उपवासाची बालूशाही
साहित्य: २ कप उकडून किसलेले रताळे, १/२ कप उकडून किसलेले सुरण, १/२ कप रताळ्याचे पीठ, २ छोटे चमचे आरारूट पावडर, १/२ कप खवा, १/२ कप दही, १/२ कप साजूक तूप, तळण्यासाठी २ वाटी तूप.
पाकासाठी: १ कप किसलेला गूळ, १ कप पाणी.
कृती: प्रथम उकडून किसलेले रताळे व सुरण एकत्र मिक्स करा. मिक्सरच्या भांड्यातून दही व अर्धा कप साजूक तूप फिरवून भांड्यात काढा. त्यात आरारूट पावडर, खवा, रताळ्याचे पीठ टाका. मिश्रण साधारण गुलाबजामला भिजवतो तसे भिजवा. हे मिश्रण खूप मळा व झाकण ठेऊन एक तास तरी मुरू द्या. पाकासाठी दुसऱ्या काढईत पाणी व चिरलेला गूळ टाका आणि उकळून एकतारी पाक करून ठेवा. एक तासानंतर गॅसवर कढईत तूप घाला व तूप चांगले तापू द्या. जे मिश्रण झाकून ठेवले होते ते पुन्हा मळा. त्याचे पेढ्याच्या आकाराचे छोटे गोल गोळे करा व अंगठ्याने त्यात भोक करा. डोनटप्रमाणे आकार करून रिंग तयार करा व तुपामध्ये तळून घ्या. मंद आचेवर छान गुलाबी होईपर्यंत तळून घ्या. बालूशाही थंड होऊ द्या व पाक थोडा कोमट असताना त्यात या बालुशाही बुडवा. थोड्या वेळाने बाजूला काढा, खाण्यासाठी बालूशाही तयार.
सजावटीसाठी: एका प्लेटमध्ये बालूशाही सर्व्ह करा. वाटल्यास वरून पाक घाला आणि सजावटीसाठी तळलेल्या रताळ्याचे काप बाजूला ठेवा. वरून बदामाचे काप टाका.
टीप: रताळ्याच्या पिठाऐवजी आपण वरी, शिंगाडा, राजगिरा पिठही घेऊ शकतो. १ छोटा चमचा बेकिंग पावडर टाकली तरी चालेल. खव्याऐवजी मिल्क पावडर घेऊ शकता. गुळाऐवजी साखरेचा पाक करून घेऊ शकता.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
राजेश्री राजपूत, डोंबिवली