चमन कलिया
साहित्य: ३०० ग्रॅम पनीर, ३००+१०० मिली मोहरीचे तेल, १ छोटा चमचा जिरे, ३-४ वेलची, १ तमालपत्र, २-३ लवंगा, २ छोटे चमचे हळद, चवीनुसार मीठ, २ छोटे चमचे बडिशेपची पूड, १ छोटा चमचा धणेपूड, १ छोटा चमचा सुकवलेल्या पुदिन्याची पूड, १/२ छोटा चमचा सुंठपूड, १/२ छोटा चमचा जिरेपूड, १/२ छोटा चमचा गरम मसाला पावडर, १२० मिली दूध, आवश्यकतेनुसार पाणी.
कृती: कढईत तेल तापवून त्यात पनीरचे तुकडे तळून घ्या. हे तुकडे साध्या पाण्यात ठेवून द्या. दुसऱ्या एका कढईत तळणाच्या तेलापैकी निम्मे तेल तापत ठेवा. त्यात जिरे, वेलचीचे दाणे, तमालपत्र व लवंग घालून ते परतून घ्या. आच कमी करून हळद घाला, पुन्हा एकदा परतून घ्या आणि लगेच अर्धा कप पाणी घाला (मसाले करपणार नाहीत.) त्यात बडिशेपची पूड, जिरेपूड, सुंठपूड, मीठ आणि अर्धे दूध घाला. सर्व मिश्रण नीट ढवळून घ्या. त्यात तळलेले पनीरचे तुकडे घाला आणि आवश्यकता असल्यास पनीर बुडेपर्यंत गरम पाणी घाला आणि उकळी येऊ द्या. या रश्श्याला उकळी आल्यावर, शिल्लक राहिलेले अर्धे दूध घाला. त्यावर कोरडी पुदिन्याची पूड
आणि गरम मसाला घालून नीट ढवळून घ्या. कढईवर झाकण ठेवा आणि ७-८ मिनिटे मंद आचेवर शिजवा. गॅस बंद करून पाच मिनिटे तसेच ठेवा. भातासोबत हा गरम गरम रस्सा वाढा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
शेफ राहुल वल्ली