कंद फ्लॉवर पॅटी
पॅटीच्या कव्हरसाठी साहित्य: १ कप मैदा, १ छोटा चमचा बारीक रवा, १ चिमूट बेकिंग पावडर, मीठ (चवीनुसार), ११/२ मोठा चमचा साजूक तूप, १/४ कप बिटाची प्युरी,
सारणासाठी साहित्य: प्रत्येकी २ मोठे चमचे सुरण, बटाटा, कोनफळ, गाजर बारीक तुकडे करून, १ छोटा चमचा बारीक चिरलेले आले-लसूण, मीठ (चवीनुसार), लाल तिखट, १ छोटा चमचा शेजवान सॉस, व्हिनेगर, १ छोटा चमचा तेल, १/४ कप बारीक चिरलेली कांद्याची पात, १ चिमूटभर साखर.
चटणीसाठी साहित्य: १/४ कप बटाटा-पुदिना शेव, १/४ कप पालक, १/३ कप कोथिंबीर, १ तुकडा आले, २-३ लसूण पाकळ्या, ३ हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस, मीठ (चवीनुसार), जिरे.
कृती: पॅटीच्या कव्हरसाठी दिलेले सर्व साहित्य बिटाच्या प्युरीमध्ये घालून पीठ घट्ट मळून अर्धा ते पाऊण तास ठेवा व नंतर पुन्हा मऊसर मळून घ्या.आता सारणासाठी तेलामध्ये लसूण, आले, लाल तिखट टाकून परतवून घ्या. त्यामध्ये कंदाचे तुकडे टाकून वाफेवर शिजवून घ्या. नंतर त्यात गाजराचे तुकडे टाका. त्यात मीठ, शेजवान सॉस, व्हिनेगर घालून किंचीत साखर घाला. हे मिश्रण गार झाल्यावर त्यामध्ये कांदापात घाला. आता पिठाची पातळ पुरी लाटून २.५’’ × २.५’’ आकाराचे चौकोनी तुकडे करून त्यात सारण भरून फुलाचा आकार देऊ न मंद आचेवर तळून घ्या. चटणीचे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बर्फाचे २ खडे टाकून बारीक चटणी वाटून घ्या व पॅटीस सोबत सर्व्ह करा.
टीप: आवडीनुसार कोणतीही कंदमुळे वापरू शकता. पॅटीस बेकसुद्धा करता येते.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
वर्षा तेलंग, पुणे