सणाच्या दिवसांतील आहार
गणपतीपासून सुरू होणारा सणांचा माहौल दसरा-दिवाळीपर्यंत कायम असतो. सणांचा हा काळ म्हणजे उत्साह आणि आप्तेष्टांसोबतची धमाल हे समीकरण ठरलेले असते. सगळ्या कुटुंबासोबत, आप्तेष्टांसोबत मजामस्ती करताना विविध चमचमीत पदार्थ व मिष्टान्नांवर हमखास ताव मारला जातो.पण हा आहार सकस, संतुलित आहे की नाही, याचा कोणीही फारसा विचार करत नाही. खाताना थोडे बंधन पाळले नाही किंवा काही मूलभूत नियम पाळले नाही, तर हायपरअॅसिडिटी, अपचन, पोटाच्या समस्या आणि महत्त्वाचे म्हणजे वजन वाढण्याची समस्या आपल्याला सतावू शकते.
सणासुदीच्या या दिवसांत पुढील नियम पाळा आणि तंदुरुस्त राहा :
१. मिष्टान्नाची निवड करताना :
* चांदीचा वर्ख लावलेल्या पदार्थांपासून लांब राहा. चांदीच्या वर्खात अनेकदा अॅल्युमिनियमची भेसळ केलेली असते. त्याचप्रमाणे माव्यातही स्टार्च, ब्लोटिंग पेपर किंवा घातक रसायनांची भेसळ केल्याचे आपण अनेकदा ऐकतो. हे भेसळयुक्त घटक समजण्याचा काहीच मार्ग आपल्याकडे नाही.त्यामुळे अपरिचित स्रोतांकडून आणलेले असे पदार्थ खाऊ नयेत.
* सुका मेवा, खजूर, काजू, खोबरे, बेसन आणि घरगुती खव्यापासून घरी तयार केलेले गोड पदार्थ खाणे कधीही सुरक्षित. बेसन लाडू, रवा-ओल्या खोबऱ्याचा लाडू, खजूर-बदाम बर्फी इत्यादींमधून तुम्ही निवड करू शकता.
* कृत्रिम रंग किंवा स्वाद घातलेली मिठाई टाळलेलीच बरी! शक्यतो नैसर्गिक घटक असलेली मिठाई निवडा. आपण बहुदा छान रंगसंगती असलेल्या मिठाईकडे आकर्षित होतो. पण लक्षात ठेवा, त्यात भरपूर कॅलरीज तर असतात शिवाय कृत्रिम रंग, कृत्रिम स्वाद, प्रिझर्व्हेटिव्हज, बल्किंग एजंट्स, स्टॅबिलायझर्स, इमल्सिफायर्स इत्यादी घटकही मुबलक प्रमाणात असतात.
* उत्पादनांची एक्सपायरी डेट तपासूनच मिठाई खरेदी करा. तसेच तुम्हाला माहीत असलेल्या दुकानांमधूनच किंवा व्यक्तींकडूनच ही मिठाई विकत घ्या.
* मिठाईच्या खोक्यावरील (बॉक्स) न्यूट्रिशन लेबल वाचा. ट्रान्स-फॅट समाविष्ट असलेले गोड पदार्थ, कुकीज, बिस्किटे, केक टाळा. या पदार्थांमध्ये हायड्रोजनेटेड किंवा पार्शिअली हायड्रोजनेटेड फॅट, व्हेजिटेबल किंवा बेकरी शॉर्टनिंग किंवा वनस्पती डालडा तूप असल्याचे नमूद केलेले असेल. हे फॅट्स अनेक प्रकारच्या वैद्यकीय समस्यांना कारणीभूत ठरतात. गायीचे शुद्ध तूप घालून केलेले पदार्थच शक्यतो खावेत.
२. ‘प्रमाणात खाणे,’ ही सगळ्याचीच गुरुकिल्ली आहे. तळलेले पदार्थ किंवा गोडाचे पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त खाऊ नका. इतर सकस आहाराचीही जोड द्या. तुमच्या आहारात भाज्या, सलाड्स, ताजी फळे यांचा समावेश करून संतुलन राखा.
३. सणाच्या दिवसांत चमचमीत, गोड पदार्थ खाऊन कमावलेल्या अतिरिक्त कॅलरीज अॅक्टिव्ह राहून बर्न करा. यासाठी ब्रिस्क वॉक, मैदानी खेळ, योगासने, नृत्य हे पर्याय आहेत. दररोज किमान ३० ते ४० मिनिटांचा व्यायाम आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या चयापचय आणि पचन संस्थेचे आरोग्य उत्तम राहील.
४. भरपूर पाणी प्या. यासाठी तुम्ही लिंबू पाणी, शहाळ्याचे पाणी, आवळा-आले घातलेले किंवा जिरे, ओवा, पुदिना किंवा तुळशीचा अर्क घातलेले पाणी पिऊ शकता. या पाण्यात साखर, गूळ, मध किंवा मीठ घालू नका. ते नैसर्गिक स्वरूपात असणे अपेक्षित आहे. सोडायुक्त पेये वा फळांचे रस टाळा. तुमचा दिवस लिंबू पाण्याने सुरू करा.
५. हर्बल टी घेणे हीसुद्धा एक चांगली सवय आहे. मुबलक अँटिऑक्सिडंट्स असलेला हर्बल चहा पिण्याची सुरुवात करण्यासाठी नोव्हेंबर हा एक उत्तम महिना आहे. ग्रीन टी, मोरिंगा टी, तुळस, आले किंवा पेपरमिंट टी पिऊन शरीर नैसर्गिकरीत्या अल्कलाइझ व डिटॉक्सिफाय करू शकता.
६. तुमच्या सणासुदीच्या जेवणाचे नियोजन करा. सणासुदीच्या दिवसातील आहार म्हणजे पिझ्झा, बर्गर किंवा चायनीज पदार्थ नव्हे, उलट या दिवसांमध्ये पारंपरिक हंगामी पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करायचा असतो.
७. सावकाश आणि मनापासून खा. प्रत्येक घास हळुवार चावा. त्यामुळे तुम्ही जास्त खाणार नाही, याची पचनालाही मदत होईल. चांगली झोप घ्या.वेळेवर झोपा. झोप पूर्ण झाली नाही, तर पचन यंत्रणेवर परिणाम होतो आणि हायपरअॅसिडिटी, पोट जड होणे, बद्धकोष्ठता किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मतानुसार प्रमाणात आहार घेणे आणि सणासुदीच्या दिवसांमध्येही फिटनेस राखण्याच्या दृष्टीने पुरेसा व्यायाम केल्याने तुम्ही तुमचे आरोग्य उत्तम राखू शकता.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
प्राची रेगे, आहारतज्ज्ञ