आठवणीतली लग्नपंगत
माझ्या आठवणीतली पहिली ‘लग्नपंगत’ म्हणजे कोल्हापूरजवळच्या पट्टण कोडोलीतली. त्या वेळी तिथे बिरोबाची जत्रा होती. आम्ही ज्यांच्या घरी गेलो होतो, त्या घरी भावकीतले पाहुणे आले होते. कमलआक्का चहा घेऊन पडवीत आली आणि कोणाच्याही ध्यानीमनी नसताना तिचे लग्न त्या बसल्या बैठकीला ठरले. नवरामुलगा मिलिट्रीतला, त्याला सुट्टी नसल्याने त्याच दिवशी संध्याकाळी लग्न लावायचे ठरले. भराभर गल्लीतल्या बायका जमल्या, त्यांनी तांदूळ आणि डाळी निवडल्या, प्रत्येकाने मळ्यातल्या भाज्या आणल्या, कुणी शिंकाळ्यावरचे भोपळे आणले. मोठ्या चुल्हाण्यावर जाडा रवा भाजला. लग्न लागेपर्यंत स्वयंपाक तयारही झाला. मग, दिवटीच्या उजेडात गल्लीत दोन्ही बाजूला पत्रावळीवर पंगती बसल्या. भात, आमटी, लाल भोपळ्याचे कालवण आणि ताटली भरून पातळसर शिरा असे ते लग्नाचे जेवण होते. नवरा-नवरी आलेल्या पाहुण्यांना शिऱ्याचा आग्रह करत होते, पाहुणेमंडळी समाधानाने जेवत होती.
मांडवातील लग्ने
त्याकाळी नवऱ्या मुलीच्या दारात मांडव घालून लग्ने व्हायची. मुहूर्तमेढ, तोरण बांधण्याच्या कार्यक्रमासाठी आलेल्या बायकांना केळे आणि पानसुपारी दिली जायची. लग्नाच्या आदल्या दिवशीचे जेवण म्हणजे, केळी घातलेला सुधारस किंवा साखरभात, तिखटजाळ वांग्याची भाजी, कढी आणि तांदूळ भाजून केलेली सोजी. त्या जेवणासाठी फक्त लग्नघरात जमलेली पाहुणे मंडळी, जवळचे शेजारी किंवा कौटुंबिक मित्र असत. लग्नाच्या दिवशी सकाळी हळदीच्या वेळी, चिवडालाडूची ताटे फिरवली जात. नाश्त्याचे ताजे पदार्थ द्यायची पद्धत तेव्हा नव्हती. अक्षता पडायच्या अगोदर नवरदेव, त्याची आई, वडील, भाऊ, बहीण यांच्यासाठी रुखवाताचे जेवण करायची पद्धत होती. त्यात भल्यामोठ्या करंज्या, चकल्या, अनारसे, गव्हल्यांची खीर आणि नारळाएवढे लाडू वाढत. अखेरीस दूध दिले जाई.
तर लग्नाच्या मुख्य जेवणात ताटात डाव्या बाजूला खोबऱ्याची किंवा डांगराची चटणी, लोणचे, कोशिंबीर, लिंबू. उजव्या बाजूला वांगे-बटाट्याची भाजी, आमटी आणि तळण. पहिला वरणभात संपला, की काळा म्हणजे मसालेभात वाढला जायचा. त्यानंतर लग्नाचे पक्वान्न म्हणजे जिलेबी किंवा बुंदीचे लाडू वाढत. जिलेबी असेल तर मठ्ठाही असायचा आणि शेवटी परत पांढरा भात, त्यावर दही किंवा ताक वाढत. पंगतीला घरची यजमानीण तूप वाढायची. नवरा-नवरी आग्रहाने पक्वान्ने वाढत. पाहुणेमंडळींमधील काहीजण पैजा लावून पक्वान्ने खात. अशा पंगतीत लहान मुलांना श्लोक म्हणावे लागत. जेवणाऱ्या प्रत्येकाला दक्षिणाही मिळायची. मोठ्या पडवीत, लांबलचक चटया अंथरून किंवा पाट मांडून पत्रावळ किंवा केळीच्या पानांवर या पंगती बसत. पानांभोवती वेलबुट्टीच्या रांगोळ्या काढलेल्या असत. दहा-बारा पानांच्यामध्ये बटाट्यात उदबत्त्या खोचून ठेवत. नवरा-नवरीची पंगत विशेष असायची. नवरी एकटीच सासर-माहेरच्या पुरुषमंडळींबरोबर जेवायची. त्या वेळी बायकांनी मांडी घालून जेवायला बसण्याची पद्धत नव्हती. बायका अर्धी मांडी घालून, एक पाय गुडघ्यात मुडपून जेवायला बसत. जेवताना नवरा-नवरी एकमेकांना गोडाचा घास भरवत.
विहिणीची पंगत
या लग्नांमध्ये खास म्हणजे ‘विहिणीची पंगत’ असायची. नवरदेवाच्या आईला त्यात विशेष मान असायचा. मुलीची आई विहिणीला अक्षत देऊन जेवणाचे निमंत्रण द्यायची. मग विहिणबाई आणि तिच्या नातेवाईक स्त्रिया जेवायला येत. विदर्भ आणि खानदेशात ‘विहिणीची पंगत’ ही सर्वांत खास लग्नपंगत असते. त्या भागात तर विहिणीला सजवलेल्या पालखीतून, कारल्याच्या मांडवाखालून जेवायला घेऊन येतात.
विहिणीच्या पंगतीतील स्त्रियांना बसायला पाट, समोर चौरंगावर पाने वाढलेली असत. चौरंगाभोवती मोठाल्या रांगोळ्या काढल्या जात, गुलाबपाणी शिंपडत. नवऱ्या मुलीच्या घरच्या स्त्रिया या पंगतीला करंजी, लाडू, चिरोटे, खीर आणि लग्नाचे मुख्य पक्वान्न अशी पंचपक्वान्ने वाढत. त्यातल्या काहीजणी करुण आवाजात ‘विहिणी’ (आमची लाडाकोडात वाढलेली मुलगी तुम्हाला दिली आहे. तिचे काही चुकले तर तुम्ही तिला सांभाळून घ्या अशा अर्थाची गाणी) गात. पंगतीत सर्वांत शेवटी कालवलेला दहीभात वाढला जायचा. जेवल्यानंतर सगळ्यांना विडे दिले जात.
कार्यालयातील लग्ने
कालांतराने कार्यालयात लग्ने व्हायला लागली. तिथल्या पंगती टेबल-खुर्च्यांवर असत. इकडे लग्न लागले, की तिकडे जेवणाच्या पंगती वाढायला सुरुवात होत असे. टेबल-खुच्र्या मोजक्याच असल्याने पुढच्या पंगतीत आपला नंबर लागावा म्हणून जेवणाऱ्यांच्या मागेच अनेक वऱ्हाडी मंडळी उभी असत. तेव्हासुद्धा विहिणींची किंवा खाशा पाहुण्यांच्या पंगतीला पाट आणि चौरंगाचा थाट असायचा.
पुणे, मिरज आणि बेळगाव ही गावे लग्नसमारंभांसाठी फारच प्रसिद्ध होती. पुण्यातील लग्नाच्या जेवणात अळूचे फतफते, वांग्याची भाजी आणि पाच की सहा आकडी जिलेबी (मी ती कधी पाहिलेली नाही, पण ऐकली मात्र आहे) फारच प्रसिद्ध होती. बेळगावमधील लग्नाच्या सीमंतपूजनात आणि विहिणींच्या पंगतीत भला मोठा मांडा वाढत. त्यावर केशराचे साय न काढलेले दूध, पिठीसाखर आणि तूप वाढत.
हळूहळू काळ बदलत गेला. पंगतींची जागा ‘बफे’ पद्धतीने घेतली. श्रीखंडपुरी किंवा गुलाबजाम व कुर्मा-पुलाव यांची जागा सूप्स, स्टार्टर्स, कटलेट, छोटे समोसे, पनीरच्या भाज्या, बंगाली मिठाया, आइस्क्रीम यांसारख्या पदार्थांनी घेतली.
लग्न एक इव्हेंट
आता तर लग्न जमले, की इव्हेंट मॅनेजरला पाचारण केले जाते. त्यात केटरिंग मॅनेजर सर्वांत महत्त्वाचा. हा केटरिंग मॅनेजर साखरपुडा, मुहूर्तमेढ, संगीत, मेंदी, सीमंतपूजन, लग्न, रिसेप्शन, सत्यनारायण पूजा, गोंधळ आणि श्रमपरिहार… अशा सर्वच दिवसांचे मेन्यू ठरवतो. मेंदी आणि हळदीसाठी हिरव्या, पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचे पदार्थ ठरवले जातात.
लग्नाच्या जेवणात (रिसेप्शनला) पाहुण्यांच्या स्वागता-साठी चाट, इडली-डोसे, सूप्स, स्टार्टर्स व नाना तऱ्हेची ‘वेलकम ड्रिंक्स’ असतात. मुख्य जेवणासाठी सलाड, भाजी, रोटी, भात, भजी, गोड पदार्थ यांचे प्रत्येकी कमीतकमी सहा-सात प्रकार तरी असतात. अशा लग्नात पाहुण्यांना जेवणाचा आग्रह केला जात नसला तरी आकर्षक पदार्थ आपल्याला त्यांच्याकडे खुणावत असतात.
डेस्टिनेशन वेडिंग
हल्ली अनेकांची लग्ने ‘डेस्टिनेशन वेडिंग’ पद्धतीने अत्याधुनिक रूप दिलेल्या जुन्या वाड्यात किंवा रिसॉर्टवर होतात. वधुवरांकडील नथी घातलेल्या, नऊवारी पातळातल्या ललना आणि धोतर-पगडी घातलेले पुरुष अस्खलित इंग्रजीत संवाद साधताना दिसतात. अशा प्रकारच्या लग्नात खास पाहुण्यांसाठी आणि अर्थातच वधुवरांसाठी चांदीचा चौरंग, पाट अशी आसनव्यवस्था असते. या पंगतीला पुरणपोळी, आमरस, बासुंदी, श्रीखंड, बुंदीचे लाडू, कटाची आमटी अशा अस्सल मराठमोळ्या चविष्ट पदार्थांचा समावेश असलेला ‘पेशवाई थाट’ असतो. केटररकडचे नऊवारी-धोतरातले वाढपी, चांदीच्या झारीतून तूप वाढून आग्रहही करतात.
दिवसेंदिवस वाढत असलेली आर्थिक संपन्नता अशा समारंभातून अधिकाधिक झळकू लागली. त्यामुळे प्रत्यक्ष पंगत नसली, तरी लग्नसोहळ्यांमधील चवींची रंगत वाढत आहे, हे काय कमी आहे?
एकदा मी झारखंडमधल्या एका आदिवासीच्या लग्नाला गेले होते. तेथे लग्नासाठी मटणाची सागुती, भाताची महेरी (आदल्या दिवशी तांदूळ भिजवून केलेला पातळ भात. मग त्याला मिरचीची फोडणी दिली जाते), फणसाची भाजी, चिंचेची पकोडी घातलेली कढी आणि ताडीच्या गुळातला पीठा असा फक्कड बेत होता. गुजरातमधील जुनागडजवळच्या एका खेडेगावात एका सावकाराच्या घरातल्या लग्नात असाच जेवायचा योग आला होता. तेथे भल्या मोठ्या पितळी थाळ्यात वीस वाट्या ठेवलेल्या होत्या. त्यात भाज्या, डाळी, आमट्या, कढी, खीर, मोहनथाळ, मालपुवा असे अनेक पदार्थ वाढलेले होते. गरम गरम रोटले, त्यावर तूप आणि खीर आग्रहाने वाढली जात होती. मांडवातील सर्व वऱ्हाडींना एकसारखेच जेवण होते, खास अशी पंगत मात्र तेथे पाहायला मिळाली नाही.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
– मंजुषा देशपांडे
(लेखिका कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील लोकविकास केंद्राच्या प्रमुख आहेत.)