Devotion | spirituality

भक्तिमार्ग | गोरक्ष बंडामहाराज देगलूरकर | Path of Devotion | Goraksha Bandamaharaj Deglaurkar

भक्तिमार्ग

भगवद्‌गीतेचा बारावा अध्याय हा भक्तियोग म्हणजे काय, याचा विचार मांडणारा आहे. भक्तीचे स्वरूप, भक्तीचे प्रकार, भक्त कोणाला म्हणावे यासंबंधीचा सविस्तर विचार यात आहे. कोणतीही इच्छा न करता देवाची भक्ती करणारा तो श्रीमद् खरा भक्त किंबहुना अशा व्यक्तीला सोयीचे जावे म्हणून ‘सगुण साकार’ असे रूप देवाने घेतले कारण अव्यक्त, निराकार देवाची उपासना करणे सामान्य भक्तांना कठीण जाते.

भक्ती करायची असते, ती देवाच्या प्राप्तीसाठी कारण भगवंताची प्राप्ती म्हणजेच मोक्ष! त्यासाठी भक्ताने सर्व कर्मे भगवंताला अर्पण करून, त्याचे ध्यान करून अनन्यभावाने त्याची उपासना करायची असते. कोणतेही चांगले कर्म ‘मी केले’ किंवा ‘माझ्यामुळे झाले’ असे म्हणण्यात अहंकार डोकावत असतो. तेव्हा ‘मी’ निमित्तमात्र आहे. भगवंताने ते मजकडून करवून घेतले असे मानायचे असते.

भक्ताने नीतिमान असावे, त्याने खोटेपणा न करता सत्याचा म्हणजे खरेपणाचा अवलंब करावा. दुसऱ्याला पीडा देणे म्हणजे पाप होय. परोपकार करणे म्हणजे पुण्याचे काम होय, असे संत तुकोबा सांगतात. जन्माला आलेल्याने अहंकार सोडून ईश्वरास शरण जावे, जे क्षणभंगुर आहे आणि जे चिरकाल टिकणारे आहे याचा सारासार म्हणजे साधकबाधक विचार करावा; नव्हे त्याची जाणीव ठेवून भक्ताने ईश्वराला शरण जावे. ‘पिटू भक्तीचा डांगोरा। काळिकाळासी दरारा॥’ असे तुकोबांचे सांगणे आहे. संतश्रेष्ठ ज्ञानोबाही अर्जुनाच्या निमित्ताने सकलजनास उपदेश करतात की,

 ‘तरि झडझडोनि वहिला निघ। इथे भक्तिचिये वाटे लाग। जिया पावसी अव्यंग। निजधाम माझे॥’ (अ.९.५१६).

(अर्थ – तरी या मृत्युलोकाच्या रहाटीतून झटकन मोकळा हो आणि या भक्तीच्या मार्गाला लाग, की ज्या भक्तीच्या योगाने माझे निर्दोष स्वरूप पावशील॥ अ.९-५१६॥)भक्तीचा महिमा अपार आहे. वेदांतूनही तो थोडक्यात सांगितलेला आहे. पुराणात तर तो मुख्य विषय म्हणूनच गणला गेला आहे. भक्त ध्रुव, भक्त प्रल्हाद, गजेन्द्र आणि मार्कण्डेय हे भक्तीमुळेच कसे अजरामर झाले यासंबंधीच्या कथा सांगितल्या जातात. त्यातून आपल्याला भक्तीचा महिमा कळतो.

विष्णू पुराणातून भक्तीचा मोठेपणा सांगणारी आणखी एक कथा येते. मानवाप्रमाणे प्राणीही भक्तीमुळे कसे तरून जातात हे या ‘गजेन्द्रमोक्ष’ कथेवरून कळते. हा गजेन्द्र रोज अंघोळ करून एक कमळाचे फूल भगवान विष्णूला अर्पण करीत असे. किती तरी दिवस त्याचा हा नित्यनियम चालू होता. एके दिवशी तो पाण्यात उभा असता मगरीने त्याचा पाय आपल्या जबड्यात घट्ट धरला. त्याने मनोभावे विष्णूची आराधना सुरू केली. त्याची अपार भक्ती पाहून श्रीविष्णूने धाव घेतली आणि त्याचे रक्षण केले. भक्तीची महानता अशी की अनन्यभावाने शरण आलेल्या भक्ताचे संकट भगवान दूर करत असतो.

कठीण परिस्थितीत देव भक्ताच्या मदतीला धावून येत असतो, हे शिवभक्त मार्कण्डेयसंबंधीच्या पुराणकथेवरून कळते. महान तपस्वी मर्कण्ड ऋषी यांना मूलबाळ नव्हते. त्यांनी तप केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या महादेवाने त्यांना पुत्रप्राप्ती करून दिली. मात्र महादेवाने एक प्रश्न विचारला, तुला प्रदीर्घ आयुष्य असलेला पुत्र पाहिजे की अल्पायुषी पण बुद्धिवान पुत्र पाहिजे. तेव्हा मर्कण्ड ऋषींनी बुद्धिवान पुत्राची अपेक्षा केली. कथा सांगते की, पुत्र मार्कण्डेय याने तपश्चर्येने शिवाला प्रसन्न करून घेतले. त्यामुळे १६ वर्षांचे वय संपल्यावर त्याचे प्राण हरण करण्यासाठी आलेल्या यमराजाला महादेवाने घालवून लावले. या कथेत भक्तीचे आणि विशेषतः बुद्धीचे मोठेपण सांगितले आहे. या कथेवर आधारित शिल्पाकृती वेरूळ, बृहदिश्वर मंदिर इत्यादी ठिकाणी पाहायला मिळतात.

भक्तीसंबंधी संत ज्ञानोबा माउली म्हणतात की देव केवळ भक्तीच जाणतो, लहानथोर तो जाणत नाही. गरिबाची खरी भक्ती त्याला श्रेष्ठ वाटते; म्हणून तर सुदाम्याचे पोहेसुद्धा तो आवडीने खातो. एवढेच नव्हे तर फळ, फूल नसेल तर भक्तिभावाने दिलेले केवळ पाणीही देवाला म्हणजेच श्रीकृष्णाला चालते. याचा अर्थ भगवंताला केवळ शुद्ध भक्तीच आवडते. इतर गोष्टी निमित्तमात्र असतात (हे सर्व ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायातील ओव्या ३९३ ते ३९६ यात सांगितलेले आहे).

थोडक्यात असे की, ईश्वराला शरण जाण्याची भावना म्हणजेच भक्ती होय. त्याचे ठायी एकमेव प्रेम म्हणजे भक्ती होय. भक्तीमुळेच ईश्वराची कृपा प्राप्त होत असते. तोच सर्वशक्तिमान असून भक्ताचा उद्धार करणारा आहे, ही भावना म्हणजेच भक्ती होय. हे जाणून ईश्वराला समर्पण भावनेने पूजिणे व त्याची आराधना करणे, यालाच भक्तिमार्ग किंवा भक्तियोग मानले जाते. काही मान्यवरांच्या मते, भक्ती हे ईश्वरप्राप्तीचे साधन आहे तर काहींच्या मते भक्ती हेच साध्य होय!

आपल्या महाराष्ट्रात वारकरी पंथाने भक्तीचा प्रचंड प्रभाव निर्माण केला. ‘न लगती सायास जाणे वनांतरा। सुखे येतो घरा नारायण’ असे तुकोबांचे म्हणणे आहे. हा भक्तिमार्ग एवढा सुकर आहे. भक्तीचे अवडंबर असे काही अपेक्षित नसते. मात्र देवपूजा, नामस्मरण, भजन आणि प्रार्थना याद्वारे तिचा आविष्कार करणे उचित ठरते. शिवाय भक्तीला सत्संग आवश्यक असतो. दानशूर, निर्दोष, विवेकी, विचारशील व ज्ञानी भक्तांचा सत्संग लाभावा, अशी अपेक्षा वेदकालीन ऋषींनी व्यक्त केली होती (ऋग्वेद ५.५१.१५). वारकरीपंथ प्रेरित वारीने हे साधलेले आहे, हे आपण प्रतिवर्षीच्या आषाढी वारीत अनुभवत असतो. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास यांच्या रचनांतून भक्तिमाहात्म्य आपणास कळत असते. भक्तिमार्गामध्ये देवदेवता आणि मूर्तिपूजा यांना विशेष स्थान आहे. येथे गुरूंची महतीही अभिप्रेत आहे. त्यांच्या उपदेशानुसार त्यांचे शिष्य भक्तिमार्ग अनुसरतात. एका परीने हा मार्ग म्हणजे मोक्षप्राप्तीचाच मार्ग असे मानले जाते. ज्ञान आणि कर्म हेही मार्ग आहेत. विशेष म्हणजे हा भक्तिमार्ग सर्व वर्णांच्या, जातींच्या स्त्री-पुरुषांसाठी मोकळा आहे. येथे भेदाभेद, भ्रम हा अमंगळ मानला जातो. यामुळेही हा मार्ग लोकप्रिय झाला.

भक्तीचे नऊ प्रकार सांगितले आहेत. त्यालाच नवविधाभक्ती असे म्हणतात. भगवद्‌गीता आणि भागवत पुराण हे भक्तिमार्गासंबंधीचे प्रमुख आधार ग्रंथ आहेत. यातून विशेषतः भागवतपुराणातून या नवविधाभक्तीची माहिती मिळते.

१) श्रवणे म्हणजे ईश्वराची आराधना / पूजा करताना मंगलवचन ऐकणे.

२) कीर्तन म्हणजे ईश्वरासंबंधीचे मधुर व मंगल वचनासाठी वाणीचा उपयोग करणे. ‘सदा नामघोष, करू हरि कथा’ असे आचरण.

३) स्मरण म्हणजे भगवंताची सदोदित आठवण ठेवणे, नामस्मरण करीत राहणे.

४) पादसेवन म्हणजे ईश्वराच्या (विष्णूच्या) परमपादाची सेवा करणे.

५) अर्चन म्हणजे देवाची पूजा करणे.

६) वंदन म्हणजे देवाला नमस्कार करणे, नतमस्तक होणे, प्रार्थना करणे.

७) दास्य, देवाची मनोभावे दास्यवृ॔ाीने सेवा करणे.

८) सख्य म्हणजे देवाशी मित्रत्व साधणे, जसे अर्जुनाने श्रीकृष्णाशी मित्रत्व साधले होते.

९) आत्मनिवेदन म्हणजे भक्तीचे अंतिम फल, भगवंताच्या स्वरूपाचे ज्ञान होणे. त्यामुळे त्याची भक्ती हाच एक कल्याणकारी मार्ग होय, हे मानणे.

थोडक्यात म्हणजे, भगवंताच्या प्राप्तीसाठी धरायचा जो भक्तिमार्ग होय तोच नवविधाभक्तिमय असतो!

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.

संदर्भ : श्रीमद् भगवद्गीता  (अध्याय बारावा), श्रीज्ञानेश्वरी


गोरक्ष बंडामहाराज देगलूरकर

(लेखक डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती तसेच पुरातत्व व मूर्तीशास्त्राचे  अभ्यासक आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.