उपवासाचे बॉल्स व कवठाची चटणी
उपवासाच्या बॉल्ससाठी साहित्यः १०० ग्रॅम सुरण, ४ मध्यम आकाराचे बटाटे, २ कच्ची केळी, २ चमचे वरी पीठ, २ चमचे साबुदाणा पीठ (साबुदाणे भाजून मिक्सरला बारीक करा), २ चमचे मिरची पेस्ट, १/२ चमचा आले पेस्ट, २ चमचे चिरलेली कोथिंबीर, १ चमचा साखर, १ मूठभर काजूचे तुकडे, चवीप्रमाणे मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती: सुरण, बटाटे, केळी उकडून, किसून घ्या. त्यात मिरची व आल्याची पेस्ट, वरीचे पीठ, साबुदाणा पीठ, कोथिंबीर, साखर, मीठ घालून मिक्स करा.त्याचे छोटे छोटे गोळे करून मधोमध काजूचा तुकडा घालून गोळा बंद करा. आता हे बॉल्स गरम तेलात मंद आचेवर तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्या.
टोमॅटो सॉसबरोबर गरमागरम खायला द्या. (उपवासाला हे बॉल्स कवठाच्या चटणी किंवा दह्याबरोबर खाता येतील.)
चटणीसाठी साहित्यः १/२ वाटी कवठाचा गर, १/२ वाटी गूळ, १ चमचा तिखट, १/२ चमचा मीठ.
कृती: सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरला फिरवून घ्या. घट्ट वाटल्यास थोडे पाणी घाला. ही चटणी चार दिवस फ्रिजमध्ये राहते.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
वनिता जंगम, ठाणे