बेळगावी कुंदा
बेळगावी कुंदा हा पदार्थ बेळगावबरोबर इतर ठिकाणीही खूपच लोकप्रिय आहे. या पदार्थाचा उगम कसा झाला, याचीही एक कथा आहे. एके दिवशी जक्कू मारवाड्याने दूध गरम करायला ठेवले पण ते उतरवायला तो विसरला. परिणामी, दूध तापतच राहिले आणि आटले. त्याने या दुधाची चव घेतली तेव्हा त्याला ते गोड लागले. त्यात त्याने अजून थोडा खवा घातला आणि कुंदा मिठाई तयार झाली.
साहित्य : २ लिटर दूध, १ कप दही, १ कप साखर, १ छोटा चमचा वेलचीपूड, १० काजू, ५ मोठे चमचे तूप.
कृती : खोलगट कढईत दूध घ्या आणि मध्यम आचेवर उकळवा. काही वेळाने आच कमी करा आणि दूध असेच उकळू द्या. दूध सतत ढवळत राहा.दुधाच्या गुठळ्या होऊन ते कढईला चिकटणार नाही, याची काळजी घ्या. साधारण ४० मिनिटांनंतर दूध मूळ प्रमाणाच्या एक तृतीयांश होईल. आता त्यात दही तसेच, अर्धा कप साखर घालून ढवळा. दुधातून पाणी वेगळे होईल आणि दुधाच्या गाठी तयार होतील, सतत ढवळत राहा. मध्यम ते कमी आचेवर या मिश्रणाला उकळी काढा. दुसऱ्या कढईत, उरलेली अर्धा कप साखर मध्यम आचेवर गरम करा. साखर कॅरेमलाइझ करताना त्यात पाणी घालू नका. साखर विरघळून सोनेरी चॉकलेटी रंग येऊ द्या. साखरेचे कॅ रेमल लगेचच आटलेल्या दुधात घाला आणि त्या पाकाची वाफ पूर्ण निघून जाईपर्यंत ढवळत राहा. या मिश्रणातील पाणी कमी होईल तेव्हा आच कमी करा. त्यात वेलचीपूड घाला. शिल्लक पाणी निघून जाईपर्यंत हे मिश्रण ढवळत राहा आणि गॅस
बंद करा. मिश्रण खूप कोरडे करू नका. हे मिश्रण गार झाल्यावर घट्ट होईल. त्यावर काजू किंवा बदाम-पिस्त्याने सजावट करा. हा कुंदा तुम्ही गरम किंवा थंड स्वरूपात खायला वाढू शकता.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
शेफ मयुर कामत