बडेनकई येन्नेगई (भरली वांगी)
कर्नाटकातील भरल्या वांग्यांची ही एक वैशिष्ट्यपूर्ण आणि लोकप्रिय पाककृती आहे. घट्ट आणि चमचमीत खोबऱ्याचे वाटण (सारण) भरून ही भरली वांगी केली जातात. जोलादा (ज्वारी आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेली) रोटी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत हे भरले वांगे वाढले जाते.
साहित्य : लहान आकाराची १० वांगी, ३ मोठे चमचे तेल, १ छोटा चमचा मोहरी, कढीपत्ता, अर्धा कप पाणी.
सारणासाठी लागणारे साहित्यः पाव कप शेंगदाणे, २ छोटे चमचे काळे तीळ, २ छोटे चमचे तेल, २ छोटे चमचे चणाडाळ, १ छोटा चमचा धणे, १ छोटा चमचा जिरे, १/४ छोटा चमचा मेथीचे दाणे, १० लाल मिरच्या, थोडी कढीपत्त्याची पाने, अर्धा कप सुके खोबरे, थोडी चिंच, १ छोटा चमचा गूळ, १/४ छोटा चमचा हळद, १ छोटा चमचा मीठ, १/२ कप पाणी.
कृती : देठ न कापता वांग्यांना दोन उभ्या चिरा द्या. मसाल्याच्या सारणाचे सर्व साहित्य कमी आचेवर भाजा आणि त्याची पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट सगळ्या वांग्यांमध्ये भरून वांगी बाजूला ठेवा. आता एका मोठ्या कढईत तीन मोठे चमचे तेल गरम करा आणि त्यात मोहरी आणि कढीपत्त्याची काही पाने घाला. भरलेली वांगी त्यात घाला आणि मध्यम आचेवर ठेवा. वांग्यांचा रंग बदलेपर्यंत शिजू द्या. आता राहिलेल्या मसाला पेस्टमध्ये अर्धा कप पाणी घाला आणि नीट मिसळून आपल्या पसंतीप्रमाणे दाटपणा ठेवा. त्यानंतर झाकण ठेवून २० मिनिटे शिजवा किंवा प्रेशर कुकरमध्ये दोन शिट्ट्या काढा. वांगे पूर्ण शिजल्यावर तेल वेगळे होते. जोलादा रोटी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत भरल्या वांग्यांचा आस्वाद घ्या.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
शेफ मयुर कामत