मेथी दाण्यांचे महत्त्व
मेथीच्या बिया सुंदर सोनेरी रंगाच्या असतात, त्यांनाच आपण मेथीचे दाणे असेही म्हणतो. मेथीच्या भाजीप्रमाणे या बियांमध्येही भरपूर पोषणमूल्ये असतात. प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, मॅग्नेशियम, मँगेनीज, लोह, ‘अ’ आणि ‘क’ ही जीवनसत्त्वे तसेच ‘ब’ जीवनसत्त्वाचे अनेक प्रकार यांनी मेथीदाणे युक्त असतात. आयुर्वेदाच्या मते, मेथीचे पाणी यकृत, चयापचय क्रिया आणि मूत्रपिंड यासाठी उत्तम असते. वजन कमी करण्यासाठीही ते उपयुक्त ठरते, असे बंगलोरमधील नामांकित पोषणमूल्य तज्ज्ञांचे मत आहे. मेथीदाणे उष्ण समजले जातात, त्यामुळे अधिक प्रमाणात खाता कामा नये. पण कफ प्रकृतीच्या लोकांमध्ये उष्णता कमी असते. आयुर्वेदाच्या मते, या कारणामुळे सर्दी-खोकल्यासाठी त्यांच्या अंगात प्रतिकारशक्ती कमी असते. अशा व्यक्तींनी चहाचा एक चमचा मेथीचे दाणे एक कपभर पाण्यात रात्री भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी गाळून जरा गरम करून घेतल्यास सर्दी-खोकल्यासाठी त्यांची प्रतिकारशक्ती वाढते, असे पोषणमूल्य तज्ज्ञांचे मत आहे. दिल्लीमधल्या एका पोषणमूल्य तज्ज्ञांचे मत आहे, की मेथीदाण्याचे पाणी प्याल्याने प्रसूतीनंतर गर्भाशय पूर्वस्थितीत येण्यास मदत होते.
मेथीदाण्यांच्या पाण्याचा फायदा केस व मुरुमे असलेल्या त्वचेसाठीही होतो. मेथीदाण्यांचे पाणी जरी पोषणमूल्यांनी युक्त असले आणि अनेक व्याधींसाठी हितकारक असले, तरी पोटाच्या अल्सरचे दुखणे असलेल्यांनी ते पिऊ नये. तसेच हे पाणी जास्त प्रमाणात घेतल्यास त्वचा कोरडी होण्याची शक्यता असते.
मेथीदाणे पाण्यात भिजल्यावर खूप फुगतात. म्हणून लोणच्याचा खार दाट होण्यासाठी मेथीची पूड वापरली जाते. पण कच्च्या मेथीची पूड वापरल्यास तिच्यातील लेसिथीनमुळे पाण्यात भिजल्यावर त्यात एक प्रकारचा बुळबुळीतपणा येतो. शिवाय, मेथीचा स्वाद उच्च तापमानालाच बाहेर येतो म्हणून मेथीचे दाणे लालसर रंगावर तेलात तळून मग त्यांची पूड करून लोणच्यात घातली जाते. मेथीदाणे अत्यंत कडू असतात त्यामुळे लोणच्यासाठी ते कमी प्रमाणातच वापरले जातात. मेथीदाणे वापरण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे मेथीदाणे सूक्ष्म जीवाणूरोधक असतात, त्यामुळे लोणचे टिकण्यास मदत होते.
मेथीच्या दाण्यांना मोड आणून ते उसळ, धिरडी, भाजी यांसारख्या पदार्थांत वापरता येतात. मोड आणण्याच्या प्रक्रियेत त्यातील पोषणमूल्ये कितीतरी पटीने वाढतात. त्यामध्ये ‘क’ व ‘ई’ जीवनसत्त्वे तयार होतात. ही दोन्ही जीवनसत्त्वे उच्च अँटीऑक्सिडंट्स आहेत. त्यामुळे त्यांचा आरोग्याला फार फायदा होतो. मोड आलेली मेथी घालून सूपही बनवता येते. रोजची तुरीच्या डाळीची आमटी करताना थोडेस मेथीदाणे फोडणीत घालावेत. त्यामुळे आमटीला सुंदर स्वाद येतो आणि आमटीत चिंच किंवा आमसूल, गूळ, हिरव्या मिरच्या किंवा लाल तिखट आणि मीठ असते. त्यामुळे गोड, कडू, आंबट, तुरट, खारट आणि तिखट असे षड्रस आमटीद्वारे पोटात जायला मदत होते. फोडणीत थोडा ओला नारळ घातल्यास मेथीचा कडूपणा कमी होतो आणि नारळातली पोषणमूल्येही मिळतात. आमटीमध्ये लाल तिखट घालायचे असल्यास ते फोडणीत घालावे म्हणजे त्याचा आमटीला सुरेख रंग व स्वाद येतो. मोहरी, हिंग, हळदीच्या फोडणीत मेथीदाणे घालून, लालसर झाल्यावर कैरीच्या पिवळसर फोडी घालायच्या. मग त्यात गूळ, तिखट, मीठ घालून शिजवले, की चविष्ट मेथांबा तयार होतो.
‘टाइप वन’ व ‘टाइप टू’ अशा दोन्ही प्रकारच्या मधुमेही रुग्णांनी मेथीच्या दाण्यांची पूड घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. तसेच ज्या रुग्णांच्या शरीरात इन्सुलिनला विरोध असतो, तोही कमी होण्यास मदत होते. शिवाय, शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल तर कमी होतेच पण एकूणच कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. मेथीपूड घेतल्यामुळे ब्रेस्ट मिल्क वाढण्यास मदत होते. म्हणून आपल्याकडे बाळंतिणींना मेथीचे लाडू खाऊ घालण्याची पद्धत आहे. आणखी एका संशोधनातील निष्कर्षाप्रमाणे, ही मेथीदाण्यांची पूड पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढण्यास उपयोगी ठरते. मधुमेहींमध्ये हृदयविकार होण्याचे प्रमाण खूप असते अशांसाठी मेथीदाणे हितकारक आहेत.
लाडूबरोबरच इतरही अनेक पदार्थांमध्ये मेथीचा वापर केला जातो. बाजारात मेथीची उत्तम पूड मिळते. घरीसुद्धा करता येते. डोसे, तिखट-मिठाच्या पुऱ्या, धिरडी, मेदूवडे-दहीवड्यांच्या पिठात, तसेच थालीपिठाच्या भाजणीमध्ये एक ते अर्धा चमचा मेथीची पूड घालता येते. भाज्यांचे पराठे करताना त्या पिठातही थोडी मेथीची पूड घालावी. आपल्या पिठाचा अंदाज घेऊन त्या प्रमाणात मेथीची पूड घालावी म्हणजे पदार्थ अजिबात कडू होत नाही आणि लहान मुलेसुद्धा कुरकुर न करता खातात. थोड्या मेथीच्या पुडीने शरीरालाही फारसा त्रास होत नाही, उलट फायदाच होतो. या गोष्टींबरोबर शक्य तेथे कांदा वापरल्यास विशेषतः मधुमेहींना आणखी फायदा होतो. उदाहरणार्थ, डोशाऐवजी कांदा व कोथिंबीर वापरून उत्तप्पा करता येतो. थालीपीठ, पराठे, धिरडी यांच्या पिठातही कांदा घालता येतो.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
डॉ. वर्षा जोशी