पाम तेल: खाण्यासाठी की भेसळीसाठी?
भारतामध्ये अनेक प्रकारची खाद्यतेले तयार केली जातात. त्यात शेंगदाणे, सूर्यफूल बिया, सोयाबीन, करडई, मोहरी (राई), तीळ, खोबरेल ही येथेच उत्पादित केलेली तेले मोठ्या प्रमाणात वापरली जातात. भारतातील खाद्यतेलांचे उत्पादन येथील जनसंख्येला पुरेसे नसल्यामुळे अनेक खाद्यतेले (कच्च्या किंवा शुद्ध स्वरूपात) आयात करावी लागतात आणि येथील ग्राहकांपर्यंत पोहोचविली जातात. या आयात करण्यात येणाऱ्या खाद्यतेलांमध्ये पाम तेल, पाम कर्नेल तेल, सोयाबीन, सूर्यफूल ही प्रमुख आहेत. यांच्याशिवाय झाडांवरील बियांपासून तयार केलेली काही तेले उदा. आंब्याच्या कोयीतील गरापासून काढलेले तूप, कोकम तेल इत्यादी खाद्यपदार्थांमध्ये वापरता येणारे स्निग्ध पदार्थ उपलब्ध आहेत. झाडांवरील बियांपासून काढलेली काही तेले उदा. कडुनिंब, करंज इत्यादी देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. परंतु ती खाद्यतेले नसून त्याच्यापासून अखाद्य पदार्थ उदा. वंगणे इ. बनवले जातात. भारतात एरंडेल तेल हे अखाद्यतेल देखील मोठ्या प्रमाणावर उत्पादित केले जाते आणि जगभरात निर्यातही केले जाते.
आपल्याकडे अनेक खाद्यतेले विविध वजनाच्या पिशव्यांमध्ये आणि डब्यांमध्ये वितरित केली जातात. त्यांच्यावर सरकारी नियमांप्रमाणे (FSSAI) नोंद करणे आवश्यक असते. भारतातील खाद्यपदार्थांच्या नियामक संस्थेने काही खाद्यतेलांचे विशिष्ट प्रमाणात मिश्रण करून विक्री करण्यास परवानगी दिली आहे. परंतु काही उत्पादक हे नियम पाळत नाहीत व अधिक किमतीच्या खाद्यतेलांमध्ये कमी किमतीच्या खाद्यतेलांचे मोठ्या प्रमाणात मिश्रण करून ग्राहकांना अधिक किमतीला विकतात. म्हणजेच स्वस्त खाद्यतेलाची महागड्या खाद्यतेलात भेसळ करतात, असे लक्षात आले आहे.
भारत सरकारच्या आकडेवारीप्रमाणे, २०२२-२३ या वर्षांत खाद्यतेलांचे भारतातील एकूण उत्पादन सुमारे १२४ लाख टन होते आणि सुमारे १६५ लाख टन खाद्यतेल आयात करण्यात आले. म्हणजेच भारतातील अफाट लोकसंख्येच्या गरजेपेक्षा खूपच कमी खाद्यतेल आपल्या देशात तयार होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आयात केलेल्या स्वस्त तेलांची महागड्या देशी तेलांमध्ये भेसळ करण्याचे प्रमाण वाढले आहे.
पाम तेल हे सर्वांत कमी किमतीचे किंवा सगळ्यात स्वस्त खाद्यतेल असल्यामुळे (आयात केलेले असले तरीही!) ते इतर खाद्यतेलांमध्ये, विशेषतः शेंगदाणा, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ इत्यादी महाग खाद्यतेलांमध्ये भेसळ करण्यासाठी वापरले जाते. सरकारी धाडींमध्ये पकडण्यात आलेल्या भेसळयुक्त खाद्यतेलांमध्ये या पाम तेलाचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत असल्याचे दिसून आले आहे! भेसळयुक्त तेलांतील पाम तेलाचा वास झाकण्यासाठी आणि महाग तेलाचा स्वाद येण्यासाठी त्यात काही गंधांची रासायनिक द्रव्ये मिसळण्यात येतात. म्हणजे भेसळयुक्त शेंगदाणा किंवा तिळाच्या तेलात फक्त ३० टक्के खरे तेल असते तर बाकीचे ७० टक्क्यांपर्यंत भेसळ केलेले पाम तेल असण्याची शक्यता असते आणि ग्राहक मात्र ब्रँडेड तेल समजून १०० टक्के शेंगदाणा किंवा तिळाच्या तेलाची किंमत मोजतो. म्हणून खाद्यतेल खरेदी करताना सावध राहून योग्य नोंद लिहिलेले किंवा छापलेले (लेबल) व मोठ्या, नामांकित दर्जाचे तेल ग्राहकांनी खरेदी करणे आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात भेसळ केलेल्या पाम तेलाच्या सेवनामुळे आपल्या आरोग्यावर विशेषतः हृदयावर वाईट परिणाम होऊ शकतो.
आपल्या देशात शुद्ध पाम तेल किंवा त्यापासून वेगळे केलेल्या पामोलिन तेलाची विशेष मागणी नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे स्वस्त खाद्यतेल आयात करूनदेखील त्याच स्वरूपात खपत नाही. त्याचा मुख्य उपयोग खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. शिवाय, काही प्रमाणात इतर खाद्यतेलांत भेसळ करण्यासाठीही केला जातो.
पाम हा नारळाच्या वर्गातील वृक्ष असून त्याला मराठीत ‘ताल’ किंवा ‘माड’ असा सर्वसाधारण प्रतिशब्द आहे. तेल देणाऱ्या पाम वृक्षाला मराठीत ‘तेलमाड’ असे म्हणतात. मलेशिया, इंडोनेशिया आणि त्यासारखे हवामान असलेल्या प्रदेशांमध्ये पाम वृक्षाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, तसेच त्यांच्या फळांपासून तेल काढून ते निर्यात केले जाते. या फळांपासून विविध रसायने तयार करून तीदेखील निर्यात केली जातात. पाम तेल हे जगातील सर्वाधिक उत्पादन असणारे खाद्यतेल आहे आणि त्यामुळेच ते सर्वात स्वस्त आहे. तेलमाडांपासून काढलेल्या संपूर्ण म्हणजे पाम व पाम कर्नेल तेल मिळून होणाऱ्या एकूण तेलाचे हेक्टरी उत्पादन इतर कोणत्याही तेलबियांच्या हेक्टरी उत्पादनापेक्षा अधिक असते. सध्या ते चार ते पाच टन आहे. भारतात पाम वृक्षांची लागवड आता मूळ धरू लागली आहे.
शेंगदाणा तेलातील पाम तेलाची भेसळ ओळखण्यासाठी आपण एक घरगुती, रसायनविरहित पद्धत वापरू शकतो. एक वाटीभर तेल साधारणपणे दोन ते तीन तास फ्रिजमध्ये ठेवावे. पाम तेलाची भेसळ असलेले शेंगदाणा तेल गोठून तुपासारखे दिसू लागेल. पण शुद्ध शेंगदाणा तेल द्रवरूपच राहील. पाम तेलात असणाऱ्या संतृप्त मेदाम्लांच्या अधिक प्रमाणामुळे भेसळयुक्त तेल लवकर आणि अधिक गोठते.
या तेल माडांपासून दोन प्रकारची तेले मिळतात. बाहेरच्या भागातील मांसल सालीपासून ३० ते ७० टक्के पाम तेल मिळते, तर त्या फळांच्या बियांमधील गरापासून म्हणजेच मगजापासून ४४ ते ५३ टक्के पाम मगज तेल (पाम कर्नेल तेल) मिळते. या दोन्ही तेलांमधील विविध मेदाम्लांचे (Fatty Acids) प्रमाण भिन्न असल्यामुळे त्यांच्या गुणधर्मांमध्ये फरक आहे. पाम तेल आपल्याकडील शेंगदाणा तेलाच्या जवळपास आहे, तर पाम मगज तेल हे खोबरेल तेलासारखे आहे. ढोबळ मानाने पाम तेल हे खाद्यतेल म्हणून तर पाम कर्नेल तेल हे अखाद्यतेल म्हणून वापरले जाते. पाम तेल टाक्यांमध्ये साठवून ठेवल्यास त्यातील काही भाग घनरूप होऊन तळाशी बसतो. या घन भागास ‘पाम स्टिअरिन’, तर वरील द्रवरूप भागाला ‘पामोलिन’ म्हणतात. पाम स्टिअरिनमध्ये पामिटिक (C16) हे संतृप्त (सॅच्युरेटेड) मेदाम्ल, तर पामोलिनमध्ये ‘ओलेइक’ (C18:1) हे असंतृप्त (अनसॅच्युरेटेड) मेदाम्ल मोठ्या प्रमाणात सापडते. पाम तेलापासून तयार केलेले पामोलिनदेखील भेसळीसाठी वापरले जाऊ शकते.
आरोग्याच्या दृष्टीने पाम तेल हे संतृप्त म्हणजे सॅच्युरेटेड मेदाम्ले (Fatty Acids) अधिक प्रमाणात असणारे खाद्यतेल आहे. पाम तेलातील विविध मेदाम्लांचे प्रमाण पुढीलप्रमाणे असते : पामिटिक (C16) ४२ ते ४७ टक्के, स्टिअरिक (C18) ४ ते ६ टक्के, ओलेइक (C18:2) ३७ ते ४१ टक्के आणि लिनोलेइक (C18:2) ९ ते ११ टक्के. पाम स्टिअरिनमध्ये स्टिअरिक मेदाम्लांचे प्रमाण अधिक असते तर पामोलिनमध्ये ओलेइक व लिनोलिइक मेदाम्लांचे प्रमाण अधिक असते.
पाम तेलाच्या तुलनेत आपल्याकडील शेंगदाणा तेलातील विविध प्रमुख मेदाम्लांचे प्रमाण पुढीलप्रमाणे असते – पामिटिक ८.३ टक्के, स्टिअरिक ३.१ टक्के, ओलेइक ५६ टक्के आणि लिनोलेइक २६ टक्के. या मेदाम्लांच्या प्रमाणांवरून लक्षात येईल, की शेंगदाणा तेलात पाम तेल मिसळल्यावर त्या मिश्रणात संतृप्त मेदाम्लांचे प्रमाण खूपच अधिक होईल. अशा भेसळयुक्त शेंगदाणा तेलाचे सेवन केल्यावर, शुद्ध शेंगदाणा तेल खाणाऱ्या ग्राहकाला आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते.सूर्यफुलाच्या बियांपासून काढलेले तेल आणि तिळाचे तेल यांच्यातील असंतृप्त मेदाम्लांचे प्रमाण शेंगदाणा तेलापेक्षा आणखी जास्त असल्याने भेसळयुक्त तेले खाल्ल्याने आरोग्याचे अधिकच नुकसान होण्याची शक्यता असते.
खाद्यतेलांमधील भेसळ ओळखणे किंवा शोधून काढणे सामान्य ग्राहकाला कठीण असते. अशा खाद्यतेलांचे नमुने आधुनिक प्रयोगशाळेतील गॅस क्रोमॅटोग्राफीसारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने तपासून त्यातील भेसळ सिद्ध करता येते. परंतु, अलीकडच्या काळात, जून २०१९ मध्ये, भारतीय अन्न सुरक्षा संस्थेने (FSSAI) विविध चाचण्यांमधून तावून सुलाखून रामन – १ स्पेक्ट्रोमीटर या हातात धरता येणाऱ्या, बॅटरीवर चालणाऱ्या छोट्या उपकरणाला मान्यता दिली आहे. त्यात मायक्रो-ऑप्टिक्स, क्लाऊड, मोबाइल तंत्रज्ञान, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, तसेच मशीन लर्निंग या आधुनिक तंत्रांचा वापर केला आहे. हे उपकरण प्लास्टिकच्या पिशव्यांच्या बाहेरून त्यातील तेल स्कॅन करते आणि त्याचे विश्लेषण लगेच मोबाइल स्क्रीनवर दाखवते. भारतीय अन्न सुरक्षा संस्थेने (FSSAI) अनेक नमुने या उपकरणाने आणि प्रयोगशाळेत तपासून सर्व भेसळयुक्त तेलांचे नमुने यशस्वीरीत्या शोधून मगच या उपयुक्त अशा तेलातील भेसळ शोधणाऱ्या छोट्या उपकरणाला मान्यता दिली आहे. हे उपकरण तेलातील भेसळ शोधते, पण ते प्रयोगशाळेतील भेसळ विश्लेषणाला संपूर्णपणे बाजूला करण्यासाठी तयार केलेले नाही. मात्र, एखाद्या दुकानांमध्ये खाद्यतेलांचे नमुने न घेता लगेच भेसळीचे निदान करण्यासाठी या उपकरणाचा उपयोग होतो.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
डॉ. अजित जोशी
[लेखक तेल तंत्रज्ञान पीएच.डी. (टेक.) असून सध्या रसायने व खाद्य तेलांच्या क्षेत्रात सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.]