उन्हाळ्यातील खानपान
तापमान वाढत असल्यामुळे उन्हाळा हा बहुतेकांचा नावडता ऋतू असतो. पण तेवढीच त्याची प्रतीक्षाही केली जाते कारण, फळांचा राजा ‘आंबा’ खाण्याचा आनंद याच ऋतूमध्ये मिळतो. परंतु गर्मीच्या या दिवसांत सतत खात राहणे हे आरोग्यासाठी अहितकारक असते. तिखट-तेलकट सतत खाण्याऐवजी काय आणि कसे खावे, हे या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
डिटॉक्ससाठी उत्तम ऋतू:
१. या ऋतूमध्ये दिवस मोठा असल्यामुळे मैदानी खेळांसाठी किंवा बाहेरच्या कामांसाठी भरपूर वेळ मिळतो.
२. वातावरणात उष्मा असल्याने आपल्याला घाम येतो. नैसर्गिकपणे डिटॉक्स करण्यासाठी घाम हा उत्तम मार्ग आहे.
३. या काळात अधिक प्रमाणात द्रवपदार्थांचे सेवन केले जाते, तसेच थंड पदार्थांना अधिक पसंती मिळते.
४. कलिंगड, टरबूज ही फळे याच हंगामात उपलब्ध होतात. पाण्याचे प्रमाण अधिक असणारी ही फळे डिटॉक्ससाठी उत्तम खाद्य आहेत.
उन्हाळ्यात शरीर डिटॉक्स करण्यासाठी याचे सेवन करा:
१. शरीरातून टाकाऊ घटकांचा निचरा होऊन पोषकतत्त्वांची भर शरीरात पडण्यासाठी ‘सुपर हेल्दी फ्लुइड्स’ जसे की –
* इन्फ्युज्ड वॉटर (पाण्यात बडीशेप /धणे/जिरे/पुदिन्याची पाने/तुळशीची पाने/लिंबाची किंवा काकडीची फोड आणि कूलिंग हर्ब्स/मसाले यांचा वापर करा. हे पाणी पिण्याआधी ५-६ तास तरी त्यात वरील जिन्नस घालून ठेवा.)
* भरपूर इलेक्ट्रोलाइट्स असलेले शहाळ्याचे पाणी
* किसलेले आले व चिरलेली पुदिन्याची पाने घालून ताक
* मध, गूळ किंवा साखर घालून कोकम सरबत प्यावे. कोकमाचे आगळ विश्वासार्ह दुकानातून किंवा व्यक्तीकडूनच घ्यावे. त्यावरील लेबल काळजीपूर्वक वाचा आणि या रसात कृत्रिम रंग नसल्याची खात्री करून घ्या. कोकम निसर्गतःच गडद लाल रंगाचे असते. त्यामुळे लाल रंग घातलेले सरबत/ज्यूस अजिबात घेऊ नये.
* उसाचा रस: कॅलरी या घटकामुळे काहीसे विस्मरणात गेलेले असे हे पेय आहे. उसाचा रस हे नैसर्गिक थंडावा देणारे पेय आहे. यात भरपूर अँटिऑक्सिडंट्स आणि डिटॉक्सचे गुणधर्म असतात. हे डाययुरेटिक (लघवीचे प्रमाण वाढविणारे) पेय आहे. त्यामुळे मूत्रमार्गाला झालेल्या संसर्गाविरुद्ध उसाच्या रसातील घटक लढा देतात. त्यामुळे हा रस प्यायला काहीच हरकत नाही.
* सत्तूचे पेय: प्रथिनांची आवड असलेल्यांसाठी उत्तम असे हे पेय. व्यायाम केल्यानंतर ‘व्हे’ या प्रोटिन शेकऐवजी प्रथिनांचे भरपूर प्रमाण असलेले सत्तूचे पेय प्या. यात शरीराला थंडावा देणारे गुणधर्मही असतात. ते बहुधा लिंबू पाण्यात
किंवा ताकात घातले जाते. त्यात जिरेपूड व इतर मसाले घालून उन्हाळ्यात हे पेय प्यायले जाते. सत्तूचे पीठ (भाजलेले चण्याचे पीठ) ऑनलाइन किंवा स्थानिक दुकानांमध्ये सहज उपलब्ध आहे.
२. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, तुमच्या जेवणात तंतुमय पदार्थांचा मुबलक वापर करा, जेणेकरून चयापचय क्रिया चांगली होईल. हिरव्या पालेभाज्या, परतवलेल्या भाज्या, सलाड्स, गार सूपचा दैनंदिन आहारात वापर करावा. दररोज काकडी खाण्यास विसरू नका.
३. कणीक, मैदा यांसारख्या आम्लयुक्त भरड धान्यांचा वापर कमी करा आणि नाचणी, ज्वारी किंवा राजगिरासारख्या अल्कलीयुक्त धान्यांचा वापर करा.
४. शरीर थंड ठेवण्यासाठी या ऋतूमध्ये दररोज किमान १-३ टीस्पून सब्जा पाण्यातून सेवन करा.
५. अतिप्रमाणात तेलकट, तुपकट आणि चरबीयुक्त अशा आहारापासून लांब राहा.
६. मासांहाराचे प्रमाण कमी करून भरपूर भाज्या खाणे हितावह ठरू शकते. मांस/मासे यांसाठी उष्ण हवामान फार चांगले नसते आणि भारतात हे जिन्नस कशा प्रकारे विकले जातात, हे आपल्याला चांगलेच माहीत आहे.
७. आंबा, कैरी, कलिंगड, टरबूज, बोरे अशा मौसमी फळांचा भरपूर आस्वाद घ्या. यातील कॅलरीज मोजू नका, तर पोषक घटक मोजा.
वर नमूद केलेले नियम अनुसरले, तर गर्मीच्या या काळात तुम्हाला आपले शरीर गारेगार ठेवणे नक्कीच शक्य होईल.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
प्राची रेगे, आहारतज्ज्ञ