‘हेल्दी फूड’ खरेच हेल्दी असतात?
आपल्या आरोग्याची काळजी हल्ली सर्वच घेत असतात. काय खायचे, काय नाही इथपासून कधी खायचे, कधी नाही आदी सगळ्याच गोष्टींबाबत लोक जागरूक होत असलेले पाहायला मिळतात. नैसर्गिक भाज्या-फळे, ज्यूस अधिक घेण्याचे प्रमाण आता वाढत आहे. एवढेच नाही, तर दुकानातून एखादा पदार्थ घेताना तो ‘हेल्दी’ आहे ना, हे तपासून घेतले जाते. या पदार्थांमधून किती कॅलरीज आपल्या शरीरात जातात याची मनातल्या मनात नोंद करून घेतली जाते. पण हेल्दी फूडच्या नावाखाली बाजारात उपलब्ध असणारे हे खाद्यपदार्थ आरोग्यासाठी खरेच हितकारक असतात का? अशा पदार्थांमधून कॅलरीज मिळणार नसल्या तरी त्यातून आपल्या शरीरात नक्की कोणती पोषणमूल्ये किती प्रमाणात जाणार आहेत हेसुद्धा लक्षात घ्यायला हवे. डाएट फूडच्या नावाखाली आपण नेमके कोणत्या पदार्थांचे सेवन करतो आहोत, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
हेल्दी म्हणजे नक्की काय, हा कळीचा प्रश्न बहुतेकांना सतावत असतो. हेल्दी फूडशी संबंधित बहुतेक माहिती सरधोपटपणे सांगितली जाते. उदा. साखर वाईट असते हे खरे आहे, पण नैसर्गिक साखरेचे काय? साखरेचे प्रमाण किती असले की ती वाईट ठरते? असे अनेक प्रश्न आपल्याला गोंधळात टाकत असतात. हेल्दी फूडची व्याख्या करायची झाली, तर तुमच्या शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक पुरविणारे पदार्थ म्हणजे हेल्दी फूड. प्रत्येक व्यक्तीसाठी ही यादी वेगवेगळी असू शकते. असे असले तरी काही वेळा काही मूलभूत नियम वापरले जातात, जे सोयीस्करपणे पॅकेज्ड फूडमध्ये सरसकट समाविष्ट केले जातात. मग हेच नियम वेगवेगळ्या वेष्टनांतून उत्पादनांच्या विक्रीसाठी आणि जाहिरातींसाठी वापरण्यात येतात.
बाहेर मिळणाऱ्या अनेक पदार्थांमध्ये कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स) नसल्याचा किंवा असल्यास खूप कमी असल्याचा दावा केला जातो. मग प्रश्न असा आहे की कर्बोदके आरोग्यासाठी वाईट असतात का? असे असेल तर आपण सलाड्स किवा कोशिंबिरी खाऊन चालणार नाही. कारण त्यात कर्बोदकेसुद्धा असतात. मग कर्बोदके कमी आहेत असे पाकिटावर नमूद केलेले पदार्थ खाणे चांगले असते का? गोंधळात पडलात? ब्रेकफास्ट सीरिअल्सनी अशीच दिशाभूल करून आपल्या नाश्त्याच्या प्लेटमध्ये जागा मिळवली आहे. खरे तर सकस आहारामध्ये कर्बोदकांचा समावेश असणे गरजेचे असते. तुमच्या शरीराच्या गरजेनुसार त्यांचे सेवन करावे. मात्र ही कर्बोदके आपण कशातून मिळवित आहोत, याकडे लक्ष द्यायला हवे. फळे, भाज्या, नट्स, मसूर यातून शरीराला मिळणारी कर्बोदके केव्हाही चांगली. तेच रिफाइंड आणि/किंवा प्रक्रिया केलेल्या पदार्थांमधून मिळणाऱ्या कर्बोदकांना चार हात लांब ठेवणेच इष्ट.
मग पुढचा प्रश्न उभा राहतो, तो प्रोसेस्ड किंवा प्रक्रिया केलेले सर्व पदार्थ आरोग्यासाठी अपायकारक असतात का? खरे तर याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. प्रक्रिया केलेल्या पदार्था-पदार्थामध्ये फरक असतो. उदा. नूडल्स प्रक्रिया केलेल्या असतात आणि बदामाचे दूधही. बिस्किटेही प्रक्रिया केलेली असतात आणि चीजसुद्धा. त्यामुळे प्रक्रिया केलेले कोणते पदार्थ आपण खातो, त्यानुसार त्यांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो, हे स्पष्टच आहे.
फॅट फ्री/लो फॅट उत्पादने नक्कीच हेल्दी असतात असे तरी म्हणता येईल का? एक म्हणजे, फॅट्स किंवा स्निग्ध घटक शरीरासाठी अपायकारक नक्कीच नसतात. योग्य गुणवत्तेच्या स्निग्ध पदार्थांचे योग्य प्रमाणात सेवन केले तर तुमचे वजन कमी होण्यास मदतच होईल. दुसरे म्हणजे कदाचित एखाद्या पदार्थात फॅट्स कमी असतील पण तो पदार्थ चविष्ट लागावा यासाठी उत्पादकाने त्यात जास्त साखर घातलेली असू शकते. असे असेल तर तो पदार्थ आरोग्यदायक असेल का? त्यामुळे लो फॅट किंवा फॅट फ्री पदार्थांच्या मागे लागण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा योग्य प्रमाणात पोषण घटक असलेले आणि आरोग्यकारक पद्धतीने फॅट्सची भर घालणारे पदार्थ निवडा म्हणजे प्रक्रिया केलेल्या फॅट्सऐवजी शेंगदाणे घातलेली उत्पादने ही अधिक आरोग्यदायी असतात.
फळांचे रस हे तर अपायकारक असूच शकत नाहीत, असा अनेकांचा सर्रास समज असतो. पण बाजारात मिळणारे अनेक रस हे फळांपासून तयार केलेले नसतात. त्यातील जिन्नस/रसायनांची चव फळांसारखी असते. त्यामुळे तुम्ही फळांचा रस समजून केवळ फळांच्या चवीचे साखरपाणी पित असू शकता. तुम्हाला १०० टक्के दर्जेदार फळाचा रस मिळाला तरी तो सर्वोत्तम किंवा आरोग्यदायी नसू शकतो. फळाचा रस म्हणजे फळच असते, फक्त त्यातील चांगले घटक काढलेले असतात, त्यामुळे जे उरते ती केवळ साखर असते. फळांच्या रसात एखाद्या साखर घातलेल्या पेयाइतकीच ही साखर असते.
त्याऐवजी फळे खाणे कधीही चांगले. तुम्हाला जर रस प्यायचाच असेल तर शहाळ्याचे पाणी प्या किंवा साखर न घातलेला फळांचा रस प्या.
हल्ली आरोग्यदायी म्हणून ऑरगॅनिक फूड/उत्पादने खरेदी करण्याचा ट्रेंड सेट होत आहे. कोणत्याही पदार्थामागे ऑरगॅनिक लागले, की तो पदार्थ आरोग्यदायी झाला असे वाटू लागते. दुर्दैवाने अनेकदा हा शब्दप्रयोग फसवा असतो. फक्त ऑरगॅनिक जिन्नस वापरले म्हणून आरोग्याला अपायकारक असलेला पदार्थ लगेच आरोग्यदायक होऊ शकत नाही. फरक एवढाच असतो, की त्यातील जिन्नस ऑरगॅनिक नियम वापरून तयार केलेले असतात म्हणजेच त्यात कीटकनाशके कमी असतात. तुम्ही ऑरगॅनिक पदार्थांची निवड करत असाल तरी ते आरोग्यदायी जिन्नसांपासून तयार केले आहेत का, हे जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
पांढऱ्या ब्रेडऐवजी होल ग्रेन/ मल्टिग्रेन ब्रेड करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पण पुढील वेळी असा ब्रेड निवडताना आठवणीने त्यावरील लेबल पाहा. बहुतेक ब्रँड्सच्या जिन्नसांमध्ये तुम्हाला प्रक्रिया केलेले गव्हाचे पीठ/ब्लीच न केलेले गव्हाचे पीठ किंवा रिफाइंड पीठ आढळेल. या ब्रँड्समध्ये होल ग्रेन्स असतात, पण केवळ तोंडी लावण्यापुरतेच असतात. त्यामुळे त्यात नक्की कोणते घटक आहेत, हे जाणून घेऊन मगच त्यांचे सेवन करा.
कामाच्या ताणाखाली वेळेवर ताजे जेवण जेवायला वेळ नाही, अशी समस्या असणाऱ्यांचीही कमी नाही.
अशा वेळी एनर्जी बार हा चांगला पर्याय आहे का, असा प्रश्न विचारला जातो. पण दुर्दैवाने बहुतेक एनर्जी बारमध्ये इतर कोणत्याही सामान्य कँडी बारसारखेच साखर, कॅलरी आणि फॅट कंटेन्ट्स असतात. त्यामुळे असा एनर्जी बार घेण्यापूर्वी त्यात नक्की कोणते जिन्नस आहेत ते पाहा. नट्स, सीड्स आणि खजुरापासून तयार केलेले एनर्जी बार पोषक असतात.
फ्लेवर्ड दूध आणि योगर्ट हे दुग्धजन्य पदार्थ असून प्रथिने व कॅल्शिअमचा ते उत्तम स्रोत आहेत. पण बाजारात ‘फ्लेवर्ड व्हरायटी’ म्हणून विकण्यात येणाऱ्या या पदार्थांमध्ये फ्लेवर तर असतोच, पण त्यासोबत भरपूर साखरही असते. त्यामुळे तुमच्या आहारात छुप्या प्रमाणात साखरेची भर पडत असते. त्यामुळे तुम्ही योगर्ट घेता तेव्हा त्यात खरे फळ आहे का, तसेच यात साखर घातली आहे का, ते तपासून घ्या आणि तुमच्या गरजेनुसार ते पदार्थ निवडा.
पुढल्या वेळी जेव्हा तुम्ही आरोग्यदायी उत्पादन निवडाल तेव्हा त्यातील घटकांची-जिन्नसांची कसून तपासणी करा. यासाठी त्या पदार्थांवरील लेबल नीट पाहा. तुम्हाला सर्व्हिंगचे प्रमाण समजून घ्यायचे असेल, तर आहारतज्ज्ञाचा सल्ला घ्या, जेणेकरून तुमच्या गरजेनुसार ते या उत्पादनांचा तुमच्या आहारात चपखलपणे अंतर्भाव करतील.
अजून काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
प्रिया कथपाल
(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)