व्हायरल फूड ट्रेण्ड
कोविड काळात यू-ट्यूबवरील रेसिपी पाहून बनवायच्या…त्या फेसबुक किंवा इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर पोस्ट करायच्या… स्टेट्सवर ठेवायच्या असा एक ट्रेण्डच आला होता. या ट्रेण्डमध्ये बनाना ब्रेड आणि डालगोना कॉफी एवढी लोकप्रिय झाली होती, की कोविड काळात बाल्कनीमधून थाळ्यांचे आवाज जितके आले नसतील तितके कॉफी फेटायचे आवाज आले असतील. हा झाला गमतीचा भाग! कॉफी, साखर आणि पाणी फेटून अलगदपणे त्याचा फेस गरम अथवा थंड दुधावर ठेवणे म्हणजे कोरियाची सुप्रसिद्ध आणि जगभरात व्हायरल अशी डालगोना कॉफी! या कॉफीबरोबर खायला काहीतरी हवे म्हणून केळी घालून बनवलेला केकही प्रत्येक घरात बनला जाऊ लागला. बनाना ब्रेड आणि डालगोना कॉफी याच्या पोस्ट पाहूनच कधीकधी पोट भरून जात होते.
लॉकडाऊनमध्ये वर्क फॉर्म होममुळे ऑफिसला ये-जा करण्याचा मोठा वेळ वाचला. त्यामुळे अनेकांना आपल्याच घरातील एरवी नजरेआड असलेले छोटे स्वयंपाकघर दिसू लागले. अनेक वर्षे आईचे राज्य असलेल्या या किचनचा मग नवरेमंडळी आणि मुलांनी ताबा मिळवला. मोबाइल ट्रायपॉडवर लावून यू ट्यूबवरील रेसिपी बनवल्या जाताहेत, असे चित्र मग घरोघरी दिसू लागले. पाककृती बनवण्यापेक्षा भांडी घासणे आणि किचन आवरणे हा ट्रेण्ड आला असता तर मन थोडे सुखावले असते! असो…
मुळात या नव्या ट्रेण्डचा आणि आपल्या रोजच्या जेवणाचा काही संबंध नाही. याचा प्रत्यय येतो, ते ‘क्लाऊड एग्ज’ नावाच्या अत्यंत वायफळ रेसिपीमुळे. एरवी करायला सोपी असलेली अंड्याची पाककृती येथे क्लिष्ट करून दाखवली आहे. प्रथम अंड्याचा पिवळा आणि पांढरा बलकवेगळा करायचा. पांढरा बलक इतका फेटून घ्यायचा की तो एखाद्या ढगासाखा दिसायला लागतो. हा बलकाचा पांढरा ढग अलगद ट्रेमध्ये ठेवायचा आणि त्याच्या अगदी मधोमध पिवळा बलक ठेवून हे ऑम्लेट बेक करायचे. अंड्याचे ऑम्लेट बनवण्याचा हा द्रविडी प्राणायाम केल्यानंतरही अंड्याच्या पोषणतत्त्वात किंवा चवीत काही विशेष फरक पडतो का?… तर या प्रश्नाचे उत्तरही नाही असेच आहे. मग हे सर्व कष्ट करायचे कशासाठी…? तर #लंचपार्टी असे लिहून त्याचे फोटो इंस्टाग्रामवर अपलोड करण्यासाठी..!
लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता आल्यानंतर लोक एकमेकांच्या घरी जाऊ लागले. या काळात बर्थडे केकवरील मेणबत्तीला फुंकर मारल्यामुळे संसर्ग होऊ शकतो, असा शोध लावणाऱ्या आजच्या ‘इन्स्टा पिढी’ला बटर बोर्ड ट्रेण्डने चांगलीच भुरळ पाडली. एका लाकडाच्या तुकड्यावर बटर पसरवायचे. त्यावर वेगवेगळे टॉपिंग्ज घालायची, मग हे बटर पावाबरोबर हवे तसे आणि हवे तेवढे खायचे. या बटर बोर्डचे फोटो पाहताना प्रश्न पडायचा, तो हा बटर बोर्ड धुवायचा तरी कसा? हा बटर बोर्ड सिंकमध्ये पडून राहिल्यास दुसरी भांडीही चिकट होणार? मुळात सुंदर दिसण्यापलीकडे हा बोर्ड फारसा काही कामाचा नव्हता.
लॉकडाऊनमध्ये अनेकजण हे बेकर आणि शेफ झाल्यामुळे वैतागलेल्या शेफ्स आणि बेकर यांना आता आपण नवीन काय करायचे, असा प्रश्न पडलेला दिसतो. त्यामुळे लॉकडाऊननंतर बनाना ब्रेड आणि कॉफीला वैतागून लोक जेवायला बाहेर रेस्तराँमध्ये जाऊ लागले. पण, तेथेही मेन्यूमध्ये सगळ्याच गोष्टी तंदुरी दिसू लागल्या. तंदुरी मोमोज ते तंदुरी पाणीपुरीपर्यंत… हे एवढ्यावर थांबले असते तरी ठीक होते. मात्र या काळात खाद्यसंस्कृतीवर विचित्र आघात झालेले दिसले. पान फ्लेव्हर्ड आइस्क्रीम, कॅरेमल श्रीखंड, माखनी पास्ता, स्वीटकॉर्न रबडी अशी वाटेल ती आणि वाटेल तशी कॉम्बिनेशन होताना दिसत होती. आता वरण-भात रिसाटो दिसेल की काय अशी भीती वाटत असताना मी माझे इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केले आणि खिचडी, तूप, लोणचे, पापड खात हा कम्फर्ट फूडचा अजरामर फूड ट्रेण्ड आहे असे घोषित केले!
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
शक्ती साळगावकर
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)