गोव्याची पातोळी
हा पदार्थ स्वातंत्र्यदिन, गणेशोत्सव आणि नागपंचमीला बनवला जातो.
पातोळीसाठी साहित्य: ६-७ हळदीची पाने, २ कप भिजवलेले तांदूळ.
सारणासाठी साहित्य: १ मोठा चमचा तूप किंवा तेल, ११/२ कप खवलेले ओले खोबरे, १ कप किसलेला गूळ, १ छोटा चमचा वेलचीपूड, १ छोटा चमचा चारोळी.
कृती : तांदूळ रात्रभर भिजवून ठेवा. अतिरिक्त पाणी काढून टाका आणि हे तांदूळ वाटून त्याची जाड पेस्ट करून घ्या. हळदीची पाने धुऊन घ्या.स्वच्छ कापडाने पुसून बाजूला ठेवा. ही पाने आकाराने मोठी असतील तर त्यांचे दोन भाग करा. सारण तयार करण्यासाठी जाड बुडाची कढई घ्या आणि त्यात तूप घाला. मंद आचेवर चारोळी ४०-६० सेकंद भाजून घ्या. आता त्यात ओले खोबरे आणि गूळ घाला. गूळ घालून तो विरघळू द्या. या मिश्रणाचा छान सुगंध येईल. हे मिश्रण ३-४ मिनिटे ढवळत राहा. अती शिजवू नका (अन्यथा गूळ घट्ट किंवा कडक होईल) नंतर त्यात वेलचीपूड घाला व नीट मिसळून घ्या. गॅस बंद करा, हे मिश्रण थंड होऊ द्या. आता तांदळाचे वाटलेले मिश्रण हळदीच्या पानांवर पसरवा. आता पानावरील तांदळाच्या मिश्रणावर एका बाजूला चमचाभर गूळ-खोबऱ्याचे सारण भरा. पानाची दुसरी बाजू उचलून करंजीसारख्या आकारात दुमडा आणि नीट चिकटवून घ्या. आता ही पाने स्टीमरमध्ये किंवा इडलीपात्रात ठेवून वाफवून घ्या. इतर पातोळ्याही अशा प्रकारे शिजवा. ७-८ मिनिटांनंतर त्या व्यवस्थित शिजतील आणि पानांचा रंग बदलेल. पात्र थंड होऊ द्या. पाने उघडा आणि पातोळ्या गरम गरम किंवा थंड करून त्यांचा आस्वाद घ्या.
टीप: यात तुम्ही जायफळपूड आणि काजूसुद्धा घालू शकता.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.