श्रावणातले सात्विक नियोजन
श्रावणाच्या या महिन्यात अनेक सणवार, उत्सव असतात व उपवासही. पावसाळ्याचा हा काळ आरोग्य आणि आहार या दोन्ही दृष्टीने महत्त्वाचा असतो.म्हणूनच आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या परंपरांचे पालन करतानाच आहाराचे नियम विसरून चालणार नाही. आपल्या खानपानाच्या परंपरा/संस्कृतीला कायम शास्त्रीय आधार राहिलेला आहे. या पवित्र महिन्यात अनेक जण विविध व्रतवैकल्ये करत असतात. त्यामुळेच या दिवसांत उपवासाचा आहार घेताना खास लक्ष असायला हवे.
श्रावणात असा असू दे आहारः
१. तृणधान्ये कमी खावी. कर्बोदकांसाठी कंदमुळांवर (विशेषतः राजगिरा, कुट्टू, शिंगाड्याचे पीठ, कच्च्या केळ्यांचे पीठ, वरीचे तांदूळ इत्यादी) भर द्या.
२. शाकाहाराला प्राधान्य : हे नक्कीच करून पाहिले पाहिजे. मांसाहारी प्रथिनांना काही वेळ आराम द्या आणि एक महिना शाकाहारावर भर द्या.वनस्पतीवर आधारित खाद्यपदार्थांमधील जीवनसत्त्वे व क्षार यामुळे शरीराच्या ‘डिटॉक्सिफिकेशन’साठी मदत होते. तुमच्या पोटातील मायक्रोफ्लोरा सुधारण्यास आणि परिणामी, प्रतिकारयंत्रणा सशक्त होण्यास यामुळे मदत होते. यात दाहरोधी गुणधर्म असतात. श्रावण महिन्यात विविध स्थानिक हंगामी भाज्या व फळे खाण्याचा लक्षणीय परिणाम त्वचेवर व केसांवर होतो.
३. हंगामी भाज्या व फळे : अळू, शेवग्याची पाने, इतर पावसाळी भाज्या, श्रावणी भेंडे, श्रावणी घेवडा, करटोली इत्यादी भाज्यांचा आहारात समावेश करा. नासपती, मोसंबी, डाळिंब, प्लम, पीच आदी फळे या महिन्यात मिळतात, त्यांचा आस्वाद घ्या. श्रावणातील प्रत्येक जेवणात पेअरचा समावेश करावा.
४. अल्पोपहारासाठी मखना, सुका मेवा, खारवलेले दाणे, शेंगदाणे, उकडलेली रताळी घ्या.
५. डाळ किंवा कडधान्य म्हणून हिरवे मूग वापरा. इतर डाळींच्या तुलनेत हिरवे मूग पचायला हलके असतात. हे मूग मोड आणून खावेत.
६. जेवणात सैंधव मीठ वापरा. एकंदर स्वयंपाकात मिठाचे प्रमाण कमी करा.
७. सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे उपवासाला साबुदाणा खाल्लेला चालतो का? मुळात उपवास म्हणजे पचन यंत्रणेला पूर्ण आराम देणे.साबुदाणा हा खरे तर अत्यंत प्रक्रिया केलेला जिन्नस आहे. त्यात स्टार्च म्हणजेच कर्बोदके मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे उपवासाला साबुदाणा खाल्ला असता त्यातून खूप जास्त ऊर्जा शरीराला मिळते. कासावा नावाच्या झाडाच्या मुळा-पासून साबुदाणा तयार करतात. ही वनस्पती मुख्यतः दक्षिण भारतात होते. म्हणजे साबुदाणा हा तृणधान्य वा प्रतितृणधान्य नाही. तर एका कंदमुळापासून तयार केलेले उत्पादन आहे. त्यामुळे तुमचा आवडता साबुदाणा वडा वा खिचडी क्वचित कधीतरी खाणे ठीक आहे. पण नियमितपणे खाऊ नये. कर्बोदकांचा स्रोत असलेले व उपवासाला चालणारे इतर अनेक पदार्थ आहेत, जे संतुलित आहारात समाविष्ट असले पाहिजेत. भगर, कुट्टू, शिंगाडा, राजगिरा, कच्ची केळी, वेगवेगळ्या प्रकारची कंद म्हणजेच रताळी, अरबी, कोनफळ, सुरण यांचा पर्याय साबुदाण्याऐवजी नेहमीच चांगला!
लक्षात ठेवा:
* साबुदाण्यात फक्त कर्बोदके असतात, प्रथिने नाही. भारतात उपवासाला खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये कर्बोदके मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे तुमची प्रथिनांची गरज राजगिरा किंवा भगर, गायीचे दूध व लिंबाचा वापर करून घरच्या घरी तयार केलेले पनीर, कमी सायीचे दही, शेंगदाणे, मखना, नट्स व काही बिया यांसारख्या अॅमिनो अॅसिड मुबलक असलेल्या पदार्थांमधून भागवा.
* प्रक्रिया केलेल्या पदार्थांऐवजी सकस, नैसर्गिक आणि पोषणयुक्त पदार्थांना प्राधान्य द्या. अशा प्रकारे आरोग्यदायी, आनंदी व उत्साही श्रावण तुम्हाला साजरा करता येईल.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
प्राची रेगे, आहारतज्ज्ञ
following the remedies prescribed we can be healthy and wealthy.