देवाची करणी नि नारळात पाणी
प्रत्येक कार्यात श्रीफळ म्हणून मिरवणाऱ्या नारळाला भारतीय खाद्यसंस्कृतीतही मानाचे स्थान आहे.आपल्या जेवणाचा गोडवा आणि स्वाद वाढवण्याबरोबरच नारळ आरोग्यवर्धकसुद्धा आहे.दररोजच्या स्वयंपाकात खोबऱ्याचा सर्रास उपयोग केला जातो.जसे की, चटणी, कोशिंबीर, सॅलेड, भाजी, आमटी वगैरे.खोबऱ्याच्या मिठाया, पक्वान्नांना तर लहानमोठ्या सर्वांचीच पसंती लाभते.श्रावणात केली जाणारी पानगी, नारळी पौर्णिमा-रक्षाबंधनसाठी खास नारळीभात, खोबऱ्याच्या करंज्या, गणपतीसाठी उकडीच्या मोदकांचा नैवेद्य या सगळ्या पदार्थांमध्ये खोबरेच मुख्य असते.इतकेच काय, पूजेच्या वेळीही गूळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवण्याची आपली परंपरा आहे.
ओले खोबरे भाजीत वरून घातल्यामुळे भाजीला स्वाद येतो. मात्र भाजी जास्त वेळ टिकत नाही. त्यामुळे ओला नारळ (खोबरे) घातलेली भाजी लगेच संपवावी. कांदेपोहे, उपमा, साबुदाण्याची खिचडी यांसारख्या पदार्थांवरही खोबरे घातल्याने स्वाद वाढतो. नारळाच्या दुधापासून बनवलेली सोलकढी जेवणाची लज्जत वाढवते.ओल्या नारळाएवढाच वापर सुक्या खोबऱ्याचाही केला जातो.लसूण चटणी, चिवडा, वाटण यासाठी सुक्या खोबऱ्याचाच वापर केला जातो.सुक्या नारळापासून खोबरेल तेल काढले जाते.घरगुती घाणा किंवा लाकडी घाण्यावर काढलेले नारळाचे तेल आरोग्यासाठी लाभदायी आहे.नारळाच्या तेलात रोज जेवण करता येते.कारवार, गोवा तसेच दाक्षिणेकडे खोबरेल तेल स्वयंपाकासाठी वापरले जाते.मात्र नारळाच्या तेलात बनवलेले जेवण फार काळ टिकत नाही.त्यामुळे जेवण योग्य वेळेत संपवायला हवे.
नारळ शक्तिवर्धक आहे.ओल्या नारळाचा गर प्रथिनयुक्त असतो.नारळ हे सहज पचणारे फळ आहे, त्यात अनेक पाचकरस असतात.नारळात प्रथिने,खनिजे, तंतुमय पदार्थ तसेच कर्बोदके असतात.सुके खोबरे हे अपचनावर तर पित्ताशी संबंधित विकारांवर नारळपाणी हितकारक ठरते.ओल्या-सुक्या खोबऱ्याबरोबरच शहाळे (कोवळा नारळ) सुद्धा सगळ्यांच्या पसंतीचे.म्हणूनच ‘देवाची करणी नि नारळात पाणी’ ह्या शब्दांत नारळाचे कौतुक करण्यात आले आहे.शहाळे हे पोषणमूल्यांनी युक्त असे भोजन समजले जाते.शहाळ्याचे पाणी आरोग्यासाठी हितवर्धक असते, कारण ते निर्जंतुक असते.वृद्ध, आजारी किंवा अशक्त व्यक्तींना हे पौष्टिक नारळपाणी बळ-ऊर्जा मिळवून देते.शहाळ्यातील पाणी खनिजयुक्त, शकैमवर्धक असून यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम, पोटॅशियम आणि फायबर्स (तंतू) असल्याने आरोग्यदायी आहे.या पाण्याने शरीराला होणारा उष्म्याचा दाह कमी होऊन उत्साह वाढतो.मात्र हे पाणी पिताना सकाळी नऊपासून दुपारपर्यंत प्यावे, संध्याकाळी वा रात्री पिऊ नये.शहाळ्यातील मलईसुद्धा चवीला अप्रतिम लागते.
गर आणि पाण्याप्रमाणेच त्याच्या इतर भागांचाही वापर होतो.नारळाच्या झावळ्या, करवंट्या, शेंड्या यांचा वापर खराटे, घरावर छप्पर, शोभेच्या वस्तू, कोकोपीट बनवण्यासाठी केला जातो.नारळाच्या झाडाचे बहुगुणत्व पाहिल्यावर त्याला ‘कल्पवृक्ष’ का म्हणतात हे आपल्या लक्षात येते.
आरोग्यदायी नारळ :
* उन्हाळ्याच्या दिवसांत दुपारी नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने तहान भागते; तसेच पित्त कमी होते.
* ओले खोबरे आणि साखर सेवन केल्यास शरीराला होणारा दाह कमी होतो.
* थकवा जाणवत असल्यास साखरेसह खोबरे खावे.
* उन्हाळ्यात खूपदा मूत्र विसर्जनावेळी आग होते.अशा वेळी दिवसातून दोन ते तीन वेळा नारळपाणी घ्यावे.
* वातप्रकृती, वार्धक्यात वाताच्या व पचनाच्या तक्रारींवर ओले खोबरे आणि लसूण यांची चटणी रोज खायला द्यावी.पण यात मिरची घालू नये.
* नारळाचे दूध ताकद वाढवणारे असते.नारळाचे दूध साखर घालून घेतल्यास रुची व शक्ती वाढते.
* पायांना मुंग्या येणे, पोटऱ्या व गुडघे दुखणे, पाय जड होणे आदी समस्यांवर खोबरेल तेलाने मालीश करून शेक द्यावा.
* अंग कोरडे पडत असल्यास रोज खोबरेल तेल अंगाला लावून स्नान करावे; तसेच अंघोळीसाठी साबणाऐवजी उटणे वापरावे.
* नारळाची शेंडी जाळून राख करावी.ही पावडर मधासह घेतल्यास उचकी, उलटी कमी होते.
* गर्भवतीच्या आरोग्यासाठी तसेच गर्भातील बाळासाठीदेखील ओले किंवा सुके नारळ आरोग्यदायी आहे.यामुळे बाळाच्या मांसपेशी बळकट होतात.
* करवंटी जाळून त्याची राख नारळाच्या तेलातून लावल्यास खरूज किंवा गजकर्ण बरे होते.
* भाजल्यास, चटका बसल्यावर खोबरेल तेल लावल्यास लगेच बरे वाटते.
* रोज दोन लहान चमचे शुद्ध खोबरेल तेल प्यायल्यास शरीराला लाभ होतो.
* खोबऱ्याच्या सेवनाने रोग-प्रतिकारशक्ती वाढते.
* खोबऱ्याच्या सेवनाने वजन वाढण्याची प्रक्रिया संथ होते.
* निद्रानाशाची समस्या असल्यास झोपण्याच्या आधी अर्धा तास ओले खोबरे खा.
* नारळातील फायबरमुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.
सौंदर्यवर्धक नारळ :
* शहाळ्याच्या नियमित सेवनामुळे त्वचा नितळ होते.तसेच त्वचेच्या समस्या कमी होतात.
* गर्भधारणेनंतर नारळाचे पाणी नियमित प्यायल्यास बाळाची कांती सुधारते.
* शहाळ्याचे पाणी चेहऱ्याला लावल्यामुळे त्वचेचा काळवंडलेपणा नाहीसा होतो.
* कोरड्या त्वचेच्या संरक्षणासाठी नारळाचे दूध उत्तम असते.नारळाच्या पाण्यात दुधावरील थोडी साय मिसळून त्याने त्वचेला हळुवार हाताने मसाज करावा.कोरड्या पडलेल्या अंगाला खोबरेल तेलाने मसाज करावा.नारळाच्या दुधाने मसाज केल्यास सुरकुत्या कमी होतात.
* नारळपाणी प्यायल्याने, तसेच त्याने केस धुतल्यास केसांना त्याचा फायदा होतो.
* केस धुण्याच्या एक तास आधी खोबरेल तेल केसांना लावून ठेवावे, यामुळे केस मुलायम होतात.तसेच केस गळण्याचे प्रमाणही कमी होते.
* केसांच्या उत्तम आरोग्यासाठी खोबरेल तेलात कापूर घालून लावा.
निशा लिमये
(लेखिका खाद्य व्यावसायिक आहेत.)