आहार | Food | Ever Wondered How Seasonal Food Can Transform Your Diet? | Are You Making the Most of Seasonal Food in Your Diet? | Unleashing the Power of Seasonal Food for a Healthier Lifestyle

ऋतूनुसार घ्या आहार | पूजा शिरभाते | Seasonal Foods | Pooja Shirbhate

ऋतूनुसार घ्या आहार

आपल्या देशात उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा हे तीन मुख्य ऋतू आहेत, तर वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे सहा उपऋतू आहेत. ऋतूंप्रमाणे जसा वातावरणात बदल होतो, तसाच बदल आपल्या शरीरातही होत असतो. त्यामुळे शरीर आणि निसर्ग यांचे नाते समजून घेत, वातावरणातील बदलाला अनुसरून आहारात बदल करणे आरोग्यासाठी निश्चितच हितकारक ठरते. ऋतूनुसार आपल्या दिनचर्येत आणि आहारात बदल न केल्यास त्याचे विपरीत परिणाम आपल्या स्वास्थ्यावर, प्रामुख्याने पचनशक्ती / पचन यंत्रणेवर होतात. पूर्वी वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी फळे आणि भाज्या येत असत. आज बाजारात बाराही महिने विविध फळे, भाज्या, धान्य उपलब्ध असले तरी त्यांचे सेवन करताना ऋतुमानाचा विचार करायला हवा.

ऋतूप्रमाणे असा असावा आहारः

.हिवाळ्यातील आहार:

थंड तापमान व आल्हाददायक वातावरण असलेला हा ऋतू म्हणजे पचनाचा सर्वोत्तम काळ.या काळात पचनशक्ती म्हणजे जठाराग्नी उत्तम असतो.पचायला जड मानले गेलेले पदार्थसुद्धा आपले शरीर या दिवसांत नीट पचवू शकते.सभोवतालचे वातावरण हे पौष्टिक जेवण घेण्यासाठी उपयुक्त असल्याने भरपूर पोषण देणाऱ्या अन्नपदार्थांचा आपल्या आहारात समावेश करावा.या दिवसांमध्ये आपल्याकडे डिंक, मेथी, सुक्या मेव्याचे लाडू खाल्ले जातात.तीळ आणि गुळाचा वापरही सढळ हस्ते केला जातो.थंडीच्या दिवसांत शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी हे पदार्थ खाणे फायद्याचे ठरते.

हिवाळ्यात हवेतील आर्द्रता कमी होऊन वातावरण काहीसे कोरडे झालेले असते.त्यामुळे तेलबिया, डिंक, बदाम, अक्रोड, काजू, पिस्ते अशा सुक्या मेव्याचा समावेश आपल्या आहारात केल्यास यामुळे शरीराला हिवाळ्यासाठी आवश्यक असलेली अतिरिक्त ऊर्जा मिळते.तसेच या पदार्थांमधून शरीराला कॅल्शियम, लोह आणि इतर पोषकतत्त्वेही भरपूर प्रमाणात मिळतात.बदाम आणि अक्रोड यांचे तेलदेखील अतिशय उपयुक्त असते.

या ऋतूमध्ये बाजरीसारख्या पचायला जड आणि प्रवृत्तीने उष्ण धान्याचा वापर आहारात करायला हवा.ही भाकरी तूप किंवा लोणी लावून खावी.भरपूर प्रकारच्या आणि उत्तम प्रतीच्या भाज्या, फळे या ऋतूत उपलब्ध असतात.मेथी, पालक, करडई, लाल आणि हिरवा माठ यांसारख्या पालेभाज्या तसेच वाल, गवार, घेवडा, शेवगा, वांगी आणि कोबी या फळभाज्या हिवाळ्यात खायला हव्या.या भाज्यांमध्ये कीड असण्याचे प्रमाण कमी असते आणि त्या सहज पचतात.विविध भाज्यांची सूप्स नियमितपणे घ्या‧

हिवाळ्यात सफरचंद, द्राक्षे, संत्री, मोसंबी अशी मोसमी फळे बाजारात येतात.सफरचंद वर्षभर उपलब्ध असले तरी हिवाळ्यात आपल्याकडील (काश्मीरमधील) सफरचंद बाजारात येतो.त्यामुळे सर्व मोसमी (सीझनल) फळे पूर्ण पिकल्यावरच (गोड) खावीत.ज्यांना सर्दी-पडसे आहे, अशांनी आंबट फळे खाणे टाळायला हवे.कोणतीही फळे खाताना ऋतू आणि स्वतःची प्रकृती यांचा विचार करूनच फळे खावीत‧

हिवाळ्यातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी.यानिमित्ताने घरोघरी करंज्या, लाडू ,अनारसे, चकली असे फराळाचे पदार्थ बनवले जातात.चातुर्मासातील हलक्या आहारानंतर सर्वांना आवडणारे चटपटीत पदार्थ खाण्यासाठी हा काळ योग्य मानला जात असला, तरी असे तेलकट-तिखट पदार्थ मोजक्याच प्रमाणात खावेत.

२.उन्हाळ्यातील आहार:

हिवाळ्यानंतर येणारा ऋतू म्हणजे उन्हाळा.या मोसमात तापमान हे सर्वाधिक असते.त्यामुळे हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात पचनशक्ती काहीशी मंदावते.उष्ण व कोरड्या हवामानाचा आपल्या शरीरावर परिणाम होतो.त्यामुळे या दिवसांत पचनाला हलके अन्न खावे.उष्ण वातावरणामुळे आहारात पाणी, इतर आरोग्यदायी पेये व पातळ पदार्थांचा समावेश जरूर करा.उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी आणि शरीराची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी लिंबू सरबत, कैरीचे पन्हे, कोकम सरबत, ताजे ताक, उसाचा रस, नारळपाणी आणि वाळ्याचे पाणी नियमितपणे प्यावे.

आहारात हलकी धान्ये जसे तांदूळ, ज्वारी, नाचणी, गहू यांचा समावेश करावा.दुधी, दोडके, भेंडी, भोपळा इत्यादी फळभाज्या भरपूर प्रमाणात सेवन कराव्यात.खूप मसालेदार, तेलकट आणि तिखट पदार्थ खाणे या ऋतूत टाळावे.ओवा, सुंठ, ज्येष्ठमध, बडीशेप, धणे, जिरे, पुदिना यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते.त्यामुळे या मसाल्यांपासून तयार होणारे ‘कशाय’ या दिवसांत प्यावे.कशायमुळे पोटाला आराम मिळतो.बडीशेप, धणे पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते.तर जिरे शरीरातील उष्णता कमी करते.ओव्यामुळे पोटात गॅस होत नाही आणि सुंठ-ज्येष्ठमधामुळे कफ होत नाही.उन्हाळी फळे जशी कलिंगड, खरबूज, काकडी अशा पाणीदार फळांचा आहारात समावेश करावा.तर चहा, कॉफी, बेकरीतील पदार्थ खाणे टाळावे.उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे अन्न लवकर खराब होण्याची शक्यता असते.त्यामुळे शक्यतो ताजेच अन्न खावे, शिळे अन्न अजिबात खाऊ नये.मांसाहार करणाऱ्यांनी आपल्या जेवणात मसाल्यांचा वापर बेताने करावा.शक्यतो, दुपारी मांसाहार केल्यावर रात्रीचे जेवण हलके असावे.

३.पावसाळ्यातील आहार:

पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते.अळ्या व कृमिकीटक यांची झपाट्याने वाढ होते.त्यामुळे  या ऋतूमध्ये अन्नाच्या स्वच्छतेबाबात अधिक जागरूक राहायला हवे.
भाज्या चांगल्या धुऊन घ्याव्या.या ऋतूत जठराग्नी खूप मंदावलेला असतो, पचनशक्ती कमी झालेली असते, त्याला अनुसरूनच आहार घ्यायला हवा.

चातुर्मासात पचनशक्ती क्षीण झाल्याने पोटाचे आजार बळावतात.त्यामुळे आपल्या शास्त्रात चातुर्मासाच्या काळात आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दिवसातून एक वेळच अन्न घेणे सर्वोत्तम मानले आहे.अनेक प्रकारचे उपवास या ऋतूत सांगितलेले आहेत.जठराग्नी मंदावलेला असल्याने पचनाला हलका आहार करावा.अधूनमधून पचनसंस्थेला आराम म्हणून उपवास करणे हे शरीरासाठी फायदेशीर ठरते.उपवास करत असताना कुठलेही जड अन्नपदार्थ जसे साबुदाणा खिचडी, तळलेला बटाटा चिवडा, वेफर्स खाणे टाळावे.या काळात पूर्णपणे उपाशी राहणे किंवा फक्त नैसर्गिक आहार जसे फळे, सुका मेवा, नारळपाणी, दूध, दही, ताक इतकेच खाल्ल्यास त्याचा फायदा होईल‧

या ऋतूत आहारात पोळी, भात, खिचडी, धान्याच्या लाह्या यांचा समावेश करावा.पालेभाज्या कमी खाव्या, तर पडवळ, दुधी, दोडके आणि  घेवडा अशा फळभाज्या अधिक प्रमाणात खाव्या.मुगाच्या वरणाला प्राधान्य द्या.तेलकट, मसालेदार आणि बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे.हळद, तुळस,आले, सुंठ, मिरे, हिंग या पदार्थांचा जेवणात वापर करावा.मासे किंवा मांसाहारी पदार्थ पचनास जड असल्याने पावसाळ्यात फार मांसाहार करू नये.

* घरी विरजण लावलेले दहीच खावे, बाहेरचे दही खाऊ नये.दही सकाळीच खावे, रात्रीच्या जेवणात नको.

* ताज्या दह्यापासून बनवलेले ताक घ्या‧

* रोजच्या खाण्यात सोडा आणि बेकिंग सोडा घातलेल्या पदार्थांचे प्रमाण वाढल्यामुळे जेवणातील मिठाचे प्रमाण बेताचे असावे‧

* दुपारच्या जेवणात काकडी, टोमॅटो, गाजर अशा कच्च्या सलाडचा समावेश करावा.रात्री मात्र कच्चे सलाड टाळावेत‧

* मोड आलेली कच्ची कडधान्ये खायची झाल्यास दुपारच्या जेवणात घ्यावीत.रात्री खायची झाल्यास वाफवून घ्या‧

* चहा-कॉफी शक्यतो टाळा.अगदी अशक्य असल्यास अर्धा कपच चहा किंवा कॉफी घ्यावी‧

* आपल्या कामाचे स्वरूप आणि दिवसभराची व्यग्रता पाहून सकाळी नाश्ता करावा.ज्यांच्या जेवणाच्या वेळा नियोजित नसतात, त्यांनी सकाळी पोटभर नाश्ता करावा.तर बैठे काम करणाऱ्यांनी पचायला हलका नाश्ता करणे सोयीस्कर होते‧

पूजा शिरभाते

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.