एलनीर पायासम (शहाळ्याचे पायासम)
साहित्य: अर्धा लिटर साय असलेले दूध, १ कप कंडेन्स्ड मिल्क, १/२ छोटा चमचा वेलचीपूड, १ छोटा चमचा तूप, थोडे काजू, १/२ कप नारळाचे दूध, १/२ कप शहाळ्याची मलई, शहाळ्यातील खोबऱ्याचे काही तुकडे.
कृती: एका खोलगट कढईत दूध आटवत ठेवा.सतत ढवळून ते अर्धे होईपर्यंत आटवा. बाजूला लागलेली साय खरवडून घ्या आणि दुधात एकत्र करून घ्या. त्यात कंडेन्स्ड मिल्क, वेलचीपूड घाला आणि मिसळून घ्या. गॅस बंद करा. दूध पूर्ण थंड होऊ द्या. आता एका छोट्या कढईत तूप गरम करून त्यात काजू तळून घ्या व बाजूला ठेवा. ओल्या खोबऱ्याचे तुकडे आणि पाणी मिक्सरच्या भांड्यात घाला. हे मिश्रण फिरवून मऊ करून घ्या. आता मलमलच्या कापडातून हे मिश्रण गाळून घेऊन त्यातून घट्ट नारळाचे दूध काढून घ्या. साधारण १/२ कप नारळाचे दूध इथे आपल्याला हवे आहे. शहाळ्याचे ताजे पाणी एका पातेल्यात काढून घ्या. मिक्सरच्या भांड्यात शहाळ्यातील मलई, शहाळ्याचे पाणी घालून ते वाटून घ्या आणि घट्टसर प्युरी तयार करा. आता शहाळ्यातील खोबऱ्याचे बारीक तुकडे करा. तापवून थंड केलेल्या दुधाच्या मिश्रणात खोबऱ्याची प्युरी, घट्ट नारळाचे दूध आणि शहाळ्यातील खोबऱ्याचे तुकडे घाला. ते नीट मिक्स करून घ्या आणि शेवटी त्यात भाजलेल्या काजूचे तुकडे घालून नीट ढवळून घ्या. शहाळ्याचे पायासम तयार आहे.आता त्याचा आस्वाद घेता येईल.
दक्षिण भारतातील ही पाककृती अनेकांच्या खास आवडीची आहे. अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
शेफ उमेश तांबे