ताज्या मिश्र फळांचे उकडीचे मोदक
साहित्य: १ १/४ कप आमरस, १/२ कप पाणी, चवीनुसार मीठ, २ छोटे चमचे तूप, १ छोटा चमचा तेल, १ १/२ कप सुवासिक तांदळाची पिठी, १/२कप ओले खोबरे, १/४ कप सुका मेवा (काजू, बदाम व पिस्त्याचे काप), १/४ छोटा चमचा वेलचीपूड, २ कप चिरलेली ताजी फळे (आंबा, चिकू, द्राक्षे, किवी, जांभळे, सफरचंद, डाळिंबाचे दाणे), सजावटीसाठी पिस्त्याचे काप, गुलाब पाकळ्या.
उकडीची कृती: एका भांड्यात एक कप आमरस आणि पाणी उकळत ठेवा.त्यात एक छोटा चमचा तूप, चवीनुसार मीठ घाला.मिश्रणाला उकळी आल्यावर त्यात तांदळाची पिठी घालून एकजीव करून घ्या.गॅस बंद करून भांड्यावर झाकण ठेवा.पाच ते दहा मिनिटांनंतर हाताला थोडे तेल लावून उकड छान मऊसर मळा.त्याचे छोटे गोळे करून ओल्या कपड्याखाली झाकून ठेवा.
सारणाची कृती: कढईत एक छोटा चमचा तूप घालून त्यावर ओले खोबरे मंद आचेवर परतून घ्या.त्यात पाव कप आमरस घालून मिश्रण छान परता.त्यात सुका मेव्याचे काप, वेलचीपूड घालून मिश्रण एकजीव करा.मिश्रण थंड झाल्यावर त्यात चिरलेली ताजी फळे घाला.
मोदकाची कृती: उकडीचा एक छोटा गोळा घेऊन त्याची पारी तयार करा.त्यात फळांचे सारण भरून मोदकाचा सुबक आकार द्या. मोदकपात्रात केळीच्या पानावर मोदक ठेवून झाकण ठेवा आणि १५ मिनिटे वाफवून घ्या.पिस्त्याचे काप, गुलाब पाकळ्यांनी मोदक सजवा. हे मोदक साजूक तूप घालून सर्व्ह करा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
मोहिनी घरत, ठाणे