पार्टी, समारंभ आणि खाणे
पावसाळा संपला आणि सणवार सुरू झाले, की आपल्याकडे पार्ट्या, गेटटुगेदर, लग्नसमारंभ अशा सोहळ्यांचे प्रमाण वाढू लागते. सतत अशा पार्ट्या आणि समारंभांमध्ये जाणे, खाणे सुरू झाले, की वजनाचा काटा कधी पुढे सरकला हेच कळत नाही आणि मग पस्तावण्याची वेळ येते. मागून पश्चात्ताप करण्यापेक्षा अशा सोहळ्यांना जाण्यापूर्वी आणि गेल्यावर काय करायचे आणि काय नाही, हे आधीच लक्षात घ्यायला हवे.
आपले काय चुकते?
१. नियोजित भोजन दुपारी असेल (उदा. लग्नसमारंभ किंवा रेस्तराँमधील लंच पार्टी) तर अनेक जण सकाळपासून दुपारपर्यंत उपाशी राहतात, जेणेकरून पंचपक्वान्नांच्या जेवणाचा जास्तीजास्त आनंद घेता येईल. खरे आहे ना हे? याला ‘पैसा वसूल’ वृत्ती म्हणतात. अर्थात, हे प्रत्येकाला लागू होत नाही.पण अशा प्रकारे जेवल्यामुळे अतिरिक्त कॅलरीज पोटात जातात, पचनयंत्रणेवरही अनावश्यक भार पडतो. तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असा वा नसा; अशी वृत्ती हितावह नाही. पहिला नियम म्हणजे पार्टी/सोहळा/कार्यक्रम यासाठी कधीही उपाशी पोटी जाऊ नये. तुम्ही नेहमी जसा नाश्ता घेता तेवढा घ्या आणि समारंभातही मध्यम आहार घ्या. पानात वाढलेले सर्व खाऊ शकता, पण प्रमाणात खा.
२. अतिपेयपान (अल्कोहोलयुक्त आणि अल्कोहोल नसलेली) : दुर्दैवाने आजकालच्या बहुतेक पार्ट्यांमध्ये अल्कोहोलयुक्त पेय हा अविभाज्य घटक झाला आहे. प्रत्येकाला या पेयांमधील पोषणरहित कॅलरीजबद्दल माहीत आहे. पण मद्य समोर येते तेव्हा कोणीही कॅलरीजचा विचार करत नाही. इतर वेळी आपल्या प्रत्येक जेवणानंतर अनेक जण आपल्या अॅपमध्ये कॅलरी तपासण्याबाबत अतिजागरूकता दाखवतात.
प्रमाणात मद्यसेवन करणे ही समस्या नाही, पण अतिमद्यपान केले आणि प्रत्येक घोटासोबत चुकीचे पदार्थ खाल्ले तर त्याचे निश्चितच काही दुष्परिणाम शरीरावर होतात. त्यातच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष धुम्रपानामुळे या दुष्परिणामांची तीव्रता अजूनच वाढते. यासाठीच प्रमाणात मद्यपान करा. तुम्हाला बराच काळ अशा पार्ट्यांमध्ये राहायचे असेल, तर एक ग्लास मद्य घेतल्यानंतर दोन ग्लास साधे लिंबूपाणी प्या आणि त्यानंतर मद्याचा पुढील प्याला प्या.अशा पद्धतीने मद्यपान प्रमाणात होईल. तीन तासांत ६-७ प्याले मद्य घेतले जात असेल, तर या उपायाने त्याच्या निम्मे मद्य सेवन केले जाईल.
३. खाण्यातील अतिरेक टाळा. तुमचा अल्पोपहार चौकसपणे निवडा. खूप प्रक्रिया केलेल्या आणि मिठाचे प्रमाण अधिक असलेल्या पदार्थांपासून दूर राहा. ताजे सलाड, उकडलेली अंडी, उकडलेले चणे वा राजमा किंवा ग्रिल केलेले चिकन/मासे, भाजलेले चणे वा शेंगदाणे (अर्थात प्रमाणात खाणे) हा तुमच्या अल्पोपहारासाठी चांगला पर्याय आहे. तुमच्या नेहमीच्या आहाराची चाकोरी मोडून एखाद्या दिवशी वेगळा आहार घेणे चांगले असते. पण विचारपूर्वक खावे आणि खाणे कधी थांबवायचे, हे तुमचे शरीर तुम्हाला आपोआप सांगेल.
पार्टीला जाणाऱ्या व्यक्तीने काय करावे आणि काय करू नये:
* रिकाम्या पोटी जाऊ नये. वर सांगितल्याप्रमाणे मध्यम प्रमाणात खावे व प्यावे.
* तुमच्या जेवणाची सुरुवात सलाड / सूप / स्टर फ्राय केलेल्या भाज्यांनी करावी. असे केल्याने तुमचे पोट लवकर भरेल आणि जास्त कॅलरी असलेले पदार्थ कमी खाल्ले जातील.
* गोड खाताना त्यातल्या त्यात आरोग्यदायी पदार्थ निवडा. फार गुंतागुंत असलेले किंवा दिसणारे पदार्थ खाणे टाळावे. उदा. आइस्क्रीमचा एक स्कूप किंवा कुल्फीचा एक स्लाइस चालेल. पण रंगीत सिरप, स्प्रिंकलर, साखरेत घोळवलेले नट्स किंवा टुटीफ्रुटी अशा अनावश्यक घटकांचा भरणा नसावा.
* फिटनेसबाबत उत्साही असलेल्या मित्र-मैत्रिणींसोबत /जोडीदारासोबत पार्टीसाठी जाण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला योग्य पदार्थ निवडण्यास मदत होईल आणि तुम्ही प्रमाणात आहार घ्याल.
* स्वतःला हायड्रेटेड ठेवा. भरपूर पाणी प्या.
* दुसऱ्या दिवशी लगेच सामान्य दिनचर्येला आरंभ करा. तुमच्या व्यायामाच्या दिनचर्येत फार सुट्या घेऊ नका. दिवसभर सक्रिय राहा. पार्टीच्या सीझनच्या आधी आणि नंतर पचनक्रियेला चालना देण्यासाठी या व्यायामात कार्डियो व वेट ट्रेनिंग सत्रांचा समावेश करा.
* पार्टीनंतर मर्यादित कॅलरी असलेल्या आहाराचा अवलंब करू नका. जेव्हा तुम्हाला सेमी-डिटॉक्स किंवा डिटॉक्स डाएटचा अवलंब करायचा असतो, तेव्हा काही नियमांचे पालन करावे लागते. केवळ इंटरनेटवर शोधून व विसंबून डिटॉक्स प्लॅन सुरू करू नका. यासाठी आधी आहारतज्ज्ञाचा सल्ला घ्या.
लक्षात ठेवा:
एका अरबट-चरबट खाण्याने तुम्ही जाड होणार नाही आणि एका चांगल्या जेवणाने तुम्ही बारीक होणार नाही. पण या दिवसांमध्ये तुमच्या खूप पार्ट्या होणार असतील, तर तुम्हाला काही नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
प्राची रेगे, आहारतज्ज्ञ