पेरू आणि मिऱ्याचे आइस्क्रीम
साहित्य: १ लिटर + २ मोठे चमचे दूध, ३ नग हिरवे पिकलेले पेरू, ३ नग गुलाबी पिकलेले पेरू, ३०० ग्रॅम साखर, २ छोटे चमचे पांढरी मिरपूड, ४ मोठे चमचे कस्टर्ड पावडर, प्रत्येकी २ थेंब खायचा गुलाबी व हिरवा रंग.
कृती: १ लिटर दूध बारीक गॅसवर ३/४ होइपर्यंत आटवून घ्या. आटवलेल्या दुधात साखर घालून छान हलवून घ्या. त्यानंतर २ मोठे चमचे थंड दुधात कस्टर्ड पावडर मिक्स करून, ती साखर घालून आटवलेल्या दुधात घालून पाच मिनिटे शिजवत ढवळून घ्या. तयार दुधाचे मिश्रण थंड झाल्यावर त्याचे दोन भाग करा. एका भागात हिरवा आणि एका भागात गुलाबी रंग घाला. पिकलेल्या हिरव्या पेरूची पेस्ट करून मोठ्या गाळणीने त्यातल्या बया काढून, ती पेस्ट हिरव्या रंगाच्या दुधात घाला व १ छोटा चमचा मिरपूड घालून छान एकत्र करा. पिकलेल्या गुलाबी पेरूची पेस्ट करून मोठ्या गाळणीने त्यातल्या बिया काढून ती पेस्ट गुलाबी रंगाच्या दुधात घाला व १ छोटा चमचा मिरपूड घालून छान एकत्र करा. एक मिश्रण दोन तास आधी डीप फ्रीजरमध्ये ठेवा व ते सेट झाल्यावर त्यावर दुसरे मिश्रण घालून चार तास सेट करा. छान सजवून वरून थोडी मिरपूड व चाट मसाला घालून सर्व्ह करा. हे आइस्क्रीम छान चटपटीत आणि क्रीमी लागते.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
मृणाल मुळजकर, सोलापूर