रताळ्याचा खमंग उपवासाचा चिवडा
साहित्य: १/४ किलो रताळी, २ ते ३ मोठे चमचे काश्मिरी मिरची पावडर, १/४ छोटा चमचा पिठीसाखर, १/४ वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, १/४ वाटी शेंगदाणे, १/४ वाटी काजू, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती: प्रथम रताळ्याची साले काढून घ्या. एका कढईत तेल गरम करून खोबऱ्याचे काप, शेंगदाणे व काजू हे सर्व वेगवेगळे तळून घ्या व टिश्यू पेपरवर काढा. नंतर सोललेली रताळी किसणीने किसून थोडासा किस तेलात तळून घ्या. तळलेला हा किस टिश्यूपेपरवर काढा. आता हे सर्व मिश्रण एका परातीत घालून त्यामध्ये तिखट, मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या व शेवटी चिमूटभर पिठीसाखर घालून मिश्रण पुन्हा एकदा हलक्या हाताने एकजीव करा. खमंग व चटपटीत असा चिवडा तयार आहे.
टीप: चिवड्यात तिखट घालायचे नसल्यास हिरव्या मिरचीचे तुकडे घालता येतील. मिरच्या घातल्यास चिवड्याला पांढरट रंग येईल.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
योगीता गांधी, मुंबई