बाजरीच्या खारोड्यांचा चटपटीत चाट
खारोड्यांसाठी साहित्य: १ मोठी वाटी बाजरी, ६ वाट्या पाणी, २ मोठे चमचे तीळ, १ चमचा तिखट, २ चमचे धणेपूड, १ चमचा जिरेपूड, १ चमचा हळद, २ चमचे लसूण पेस्ट, मीठ (चवीनुसार), ताटाला लावण्यासाठी तेल‧
कृती: सर्वप्रथम बाजरी धुऊन घ्या, त्यातील पाणी काढून टाका आणि स्वच्छ कपड्यात ४-५ तास बांधून ठेवा. त्यानंतर मिक्सरमधून जाडसर भरडून घ्या. ही भरड चाळणीने चाळून घ्या. कढईत ६ वाट्या पाणी टाकून त्यात तीळ, तिखट, धणेपूड, जिरेपूड, हळद, लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ टाका. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात बाजरीचे पीठ टाकून व्यवस्थित मिक्स करा आणि झाकण ठेवून १० मिनिटे मंद आचेवर शिजू द्या‧ त्यानंतर ताटात काढून थंड करण्यास ठेवा. ताटाला / प्लॅस्टिकला तेल लावून घ्या. हाताला थोडे पाणी लावून शिजलेल्या मिश्रणाच्या छोट्या छोट्या वड्या करून तेल लावलेल्या ताटात टाका व कडक उन्हात २-३ दिवस वाळायला ठेवा.
पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या या बाजरीच्या खारोड्याला चाट प्रकारात सादर करत आहे.
चाटसाठी साहित्य: १ वाटी वाळलेल्या बाजरीच्या खारोड्या, १/२ वाटी बारीक चिरलेला कांदा, १/२ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, १/४ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, चिंचेची आंबट गोड चटणी, पुदीना चटणी, दही, चाट मसाला, तिखट, मीठ, बारीक शेव.
कृती: बाजरीच्या खारोड्या थोड्याशा तेलात परतवून घ्या. त्यावर दही, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, पुदीना चटणी, चिंचेची चटणी, चाट मसाला, तिखट, चवीनुसार मीठ आणि बारीक शेव टाका. बाजरीच्या खारोड्याची चटपटीत भेळ खाण्यासाठी तयार. नक्की ट्राय करून बघा.
टीप: बाजरीत भरपूर प्रमाणात फायबर असतात, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच बाजरीत मॅग्नेशियम, पोटॅशियम असल्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
कविता पुराणिक, पुणे