घरगुती बागेतील उपयुक्त भाज्या
घरगुती बागेची हौस बाल्कनीतल्या कुंड्यांमधील झाडांवर भागवताना वनस्पतींचे उपयोगही बघायला हवेत. बागेत किंवा गॅलरीत अशी झाडे लावताना निसर्ग जोपासण्याची आवड तर जपता येते, पण त्याचबरोबर रोजच्या आहारात, जीवनशैलीत त्यांचा आरोग्यदायी वापरही करून घेता येतो.
जसे की लिंबाचे झाड. झाडाला लिंबे येतील तेव्हा येतील, पण रोजच्या चहामध्ये लिंबाची दोन पाने टाकून पाहा, एक वेगळाच तजेला मिळतो.चहाचा विषय निघालाच आहे तर चहामध्ये टाकायला गवती चहा, तुळस, पुदिना, आले, ओवा अशी वेगवेगळी पाने आपल्याला या घरगुती बागेतून मिळू शकतात. त्याचबरोबर अनेक फुले जसे की जास्वंद, गुलाब, गोकर्ण, मोगरा, सोनचाफा यांसारक्चया फुलांचाही चहा उ॔ाम होतो. उ॔ाम रंग-गंध असलेले हे चहा आरोग्यासाठी हितकारक आहेत.
आपल्या बागेत एक तरी अडुळशाचे झुडूप आणि कोरफडाचे रोप असावे. अडुळशाचा काढा सर्व प्रकारच्या श्वसनविकारांवर रामबाण उपाय आहे. तर कोरफड आपल्या शरीरातील टॉक्सिन्स दूर करण्याचे महत्त्वाचे काम करते. कोरफडीचा गर चवीला कडू लागतो, मात्र त्याचे सरबत खूप छान लागते.बागेत तुक्वही लावा अथवा लावू नका; गुलबक्षी सहजच उगवून येते. संध्याकाळी हिची लांब देठाची गुलाबी, पिवळी, पांढरी कधी मिश्र रंगाची फुले फुलतात. या गुलबक्षीच्या पानांची भजी बनवता येते. नेहमीच्या त्याच त्याच भज्यांपेक्षा काही वेगळी चव या निमि॔ाने चाखता येईल. त्याच्या बरोबरीने बागेतील पानओव्याच्या पानांची भजीही करता येईल. ही भजी अनेकांना आवडते. ओव्यामुळे पोटदुखीचा त्रास कमी होतो.
बागेचा एक कोपरा भाजी-पाल्यासाठी राखून ठेवायला हवा. गॅलरी असेल किंवा एखादी खिडकी असली तरी त्याच्या ग्रीलमध्ये आपण ‘मायक्रोग्रीन्स’ उगवून त्यांचा स्वयंपाकात वापर करू शकतो. ‘मायक्रोग्रीन्स’ म्हणजे काही वेगळे नसून आपण पारंपरिकरित्या खात असलेल्या कोवळ्या भाज्या होय. जसे की वाळूतली मेथी, रोव इ. बिया पेरल्यानंतर पहिली चार पाने आली की तयार झाले ‘मायक्रोग्रीन्स’. घरातील छोटे रिकामे डबे, ट्रे यांच्यावर केवळ २ इंच जाडीचा मातीचा थर ठेवून आपण ही लागवड करू शकतो. ८ ते १० दिवसांत तयार होणारे माठाचे ‘मायक्रोग्रीन्स’ हे एक जुडी भाजीपेक्षा ४० टक्के अधिक पौष्टिक असतात. यासाठीची बियाणे आपल्या स्वयंपाकघरातच मिळतील. मोहरी, जिरे, धणे, बडीशेप, बाळंतशोप यांसारखे मसाले तसेच गहू, ज्वारी, नाचणी यांसारखी धान्ये पेरून त्यांच्यापासून तयार झालेल्या ‘मायक्रोग्रीन्स’चा वापर पराठे, थालीपीठ, सूप बनवताना केला जाऊ शकतो. तर, कोशिंबीर किंवा सँडविचमध्ये कच्चे ‘मायक्रोग्रीन्स’ खाता येतील.
बागेची देखभाल करताना काही तण उपटले जाते, या तणांचे नीट निरीक्षण केले तर त्यात अनेक रानभाज्या आढळून येतात. जसे की आघाडा, घोळ, केना, आंबुशी इत्यादी. आघाडा पूजेमध्ये वापरला जातो. याच्या पानांची पाठीमागची बाजू पांढरट असते. घोळ या लालसर मांसल खोडाला छोटी हिरवी जाड पाने येतात. केनाची पाने लांब गोलाकार असतात. आंबुशीची बदामाच्या आकाराची पाने फुलासारखी पातळ खोडाला जोडलेली असतात.घरात काही भाजी नसल्यास या रानभाज्या वेगवेगळ्या किंवा एकत्र करून साधी कांदा-मिरची घालून भाजी करता येते.
घरगुती बागेतील रोपांपासून बनविण्यात येणाऱ्या पाककृती
१. हर्बल चहा :
गवती चहा, तुळस आणि पुदिना यांपैकी कोणतीही पाने घालून करावयाच्या एक कप चहासाठी दीड कप पाणी उकळत ठेवावे. त्यात गवती चहाची मोठी दोन पाती छोटे तुकडे करून टाकावी. तुळशीची आणि पुदिन्याची साधारण १० पाने घ्यावीत. लिंबाची तीन ते चार पाने पुरे होतात. पाने स्वच्छ धुवून मगच उकळायला टाकावीत. पाणी उकळू लागले की गॅस मंद करावा आणि पाच मिनिटांपर्यंत चांगले उकळावे. लगेच गाळून पिऊ शकता.चहाची चव हवी असल्यास त्यात शेवटी चमचाभर गूळ/साखर आणि अर्धा छोटा चमचा चहा पावडर घालून गॅस बंद करा आणि मिनिटभर मुरू द्या. हा चहा दूध घालूनही पिऊ शकता.
२. फुलांचा चहा :
जास्वंद, गुलाब, गोकर्ण, मोगरा, सोनचाफा यांसारख्या सर्व फुलांचा चहा बनवायचा असेल तर कृती सारखीच आहे. पण फुलांचे प्रमाण बदलत जाते. एक कप चहा बनविण्यासाठी एका कपापेक्षा थोडे जास्त पाणी घ्यावे. एक कप चहासाठी जास्वंद आणि गुलाबाचे एक छोटे फूल, गोकर्णाची दोन ते तीन फुले, मोगऱ्याची तीन ते चार फुले, सोनचाफ्याचे एक फूल पुरेसे आहे. फुलांच्या पाकळ्या काढून स्वच्छ धुऊन घ्या. पाणी उकळत ठेवा.पाणी उकळू लागले की त्यात फुलांच्या पाकळ्या टाका आणि गॅस बंद करा. काही क्षणातच पाकळ्या रंग सोडू लागतील आणि फुलांचा सुगंध पसरू लागेल. पाकळ्या पूर्णपणे पांढरट किंवा रंगविहीन झाल्या तसेच पाण्यामध्ये फुलांचा रंग उतरला आहे असे दिसले की गाळून घ्या. हा चहा असाच प्यायला खूप छान लागतो. चहाची चव हवी असेल तर थोडी साखर घालू शकता. पण यात चहा पावडर किंवा दूध घालू शकत नाही. अन्यथा रंग बदलतो आणि फुलांचा स्वाद आणि सुवास मिळत नाही. गोकर्णाच्या चहामध्ये लिंबू पिळले असता त्याचा निळा रंग बदलून गुलबट जांभळा होतो.ऋतुमानानुसार हे चहा थंड करून सरबतासारखेही पिऊ शकता.
३. अडुळशाचा काढा :
खोकल्यावर गुणकारी अडुळशाचा दोन ग्लास काढा तयार करण्यासाठी चार पाने अडुळसा, वीस पाने तुळस, चार काळेमिरे, एक इंच आले ठेचून ते चार ग्लास पाण्यामध्ये उकळत ठेवावे. हे पाणी अर्धे झाले की त्यात आवडीनुसार गूळ घालून विरघळवून घ्यावा. हा काढा गाळून घ्यावा. जमेल तसे थोडे थोडे पित राहावे. उलटीद्वारे किंवा शौचाद्वारे कफ बाहेर पडतो. (शौचास चिकट झाले तर घाबरू नये. लहान मुलांना तसे सांगून ठेवावे.) उरलेल्या चोथ्यात पुन्हा दोन ग्लास पाणी घालून ते एक ग्लास होईपर्यंत उकळा व गाळून घ्या.
४. कोरफडीचे सरबत :
कोरफडीची जाड पात काढून स्वच्छ धुवून घ्यावी. त्याच्या कडेचे काटे सुरीने कापून आतील गर काढून घ्यावा. चार ग्लास सरबत करण्यासाठी साधारणतः दोन जाड पातीचा गर लागेल. हा गर ज्यूसरमध्ये घेऊन त्यात एक इंच आल्याचा किस, दोन लिंबांचा रस, ८ छोटे चमचे साखर, (आवडीनुसार कमी जास्त करू शकता.) आवडीनुसार बर्फाचे तुकडे आणि थोडे-थोडे पाणी घालून ढवळत राहा. गर पूर्ण बारीक झाल्यावर त्यात उरलेले पाणी घालून सरबत तयार करा. गराचा काही भाग तोंडात येऊ शकतो, जो छान लागतो. पण आवडत नसेल तर गाळून घ्या. यात सोडाही घालू शकता. हे उत्साहवर्धक पेय उन्हाळ्यातील पित्त व उष्णतेच्या विकारांवर उपयुक्त आहे.
५. केना, गुलबक्षी आणि ओव्याच्या पानाची भजी :
केना, ओवा तथा गुलबक्षीची पाने धुऊन कोरडी करून ठेवावीत. बटाट्याची भजी करण्यासाठी
ज्याप्रमाणे पीठ तयार करतो तसेच पीठ तयार करावे. त्यासाठी दोन मोठे चमचे बेसन, अर्धा मोठा चमचा तांदळाचे पीठ, एक छोटा चमचा तिखट, पाव छोटा चमचा हळद, पाव छोटा चमचा ओवा, अर्धा छोटा चमचा धणेपूड, चवीनुसार मीठ एकत्र भिजवावे. त्यावर दोन छोटे चमचे तेल कडक तापवून मोहन घालावे. पीठ जास्त पातळ असू नये. पीठ किमान दहा मिनिटे भिजत ठेवावे. कढईत भजी तळण्यासाठी तेल कडकडीत गरम करून पाने पिठात बुडवून भजी तळावी. गुलबक्षीच्या पानांची भजी मऊ पडत नाहीत, खूप वेळपर्यंत कुरकुरीत राहतात.
६. आंबुशीचे वरण :
आंबुशीची पाने चवीला आंबट असतात. त्याचा वापर वरणात करता येतो. हे वरण बनवण्यासाठी एक वाटी तूर, मूग किंवा मसुरची डाळ, एक वाटी आंबुशीची पाने, एक छोटा चमचा गोडा मसाला, एक छोटा चमचा चिरलेला गूळ, दोन छोटे चमचे फोडणीसाठी तेल, प्रत्येकी अर्धा छोटा चमचा जिरे-मोहरी, पाव छोटा चमचा हिंग, एक छोटा चमचा तिखट, अर्धा छोटा चमचा हळद, ८ ते १० कढीपत्त्याची पाने, चवीनुसार मीठ घ्यावे. प्रथम डाळ शिजवून घ्यावी. आंबुशीची पाने धुऊन घ्यावीत. डाळीत गोडा मसाला आणि गूळ घालून उकळत ठेवावे. त्यात आंबुशीची पाने टाकावीत. फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी तडतडल्यावर जिरे, कढीपत्ता, हिंग, हळद व तिखट घाला. ही फोडणी वरणावर घालावी आणि एक उकळी आणून गॅस बंद करावा.आंबुशीचे आंबट-गोड वरण तयार होते. जर गोडसर चव आवडत नसेल, तर लसणीची फोडणी द्यावी आणि गूळ घालू नये.
७. जास्वंदीचे तेल :
‘जपाकुसुम तेल’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या जास्वंदीच्या तेलाने नियमित मसाज केल्याने कोंडा, केस गळणे यांसारख्या समस्या दूर होतात. यासाठी जास्वंदाची प्रत्येकी २५ फुले आणि पाने, चार वाट्या खोबऱ्याचे तेल घ्या. प्रथम फुलांच्या पाकळ्या आणि पाने धुऊन कोरडी करून घ्यावीत. तेल मंद आचेवर गरम करत ठेवावे. त्यात जास्वंदीच्या पाकळ्या आणि पाने टाकावीत आणि ते कढवत ठेवा. फुले आणि पानांमधील पाण्याचा अंश निघेपर्यंत तेल गरम करत राहा. गॅस बंद केल्यावर तेल गार होऊ द्या व नंतर गाळून बाटलीत भरून ठेवा. लागेल तसे वापरावे. जास्वंदीच्या पानांचा गर फ्रीजमध्ये ठेवून आठवडाभर वापरू शकतो.
६. घोळचे मुटके किंवा फुनकेः
घोळ ही भाजी घोळू, चिवळ, चिगळ, चिऊ अशा विविध नावाने ओळखली जाते. तिच्यापासून बनवले जाणारे मुटके ही एक पारंपरिक पाककृती आहे. मुटञ्चयांसाठी एक वाटी घोळची निवडलेली भाजी, एक मध्यम आकाराचा कांदा (बारीक कापून), अर्धी वाटी तूरडाळ, अर्धी वाटी चण्याची डाळ, चार हिरव्या मिरच्या, ८ ते १० लसूण पाकळ्या, अर्धा छोटा चमचा जिरे, पाव छोटा चमचा हळद, अर्धा छोटा चमचा तिखट, चवीनुसार मीठ, गरजेनुसार तेल घ्यावे.
तूरडाळ आणि चणाडाळ तीन तास भिजत ठेवा. त्यातील पाणी निथळून त्या मिक्सरमध्ये भरड वाटाव्या. डाळी वाटत असतानाच त्यात जिरे, लसूण आणि मिरची घालावी. घोळची भाजी स्वच्छ धुऊन पाणी निथळून मग बारीक चिरावी. त्यात मसाल्यासकट वाटलेली ही डाळ टाकावी. नंतर यात मीठ,हळद, तिखट घालावे आणि चांगले मळून घ्यावे, कोरडे वाटले तर थोडे पाणी अंदाजाने घालावे. मुटके वळतील इतपत ओलसर करावे. जर जास्त ओलसर वाटले तर त्यात थोडे ज्वारी अथवा बाजारीचे पीठ घालावे. हाताला तेल लावून या पिठाचे छोटे लांब-गोल मुटके करून घ्यावेत. उकडपात्रात जाळीला तेलाचा हात लावून घ्यावा. त्यावर हे मुटके ठेवून १५ ते २० मिनिटे चांगले वाफवून घ्यावेत. जेवायला घेताना हे मुटके फोडून भात किंवा भाकरीवर घ्यावेत. असे मुटके बेसन-ज्वारी-बाजरीचे पीठ वापरूनही करतात. विदर्भ आणि मराठवाड्यात याच्या बरोबर खाण्यासाठी ताकाची कढी केली जाते. त्यात हे फुनके कुस्करून भाकरीबरोबर खाल्ले जातात. तर कोकणात हे मुटके तांदळाची कणी, ओले खोबरे आणि कोकम वापरून बनवले जातात.