प्रवास आणि खाऊचा डबा
प्रवास अणि खाऊचा डबा यांचे नाते अतूट आहे. कुठल्याही प्रवासाला निघताना सोबत पुरेसे खाणे घेतल्याशिवाय प्रवास सुरूच होत नाही; मग तो प्रवास देशातला असो की अगदी परदेशातलाही. आमच्या लहानपणी बस, ट्रेन किंवा कारने प्रवास व्हायचा तेव्हा घरातून खाऊ घेऊन जाणे अनिवार्य होते. खाऊच्या जोडीला काही वेळा गरम चहा-कॉफीचा थर्मासही असायचा. आता काळाप्रमाणे प्रवासाच्या वाहनांमध्ये जसा आमूलाग्र बदल झाला त्याचप्रमाणे खाऊच्या डब्यातही!
पूर्वी डेक्कन क्वीनने मुंबई-पुणे जाणे-येणे हा नेहमीचा ठरलेला प्रवास. तीन तासांच्या या छोट्या प्रवासात सगळ्यांनी एकत्र बसून खाणे ही वेगळीच मजा असायची. डेक्कन क्वीनमध्ये मिळणारे ऑम्लेट-ब्रेड हा सर्व मुलांचा आवडता पदार्थ. रेल्वेने लांबचा प्रवास करताना बरोबर पुरीभाजी, दहीभात (एक दिवस नक्की टिकतो), पराठे, लाडू, शंकरपाळ्या, चिवडा, चकली, तिखटमिठाच्या पुऱ्या वगैरे पदार्थांची सोबत असायची. कधीकधी घावन, आंबोळी,थालीपीठ चटणी, ढोकळा, अळूवडी असे पदार्थ प्रवासाची
लज्जत वाढवत. पूर्वी प्रवासादरम्यान व्यवस्थित खाणे मिळत नसे, तसेच आर्थिकदृष्ट्या सगळ्यांना ते शञ्चय नसे. त्यामुळे घरून खाणे बरोबर नेण्याशिवाय पर्याय नव्हता, हे यामागचे खरे कारण. हळूहळू रेल्वे तसेच एस.टी. स्थानकात वेगवेगळे पदार्थ घेऊन फिरते विक्रेते दिसू लागले. त्यांच्याकडे मिळणारे गरम वडापाव-समोसा, आलेपाक, कलिंगडाच्या कापा, उसाचा रस, तिखटमीठ लावलेली काकडी असे नानाविध पदार्थ मुलांबरोबरच मोठ्यांचा प्रवास रुचकर करू लागले. एसटी स्थानकातील कँटीनमध्ये मिळणारे इडली-वडा सांबार, समोसा, झुणकाभाकर, पोहे, उपमा हे पदार्थही आवडीने खाल्ले जात असत.
आम्ही एकदा हरिद्वार, ऋषिकेश, डेहराडून, मसुरी असा रेल्वेप्रवास केला होता. तेव्हा कपड्यांसोबत एक बॅग भरून खाण्याचे पदार्थ घेतले होते. मुले लहान असल्यामुळे ठेपले-लोणचे, ब्रेड-बटर, जाम आणि सॉस असे सगळेच पदार्थ घेतले होते. त्याचबरोबर प्रत्येक स्टेशनवर मिळणारी फळे खायला घेत होतो. याच प्रवासात कोटा स्टेशनवर अतिशय चविष्ट खवा आम्हाला खाता आला.
IRCTCची कँटीनसेवा सुरू झाल्यापासून रेल्वेमध्ये मिळणाऱ्या खानपानाचा दर्जा खूपच सुधारला आहे. हल्ली तर राजधानी एक्स्प्रेस, दुरांतो इ. रेल्वेगाड्यांच्या तिकिटाच्या पैशातच खाणेपिणे समाविष्ट असते. याशिवाय, मोबाइल अॅपवरून आपल्या ट्रेनचा थांबा असेल त्या स्थानकावर तुम्ही खाण्याची ऑर्डर मिळवू शकता. विमान प्रवासात तर खाण्यापासून पिण्यापर्यंतचे पर्याय उपलब्ध असतात. तंत्रज्ञानातील बदलाचा हा परिणाम!
प्रवासादरम्यानचा खाऊचा डबा जसा बदलला, तशीच बदलत गेली पर्यटन स्थळांवरील खाद्यसंस्कृती. खूप पूर्वी बाहेर खाण्यासाठी हॉटेल्स उपलब्ध नसत. क्वचित कुठे एखाद दुसरी खानावळ असायची. पण आता सर्रास सगळीकडे हॉटेल्स, ढाबा, कॅफे सुरू झाले आहेत, जिथे चवदार आणि विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो. कोकणात मालवण येथील चिवळे बीच, परुळे-वेंगुर्ला येथील देवबाग बीच, दिवेआगर, रत्नागिरी वगैरे ठिकाणी तर खाण्याची रेलचेल आहे. शाकाहरी जेवणात मोदक, अळूवडी, वालाची उसळ, चटणी किंवा नारळाच्या गूळ घातलेल्या दूधा (रसा) बरोबर तांदळाचे मऊ लुसलुशीत घावन खाण्याची मजा काही औरच. दिवेआगरला पोतनीसांकडे माशांचे अतिशय चविष्ट पदार्थ मिळतात. चिवळे बीचवर सकाळी न्याहारीला चहाबरोबर हिरव्या वाटाण्याची उसळ आणि पाव खायला खूप मजा येते. दुपारचे जेवण (माशाचे कालवण आणि तळलेले मासे), संध्याकाळी चहाबरोबर गरम गरम तळलेली कांदाभजी म्हणजे मेजवानीच !
असाच एक चवदार अनुभव घेतला तो रायगडावर. पूर्ण गड फिरून झाल्यावर प्रचंड पावसात तिथल्याच एका आजीबाईंच्या चंद्रमौळी घरामध्ये त्यांनी केलेल्या गरम गरम भाकऱ्या, पिठले आणि ठेचा खाण्यातली गोडी अवर्णनीय होती. तिथल्या घाटामध्ये एका स्टॉलवर खाल्लेल्या गरमागरम कांदाभज्यांची चव आजही जिभेवर रेंगाळलेली आहे. त्याचप्रमाणे कास पठारावर रिमझिम पावसात गरम चहाबरोबर गरम कांदाभजी खाण्याचा आनंद काही वेगळाच होता. उकडून मग भाजलेल्या खास सातारी पद्धतीच्या भुईमुगाच्या शेंगा ही इथली एक चविष्ट खासियत. सातारा रोडवर खेड-शिवापूर टोलनाक्यानंतर ‘चूल मटण’ या हॉटेलमध्ये चुलीवरचे मटण, चिकन, भाकरी मिळते. चुलीवरच्या या जेवणाचा आनंद एकदा तरी घ्यायला हवाच. तशीच खासियत शिरवळला मिळणाऱ्या वडापावची. इथल्याच खंबाटकी घाटानंतर आराम या गार्डन रेस्तराँमध्येही चवीला छान असे खाद्यपदार्थ मिळतात. तसेच खेड-शिवापूरला ‘कैलास भेळ’ या हॉटेलमध्ये मिळणारी भेळ आपल्या चवीसाठी प्रसिद्ध आहे. तर येथून जवळच असणारे ‘हॉटेल जगदंब’ हे जेवणासाठी नाव कमवून आहे.
महाराष्ट्राबाहेरही अनेक ठिकाणची खाद्यसंस्कृती आम्ही अनुभवली आहे. असेच एकदा अमरनाथ यात्रेला रेल्वेने गेलो होतो. पुण्याहून जम्मू-तावी एक्स्प्रेसने प्रथम जम्मू आणि मग पुढे टॅक्सीने उधमपूरला गेलो. वाटेत धाब्यावर पुरी आणि बटाट्याची पातळ भाजी खाताना जी मजा आली, ती अवर्णनीयच! उधमपूर ते पहेलगाम मार्गावर एक प्रसिद्ध धाबा आहे. इथला गरमगरम राजमा-चावल आणि त्यावर भरपूर साजूक तूप आयुष्यात एकदा तरी खायलाच हवा. पहेलगामवरून अमरनाथ यात्रेचा प्रवास सुरू केला. ३-४ दिवसांचा प्रवास असल्यामुळे सोबत भरपूर खाऊ होता. एकीकडे ट्रेनमधील कँटीनचे खाणे मागवत होतो, तर दुसरीकडे सहप्रवाशांसह खाणे वाटून घेतले जात होते. हे प्रवासी वेगवेगळ्या भागातील असल्यामुळे निरनिराळे पराठे,कुलचा वगैरे एकत्र खायला खूप मजा आली. या यात्रेदरम्यान सर्वत्र भारतीय सेनेचे
जवान यात्रेकरूंना पिण्यासाठी गरम पाणी देत असतात. जागोजागी सेवा म्हणून लंगर चालवले जातात. त्याचप्रमाणे जागोजागी गरम चहा मिळतो. पहेलगामला नदीमध्ये ट्राउट मासा मिळतो, तो पकडून खाण्यातली मजा वेगळीच आहे. तुम्ही मासे पकडून नेले तर हॉटेलमध्ये शिजवून देतात. अर्थात, मासे पकडण्यासाठी सरकारी
परमिटची आवश्यकता असते.
भूतानला जाताना जलपैगुडीपर्यंत ३-४ दिवसांचा रेल्वेप्रवास केला. नेहमीप्रमाणे घरचे आणि रेल्वे कँटीनचे खाणेपिणे झाले. पण पुढे भूतानला तिथले जेवण वेगळीच चव देऊन गेले. इथे प्रत्येक डिश ही चीज वापरून केलेली असते. चीजला ‘दात्शी’ म्हणतात. त्यामुळे पदार्थांची नावे एमा दात्शी, केवा दात्शी, चिकन दात्शी अशी असतात. ह्या चीजचे वैशिष्ट्य म्हणजे हे याकच्या दुधापासून बनवलेले असते. इथे लाल तांदूळ अधिक प्रमाणात खाल्ला जातो. चपाती, पुरी वगैरे गव्हाचे पदार्थ अगदीच विरळ.
दिल्लीहून अंबाल्याला जाताना वाटेत साधारण दोन-अडीच तासांच्या अंतरावर एक अतिशय प्रसिद्ध धाबा आहे, ‘अमरिक सुखदेव दा धाबा’. वेगवेगळ्या प्रकारचे पंजाबी पराठे व त्यावर वाटीएवढा लोण्याचा गोळा ही इथली खासियत. नंतर मलईदार ग्लासभर लस्सी पिण्यातली मजा औरच आहे. दिल्ली, अंबाल्याहून लोक खास इथे पराठे खाण्यासाठी येतात.
काही वेळा आपल्याला हवे तेव्हा खायला मिळेल, याची खात्री नसते. त्यामुळे आपले स्वतःचे खाणे आणि गरम चहा बरोबर ठेवणे चांगले. असेच एकदा बेळगावहून येताना आम्हाला वाटेत काहीही खायला मिळाले नाही. बेळगावचा कुंदा आणि मांडे होते म्हणून वेळ निभावून गेली. बेळगावला मिलिट्री महादेव मंदिराजवळ रसवंतीगृहामध्ये उसाच्या रसाबरोबर आलेपाक पोहे मिळतात, ते एकदा चाखून पाहाच. आले-मिरचीचा ठेचा, लिंबू, सैंधव मीठ, ओले खोबरे पोह्याला लावून पोहे दडपून ठेवतात. फुटाण्याच्या डाळीची पावडर करून त्यामध्ये लिंबू, मीठ आणि पाणी घालून त्याची गोळी बनवून ठेवतात. सर्व्ह करताना प्लेटमधे पोहे, शेंगदाणे आणि फुटाण्याची गोळी ठेवतात, ती फोडून पोह्याबरोबर खायला खूपच मजा येते.
केरळ म्हणजे निरनिराळ्या प्रकारच्या इडली आणि डोसे यांची रेलचेल. पण हे पदार्थ फक्त सकाळी नाश्त्यासाठी मिळतात. एरवी इथे निरनिराळे माशांचे पदार्थ मिळतात. काळ्या रंगाचा हलवा हा इथला एक खास पदार्थ. दहीभात केरळवासीयांना जेवणात लागतोच, त्याबरोबर कुरकुरीत पापड किंवा केळ्याचे वेफर्स.
तर उत्तर प्रदेश म्हणजे चाटची मेजवानीच. पाणीपुरी, कचोरी चाट, राज कचोरी, लस्सी, रबडी आणि बालुशाही यांसारख्या वेगवेगळ्या दुधाची मिठाई इथे अप्रतिम मिळते. ट्रेनने जाताना वाटेत जबलपूर स्टेशनवर मिळणारी केळी खायला विसरू नका.
आमचा मुलगा ऑस्ट्रेलियाला असल्यामुळे आम्ही वरचेवर मेलबर्नला जातो. हा साधारण १४ ते १५ तासांचा प्रवास आहे. विमानप्रवासात सर्व खाणेपिणे पुरवले जाते. विमानात तुम्हाला साधारणपणे स्वतःचा डबा न्यावा लागत नाही. पण एअरलाइन्सच्या नाश्ता, जेवण देण्याच्या वेळा ठरलेल्या असतात. तुम्हाला जर अधेमधे भूक लागत असेल तर स्वतःचे खाणे बरोबर ठेवणे चांगले. विमानात तुम्हाला स्वतःचे जेवण बरोबर घेता येते, पण उरलेले जेवण ऑस्ट्रेलियात नेता येत नाही. त्यामुळे ते फेकून द्यावे लागते.
मेलबर्नला अतिशय सुरेख आणि जगातील सर्व प्रकारचे खाणे मिळते. परदेशात सर्वत्र आपले भारतीय वडापाव, इडली, वडा, डोसा आणि निरनिराळ्या बिर्याणी, पावभाजी, पुलाव, पाणीपुरी मिळतात. मेलबर्नमधील पोर्तुगीज हॉटेल ‘नांदोज’मध्ये मिळणाऱ्या पदार्थांची चव पुष्कळशी आपल्या जेवणासारखीच असते. एक बाऊल कोरियन सूपी नूडल्स म्हणजे अत्यंत पौष्टिक आणि पोटभर जेवण. ग्रीक हॉटेलमध्ये फ्राइड चिकन उकडलेल्या भरपूर भाज्या आणि फळांबरोबर सर्व्ह करतात. इथे मेक्सिकन नाचोज हे अॅव्होकॅडोपासून बनवलेले ग्वाकोमोले, सालसा किंवा चीज वगैरे टॉपिंगबरोबर सर्व्ह करतात.
बदललेल्या काळाप्रमाणे प्रवासातील गरजादेखील बदलल्या आहेत. त्यामुळे प्रवासातील खाऊच्या डब्याचा आकार लहान होत चालला आहे.तरीही प्रत्येकाने लांब पल्ल्याच्या प्रवासाला जाताना स्वतःसाठी काही ना काही खाणे बरोबर घेणे केव्हाही चांगलेच आणि हो, ज्या ठिकाणी फिरायला जाल तिथे मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचा आनंद घ्यायला विसरू नका!
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
अलका फडणीस
(लेखिका पाककला तज्ज्ञ आहेत)