कोथिंबीर वडी टिक्का
कोथिंबीर वडीचे साहित्य: १/२ कप बेसन, प्रत्येकी १ कप पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर, प्रत्येकी १ मोठा चमचा भरडलेले शेंगदाणे, तेल, प्रत्येकी १/२ मोठा चमचा ठेचलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेले आले, दही, चिमूटभर हळद, १ छोटा चमचा तांदळाचे पीठ, १/२ छोटा चमचा साखर, चवीनुसार मीठ.
कृती: एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ घ्या. त्यात १/२ कप पाणी व दही घालून चांगले फेटा. तव्यावर मंद आचेवर तेल गरम करा. त्यात भरडलेले शेंगदाणे, ठेचलेल्या हिरव्या मिरच्या, आले घाला. थोडा वेळ परतून घ्या. त्यात १/२ कप पाणी घालून मिश्रण चांगले ढवळा. त्यात मीठ, हळद आणि साखर घाला. पाण्याला उकळी येताच त्यात बेसन, तांदळाचे पीठ आणि दह्याचे मिश्रण घाला. हे मिश्रण चांगले ढवळून एकजीव करून घ्या. मग गॅस बंद करा. तवा गरम असताना त्यात चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण एकत्र करा. एका ताटाला तेल लावून त्यात बेसनचे मिश्रण थापून घ्या. थंड झाल्यावर वड्या कापून घ्या.
कोथिंबीर वडी टिक्का साहित्य: कोथिंबीर वडी, १ जळता कोळसा, प्रत्येकी १/२ मोठा चमचा काश्मिरी मिरची पूड, आले-लसूण पेस्ट, बारीक चिरलेली पुदिन्याची पाने, कोथिंबीर, १/४ कप घट्ट दही, प्रत्येकी १/२ छोटा चमचा जिरे पावडर, धणे पावडर, आमचूर पावडर, गरम मसाला, कसुरी मेथी, गरम केलेले बेसन, काळीमिरी पूड, १ मोठा चमचा तेल, आवश्यकतेनुसार तूप, कांदा व सिमला मिरचीचे चौकोनी तुकडे, चवीनुसार मीठ.
कृती: एका मिक्सिंग बाऊलमध्ये काश्मिरी मिरची पूड, दही, जिरे पावडर, धणे पावडर, मीठ, आमचूर पावडर, गरम मसाला, कसुरी मेथी, आले-लसूण पेस्ट, भाजलेले बेसन, काळीमिरी पूड, पुदिना, कोथिंबीर आणि तेल घालून चांगले एकजीव करा. कोथिंबीर वडी, सिमला मिरची आणि कांदा या मिश्रणात हलक्या हाताने फेटून घ्या. मॅरिनेट केलेल्या कोथिंबीर वडीवर जळता कोळसा ठेवून त्यावर तुपाचे काही थेंब टाकून सुमारे ५ ते १० मिनिटे झाकून ठेवा जेणेकरून त्याला धुराची चव येईल. कोथिंबीर वडी, सिमला मिरची आणि कांदे तिरपे कापा. तंदूर ग्रिल बेस, कोळशाला तूप लावा आणि कोथिंबीर वडी छानसर भाजून घ्या.
टीप: इलेक्ट्रिक तंदूर किंवा तंदूर ग्रिल पॅनमध्ये ही वडी ग्रिल करता येईल.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
पूजा कोठारे, मुंबई