पर्ल बार्ली सूप विथ शेवग्याचा पराठा
व्हेजिटेबल पर्ल बार्ली सूप
व्हेजिटेबल पर्ल बार्ली सूप ही पाककृती हलकी, आरोग्यदायी, रुचकर आणि पोटभरीची आहे. रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहे.
साहित्य: १ छोटा चमचा ऑलिव्ह ऑइल, १ तमालपत्र, ३ लसूण पाकळ्या (बारीक चिरलेल्या), १ मध्यम आकाराचा कांदा (बारीक चिरलेला), मोठ्या गाजराचे १/२ इंच आकाराचे तुकडे, १ मोठा टोमॅटो (बारीक चिरलेला), १ टेबलस्पून टोमॅटो पेस्ट, अध्र्या लाल भोपळी मिरचीचे १/२ इंचाचे बारीक तुकडे, १ कप मटार, १/२ कप स्वीट कॉर्न, पाऊण कप पर्ल बार्ली, चवीनुसार मीठ, काळीमिरी पावडर, ५-६ कप पाणी, अध्र्या लिंबाचा रस, २ मोठे चमचे चिरलेली कोथिंबीर.
कोरडा मसाला: १/२ छोटा चमचा हळद, १ छोटा चमचा जिरेपूड, १ छोटा चमचा गरम मसाला पावडर.
कृती: बार्ली स्वच्छ धुवा.भांड्यात तेल गरम करून त्यात तमालपत्र, लसूण व कांदा घालून साधारण दोन-तीन मिनिटे परता. मग त्यात गाजर, भोपळी मिरची, टोमॅटो, मटार, स्वीटकॉर्न, पर्ल बार्ली, हळद, जिरेपूड, गरम मसाला, मीठ, काळीमिरी पावडर व पाणी घाला. झाकण ठेवून भाज्या व बार्ली मऊ होईपर्यंत ३० ते ४० मिनिटे शिजू द्या.
टीप: बटाटे, भोपळा, झुकिनी व पालक या भाज्यांचाही वापर करू शकता.
शेवग्याच्या पानांचा पराठा
शेवगा/मोरिंगाच्या पानांचा पराठा, मसाले आणि होल व्हीट पिठापासून तयार केलेला आहे.
साहित्य: १ कप होल व्हीट किंवा मल्टिग्रेन पीठ, १/२ कप शेवग्याची पाने, १/२ छोटा चमचा जिरे, १/२ छोटा चमचा लाल मिरची पावडर, १/४ छोटा चमचा हळद, १/२ छोटा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, २ मोठे चमचे तेल किंवा तूप, आवश्यकतेनुसार पाणी कृती : एका बाऊलमध्ये बारीक चिरलेली शेवग्याची/मोरिंगाची पाने, जिरे, लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद, गव्हाचे पीठ, तेल आणि मीठ घाला. हे मिश्रण चांगले एकजीव करा व थोडे पाणी घालून कणीक मळा. अतिरिक्त पाणी घालू नका. कणीक मळल्यानंतर कणकेचे गोळे तयार करा. थोडेसे कोरडे पीठ घालून थोडा जाडसर पराठा लाटा. मंदाग्नीवर तवा तापत ठेवून पराठा भाजून घ्या. पराठ्याच्या दोन्ही बाजूंवर सोनेरी ठिपके दिसू लागल्यावर थोडे तेल किंवा तूप लावा. दही, लोणचे, रायता, केचअपसोबत सर्व्ह करा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
अदिती कामत