बहुगुणी बेकिंग सोडा
केक, वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटे, नानकटाई, ढोकळा, इडली यांसारख्या पदार्थांमध्ये बेकिंग सोड्याचा वापर केला जातो. भाज्यांचा रंग टिकवण्यासाठीही हा सोडा वापरला जातो. पण, सोड्याचा वापर फक्त स्वयंपाकासाठीच केला जातो का? तर नाही. स्वयंपाकासह स्वच्छता आणि शरीराची निगा राखण्यासाठी सहज वापरला जाणारा सोडा म्हणूनच बहुगुणी आहे.
स्वयंपाक घरातील वापर:
* बेसिन किंवा सिंकच्या पाइपमध्ये अनेकदा कचरा अडकून पाणी तुंबते. अशा वेळी एक ग्लासभर गरम पाण्यात एक चमचा सोडा मिसळून ते सिंकमध्ये ओतावे, यामुळे पाइपमध्ये अडकलेली घाण निघून पाइप मोकळा होतो.
* चिमूटभर बेकिंग सोडा अर्धा लीटर कोमट पाण्यात मिसळून या मिश्रणाने भाज्या आणि फळे धुतल्यास त्यावरची धूळ, माती आणि कीटकनाशके निघून जातात.
* अनेकदा फ्रीजमधून विशिष्ट प्रकारचा वास यायला लागतो. अशा वेळी सोड्याच्या पाण्याने फ्रीज साफ केल्यास फ्रीजमधील दुर्गंधी दूर होते. एका भांड्यात चमचाभर बेकिंग सोडा आणि मीठ घालून हे भांडे उघडेच फ्रीजमध्ये ठेवा. बेकिंग सोड्याचे हे मिश्रण दुर्गंधी शोषून घेत काही वेळात फ्रीजमधील वास दूर करतो.
* गॅसचे बर्नर, नॉनस्टिक भांडी, अॅल्युमिनियमची कढई, पातेली अनेकदा करपून तळाला काळी होतात. अशा वेळी बर्नर अथवा भांड्याचा तळ बुडेल इतपत गरम पाणी घेऊन त्यात अर्धा लिंबू पिळावा. त्यात एक चमचा सोडा घालून ते दोन तास बाजूला ठेवून द्यावे. दोन तासांनी बर्नर/भांडे सोड्याच्या पाण्यातून बाहेर काढून साबण अथवा लिक्वीड सोपने घासावे. अथवा भांडी घासायचा लिक्वीड सोप, बेकिंग सोडा आणि व्हिनेगर यांचे मिश्रण करून घ्या. हे मिश्रण त्या भांड्याला लावून भांडे अर्धा तास बाजूला ठेवा. अर्धा तासाने भांड्याच्या तळाशी जमलेला कार्बनचा काळा थर पापुद्र्यासारखा वर येतो आणि भांडी लखलखीत होतात.
* चांदीची भांडी, दागिने काळे पडल्यास एक चमचा सोड्यात एक चमचा गरम पाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चांदीच्या भांड्यावर/दागिन्यांवर हलक्या हाताने घासावी व नंतर थंड पाण्याने धुऊन कोरड्या कापडाने पुसून घ्या.
* अंडी किंवा मासे बनवल्यानंतर भांड्यांना येणारा उग्र वास घालवण्यासाठी, भांडी धुतल्यानंतर त्यात अर्ध्या तासासाठी सोड्याचे पाणी घालावे.
घराच्या स्वच्छतेसाठी:
* सिरॅमिकचे बेसिन, शौचालयाचे (टॉयलेट) भांडे अनेकदा पिवळे पडते. अशा वेळी पांढरी टूथपेस्ट आणि सोडा समप्रमाणात घेऊन त्याचे मिश्रण ब्रशने पसरवून ठेवावे. अर्ध्या तासाने ब्रशनेच घासून पाण्याने धुऊन टाकावे, डाग नाहीसे होतात. हीच पेस्ट वापरून बाथरूमच्या टाइल्स, स्टीलचे नळ, बादल्यांवरील पिवळेपणा दूर करता येतो.
* वॉशिंग मशिनच्या वॉशिंग टबमध्ये अनेकदा पाणी, कपड्याचे धागे, कपड्यातील मळ यामुळे चिकट पापुद्रे तयार होतात. वॉशिंग टबचा तळ स्वच्छ करण्यासाठी एक लिटर पाण्यात अर्धा कप व्हिनेगर ओतावे आणि हे पाणी टबमध्ये टाकावे. त्यात तीन चमचे सोडा टाकून ते एक मिनिटभर स्पीन करून घ्यावे. पाणी काढून स्वच्छ पाण्याने दोन-तीनदा पुन्हा धुऊन घ्यावे.
* अनेकदा कपड्यांवर चहा-कॉफीचे डाग पडतात. हे डाग काढण्यासाठी अर्धा बादली पाण्यात अर्धा कप सोडा घालून त्यात डाग पडलेले कपडे भिजवून ठेवावेत. त्यानंतर नेहमीप्रमाणे कपडे धुऊन घ्यावेत, डाग सहज निघून जातात.
* घरात अनेकदा बारीक किडे होतात. त्यावर प्रभावी उपाय म्हणजे थंड पाण्यात थोडा सोडा घालून हे मिश्रण घरात सगळीकडे फवारणे.
* पांढऱ्या बुटांवरील डाग साफ करण्यासाठी डाग लागलेल्या भागावर बेकिंग सोडा लावून ब्रशच्या मदतीने हलकेच घासून घ्या. काही वेळानंतर कोमट पाण्याने धुवा. डाग नाहीसे होतात.
* किचनच्या टाइल्सवर जमा झालेला मळ साफ करण्यासाठी एका वाटीत पाणी आणि बेकिंग सोड्याचे मिश्रण करा. हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून टाइल्सवर स्प्रे करा. १० ते १५ मिनिटांनी टाइल्स स्पंजने पुसून घ्या.
* बाथरूमची टाइल्स स्वच्छ करण्यासाठी एक मोठा चमचा बेकिंग सोडा, दोन चमचे कपडे धुण्याची पावडर घ्या. हे मिश्रण ब्रश किंवा स्क्रबरने टाइल्सवर लावून घ्या. १० ते १५ मिनिटांनी पाण्याने धुऊन घ्या. टाइल्स चकाचक दिसतील.
सौंदर्य आणि सोडा:
* हाताचे कोपरे, गुडघे, घोट्याजवळील त्वचा, मान, काखेतील काळेपणा दूर करण्यासाठी एक चमचा पांढरी टूथपेस्ट, एक चमचा कोरफड जेल आणि दोन चिमूट सोडा घेऊन त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट शरीराच्या काळसर भागावर पाच मिनिटे चोळून दहा मिनिटे तशीच ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने धुऊन घ्या, काळेपणा कमी होतो.
* पायाची त्वचा चमकदार आणि मऊ होण्यासाठी हातावर सोडा घेऊन तो ओल्या पायावर हलक्या हाताने चोळा आणि पाय धुऊन घ्या, त्वचा मऊ होईल.
* अनेक जणांना लाल मुंग्या, डास चावले की जळजळ होऊन खाज सुटते. अशा वेळी पाण्यात बेकिंग सोडा घालून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट डास, मुंगी चावलेल्या भागावर लावा. थोड्या वेळाने सूज आणि खाज कमी होईल.
* केसात कोंडा असणाऱ्यांनी थोडा सोडा पाण्यात मिसळून केसांच्या मुळाशी चोळावा आणि केस पाण्याने धुऊन घ्यावेत, कोंडा कमी होतो.
* तोंडाला येणारा कांदा-लसणाचा वास, तोंडाची दुर्गंधी रोखण्यासाठी एक पेला पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा विरघळवून, त्या पाण्याने गुळण्या करा.
* बोटांनी दातांना बेकिंग सोड्याचा हलका मसाज केल्यास दातांवरील डाग कमी होऊन दात पांढरे दिसतात.
* चार चमचे पाणी, दोन चिमूट सोडा आणि चार चमचे हायड्रोजन पेरॉक्साइडच्या द्रावणात नखे बुडवून ठेवल्यास नखांचा पिवळेपणा दूर होतो.
* अंगाला येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी बेकिंग सोडा पाण्यात मिसळून घ्या. हे मिश्रण काखेत लावा. बेकिंग सोडा घाम शोषून घेतो आणि दुर्गंधी दूर होते. तसेच बेकिंग सोडा आणि मक्याचे पीठ योग्य प्रमाणात मिसळून घ्या. हे मिश्रण काखेत लावल्यास घामाची दुर्गंधी कमी होईल.
* बेकिंग सोड्यामध्ये अँटीफंगल व अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. बेकिंग सोडा आणि संत्र्याच्या सालीची पावडर याचे मिश्रण चेहऱ्यास लावल्यास मृत पेशी निघून जातात आणि त्वचा नितळ होते.
* आंघोळीच्या पाण्यात बेकिंग सोडा मिसळून आंघोळ केल्याने त्वचेचा रंग व टोन सुधारतो.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
– शीतल मालप