तम चित्रे असे म्हणत की, ही मूल्ये त्यांनी स्वतः फ्रेंच राज्यक्रांतीतून किंवा युरोपकडून घेतली नसून वारकरी परंपरेतून घेतली आहेत. वारकरी परंपरेतील या मूल्यांचा मूर्तिमंत आविष्कार म्हणजे तुकोबांचे अभंग.
अर्थात हा झाला काळाच्या पटावरील अगदी अलीकडील बिंदू. चित्रे म्हणतात, ह्या प्रक्रियेची सुरुवात ब्रिटिश काळातच झाली आणि तीसुद्धा अपेक्षेप्रमाणे धर्मचिकित्सेतून. बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आणि दादोबा पांडुरंग तर्खडकर हे प्रारंभीचे समाजसुधारक मुख्यत्वे धर्मसुधारक होते. हिंदूंची समाजरचना धर्मकेंद्रित व धर्मप्रधान असल्यामुळे सुधारणांची सुरुवात धर्मापासूनच व्हायला हवी हे या धुरीणांनी ओळखले होते. त्यांच्यावर संतपरंपरेचा प्रभाव होता. बाळशास्त्रींना पुरेसे आयुष्य लाभले नाही. त्यांनी ‘दर्पण’ हे पहिले मराठी पत्र सुरू केले हे सर्वांना ठाऊक असते, मात्र ‘ज्ञानेश्वरी’चे पहिले संपादन, प्रकाशन बाळशास्त्रींनी केले याची तेवढी कल्पना नसते. त्यांची ही कृती सांकेतिक समजायला हवी.ज्ञानेश्वरी – अर्थात वारकरी संतपरंपरा हा इथल्या सुधारणांचा पाया असल्याचे त्यांच्या लक्षात आले. लोकहितवादींची बरीचशी शक्ती समकालीन ब्राह्मणांवर व पुरोहितशाहीवर टीका करण्यात खर्च झाली. रचनात्मक कार्य त्यांनी फारसे केलेले दिसत नाही, मात्र ही टीका करतानाही त्यांना शस्त्रास्त्रे मिळाली ती वारकरी परंपरेतून.
दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मात्र वारकरी मूल्ये आत्मसात करून मानवधर्म सभा आणि परमहंस सभा यांचा संख्यात्मक व्यवहार केला. दादोबांच्या घरी वारकरी परंपरेचा प्रभाव होता. त्यांनी अभंगरचना केली. त्यांचे शिष्य महाराष्ट्रातील शाळाखात्यात काम करीत असताना गुप्तपणे प्रचारकार्य करायचे.
भवाळकर तर जोतिरावांचे निकटचे सहकारी होते. सभेच्या तुकाराम तात्यांनी (पडवळ), तुकोबांच्या बृहत्गाथेचे संपादन, प्रकाशन केले. इतर संतांचेही साहित्य त्यांनी छापले. त्यांच्या ‘जातिभेदविवेक सार’ या पुस्तकात त्यांनी जातिव्यवस्थेचे दुष्परिणाम सांगताना तुकारामांशिवाय बहिणाबाई यांनी केलेला ‘वज्रसूची’ या जातिविरोधी उपनिषदाचा अनुवाद समाविष्ट करून त्याचा आधार घेतला आहे.
सामाजिक रोषामुळे दादोबांना परमंहस सभा बरखास्त करावी लागली. सभासद विखुरले तथापि त्यांना स्वस्थ बसवेना. त्यांनी नव्या पिढीतील पदवीधरांना हाताशी धरून नवा धर्मसमाज स्थापन केला. त्याचे नाव प्रार्थना समाज. दादोबांचे बंधू आत्माराम हे त्याचे संस्थापक, अध्यक्ष होते. पुढच्या काळात गाजलेले न्या. म. गो. रानडे आणि डॉ. रा. गो. भांडारकर, विठ्ठल रामजी शिंदे असे कर्तबगार पुरुष याच समाजाने घडवले. प्रार्थना समाजाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने तुकोबांना आपला मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक मानले. तुकोबांच्या धर्माला विश्वधर्म करायचे स्वप्न बाळगले. महाराष्ट्रातील नवशिक्षित पिढीवर या समाजाचा फार प्रभाव होता. समाजाचे धुरीण महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या चळवळीचे अध्वर्यू व आधुनिक भारताचे शिल्पकार होते. वि. रा. शिंदे यांचे अस्पृश्य निवारणाचे कार्य संपूर्ण देशात पायाभूत व प्रारंभकार्य ठरले.
परमहंस सभेची प्रार्थना समाज ही एक महत्त्वाची शाखा होती. तथापि तिने परमहंस सभेच्या जहाल मतांना परिस्थितीच्या दडपणामुळे थोडी मुरड घातली. त्यामुळे परमहंस सभेशी संलग्न असलेल्या जोतिरावांना प्रार्थना समाजाच्या नेत्यांबद्दल संशय वाटू लागला. या उच्चभ्रूंच्या समाजाला पर्याय म्हणून त्यांनी बहुजनांचा सार्वजनिक सत्य धर्म अथवा सत्य समाज काढला. याही समाजाच्या केंद्रस्थानी तुकोबाच होते. स्वतः जोतिरावांनी आपले क्रांतिकारक विचार व्यक्त करण्यासाठी तुकोबांचे अनुकरण करीत अभंगरचना केली.
ज्यांचा अशा प्रकारच्या तुकारामकेंद्रित समाजाशी संबंध नव्हता अशी मंडळीही तुकोबांच्या प्रभावापासून अलिप्त नव्हती. लोकमान्य टिळकांच्या ‘गीतारहस्य’ ग्रंथातील जास्तीत जास्त उदाहरणे तुकोबांच्या गाथेमधील आहेत. महात्मा गांधींनीही रोजच्या प्रार्थनेत तुकोबांचे अभंग समाविष्ट केले आणि अभंगांचा गुजराती अनुवाद किशोरलाल मश्रुवाला यांजकरवी करून घेतला.
रवींद्रनाथ टागोरांचे बंधू सत्येंद्रनाथ महाराष्ट्रात सनदी अधिकारी होते. त्यांनी तुकोबांचा परिचय बंगाली लोकांना बंगाली भाषेत करून दिला. स्वतः रवींद्र्रनाथांनीही तुकोबांच्या काही अभंगांचा बंगाली भाषेत अनुवाद केला होता. तुकोबांच्या जीवनावर आधारित मराठी नाटकांनी बरीच कमाई केली.गणपतराव जोशी, स. अ. शुक्ल अशा मान्यवरांनी भूमिकेत रंग भरले. प्रभातचा ‘संत तुकाराम’ तर विश्वविख्यात झाला.
तुकोबांकडून काही घेण्यासाठी मराठी माणूस असणे हे भांडवल पुरेसे असते, मग तुमची विचारसरणी कोणतीही असो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेल्या पहिल्याच ‘मूकनायक’ या पत्राचे समाईक ब्रीदवाक्य तुकोबांनीच पुरवले होते.
दिलीप चित्रे यांच्या बरोबरीने अरुण कोल्हटकर आणि भालचंद्र नेमाडे या आधुनिक साहित्यकारांच्या नावांचा उल्लेख करायलाच हवा. १९६० नंतर मराठी साहित्याला जे वळण मिळाले, त्यात या लेखकांचा लक्षणीय वाटा होता.
ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत त्याचे जास्तीत जास्त काळ सरसंघचालक राहिलेल्या मा. स. तथा गोळवलकर गुरुजींनी आपल्या इच्छापत्रात आपल्या समाधीवर तुकोबांचा अभंग कोरण्याची सूचना केली होती. त्यानुसार नागपूरमधील त्यांच्या समाधीवर ‘‘शेवटची विनवणी। संत जनी परिसावी॥’’ हा अभंग कोरण्यात आलेला आहे. अशा प्रकारे १७ व्या शतकातील तुकोबा आपल्याला आजही ऊर्जा, स्फूर्ती आणि विचार पुरवीत आहेत. तो एक न आटणारा झरा आहे.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
डॉ. सदानंद मोरे
(लेखक ज्येष्ठ अभ्यासक, इतिहास संशोधक व समीक्षक आहेत.)