Mukhwas | Mouth Freshener

चविष्ट आणि पाचक मुखवास | डॉ. शर्मिला कुलकर्णी | Tasty and Digestive Mouth Freshner | Dr. Sharmila Kulkarni

चविष्ट आणि पाचक मुखवास

हल्ली हॉटेलमध्ये जेवण संपल्यावर आपल्यासमोर वेगवेगळ्या रंगाची, वासाची आणि चवीची बडीशेप किंवा मुखवास आणून ठेवले जातात. आपण चमचाचमचा भरून ती बडीशेप खातो आणि उरलेली एका टिशू पेपरमध्ये बांधून पर्समधून घेऊन येतो, नंतर खायला… कॉम्प्लिमेंटरी असते ना ती!

असो, विनोदाचा भाग सोडल्यास, हा मुखवास आता हॉटेलमधून आपल्या घरच्या डायनिंग टेबलवरही विराजमान झाला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या बडीशेपेच्या गोड गोळ्या, मेंथॉलयुक्त सुपाऱ्या, पान, चंदेरी वर्ख असलेली वेलची, गुलकंद, टुटीफ्रुटीचे तुकडे, साखर लावलेले आवळ्याचे तुकडे,चिंचगोळी, जिरागोळी, खजुराचे तुकडे असे विविध प्रकार यात मिळतात. रोजच्या जेवणानंतर चमचाभर खाल्ले जाणारे हे पदार्थ आरोग्यासाठी कसे हितकर आहेत ते जाणून घ्यायला हवे!

मुखवास म्हणजे काय?

जेवणानंतर खाल्लेल्या पदार्थांची तोंडात रेंगाळणारी चव आणि वास घालवणारे म्हणजेच मुखशुद्धी करणारे पदार्थ, अर्थात मुखवास! हल्ली त्याला ‘पॅलेट क्लिनर’ असेही म्हणतात. मिठात मुरवलेले आल्याचे तुकडे, ग्रीन टी असे पदार्थ या पॅलेट क्लिनरसाठी आशियाई देशांत वापरले जातात.युरोपमध्ये त्यात दुधाचा वापर होतो. आपल्या आयुर्वेदामध्ये मुखवास किंवा तांबुलसेवन (नागवेलीचे पान) याचा दिनचर्येमध्ये समावेश केला आहे.दिवसभरात आपण घेतलेल्या प्रत्येक भोजनानंतर मुखवासाचे सेवन करावे, असे सांगितले आहे. यात खालील पदार्थांचा मुख्यतः वापर करावा.

. बडीशेप : या हिरव्या रंगाच्या बिया भूक वाढवतात तसेच आतड्यातील जंतांचा नाश करतात. तोंडाला सतत येणारी दुर्गंधी बडीशेपेच्या नित्य सेवनाने कमी होते. जिभेची चव वाढवते. अपचनामुळे किंवा पित्तामुळे होणारी उलटीची भावना बडीशेपेमुळे कमी होते. जठरातील पित्त वाढल्यामुळे होणारी जळजळही बडीशेपेने कमी होते. बडीशेपेचा काढा करून प्यायल्याने पोट सतत भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. पाळीच्या वेळी काही स्त्रियांना पोटदुखीचा खूप त्रास होतो, अशा वेळी बडीशेपेचे सेवन केल्यास आराम पडतो. तर बडीशेपेच्या काढ्याने लघवी साफ होते. बडीशेपेमध्ये भरपूर प्रमाणात फायबर (तंतुमय पदार्थ), पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असते. यातील अँटिऑक्सिडंट गुणधर्मामुळे आणि तेलामुळे मन ताजेतवाने राहते तसेच नसा शिथिल होतात.

. ओवा : उग्र वासामुळे ओव्याला ‘उग्रगंधा’ असेही म्हणतात. ओव्यामध्ये २.४ ते ५ टक्के उग्र पण सुगंधी उडनशील तत्त्व असते. त्याला थायमॉल म्हणजेच ‘ओवाफूल’ असेही म्हणतात. ओव्याच्या सेवनाने अन्नपचन होते, भूक वाढते, पोटातील जंतांचा नाश होतो, मुखदुर्गंधी कमी होते, जिभेची चव वाढते. ओव्यामुळे श्वसनमार्गातील चिकट कफ सहजपणे बाहेर फेकला जातो. चयापचय क्रिया वाढवून वजन कमी करण्यास मदत होते, पोट साफ होते. ओव्याच्या सेवनामुळे गर्भाशयातील संचित रक्तस्राव बाहेर फेकून देत गर्भाशय स्वच्छ राहते. यामुळे बाळंतिणीला आवर्जून ओवा खाण्यासाठी दिला जातो. लहान बाळांमध्येही पोटातील मुरडा कमी करण्यासाठी ‘ओवाअर्क’ दिला जातो. ओवाफुलाच्या तेलाचा वापर सांधेदुखीवर उपचार म्हणून मसाजसाठी केला जातो. पण, ओवा हा प्रकृतीने उष्ण असल्याने याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

. धणे : धण्याच्या सेवनाने भूक आणि पचनशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच आतड्यांमधील जंत, मुखदुर्गंधी कमी होते. धणे उत्कृष्ट पित्तनाशक असल्याने तोंड सारखे कोरडे पडणे, पोटात जळजळ होणे, खूप तहान लागणे, उष्माघातामुळे होणारी लघवीची जळजळ आदी तक्रारींवर आराम मिळतो. तोंड आल्यास धण्याच्या काढ्याची गुळणी करतात. ज्येष्ठमध व धण्याच्या काढ्यामुळे जुनाट कोरडा खोकला कमी होतो. दुधामध्ये धणे उकळून रात्री झोपण्यापूर्वी प्यायल्याने निद्रानाश, चिंता, ताण यासारखे त्रास कमी होतात. आयुर्वेदामध्ये
जीर्णज्वरासाठी (जुना ताप) धण्याचे सेवन करण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे चिनी औषधी चिकित्सेतही शीतज्वरामध्ये धण्याचा वापर केला जातो. मुखवासात धणाडाळीचा वापर करावा. मात्र मीठ / सैंधव लावलेली धणाडाळ किंवा बडीशेप खाऊ नये.

. बाळंतशेपा : बाळंतशेपेला शेपू, सुआ किंवा शतपुष्पा असेही म्हणतात. बाळंतीण  स्त्रियांना  अंगावरचे दूध वाढवण्यासाठी (स्तन्यवृद्धी) बाळंतशेपा खायला देतात. या गुणधर्मामुळेच त्याला हे नाव पडले आहे. लहान मुलांच्या पोटात वायू झाल्यामुळे सारखा मुरडा येतो, यावर बाळंतशेपेसारखे दुसरे उत्तम औषध नाही. अॅसिडिटीमुळे येणाऱ्या उचक्या आणि ढेकर यावरही बाळंतशेपेमुळे आराम मिळतो. बाळंतशेपेमध्ये असणाऱ्या तेलाचा वापर निद्रानाशावर केला जातो.

. अळशी : याला जवस असेही म्हणतात. अळशी, लसूण आणि लाल मिरची घालून केलेली चटणी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. स्त्रियांमध्ये पाळी गेल्यानंतर दिसणाऱ्या वात-प्रकोपात्मक लक्षणांवर या बियांचा चांगला उपयोग होतो. अळशीमधील विद्राव्य (विरघळण्याची क्षमता) आणि अद्राव्य (विरघळण्याची क्षमता नसणाऱ्या) गुणधर्मामुळे मलावरोधात याचा वापर केला जातो. यातील ओमेगा फॅटी अॅसिडमुळे संधिवातासारख्या वातविकारात अळशीचा वापर होतो. अळशीमुळे शरीरातील लिपिडचे प्रमाण कमी होते. अळशी अतिशय उष्ण असल्याने त्याचा वापर मर्यादेतच करावा.

. तीळ : उच्च प्रतीच्या अँटीऑक्सिडंट्स असलेल्या या बियांना आयुर्वेदात अत्यंत गुणकारी मानले जाते. स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलांमध्ये तिळाचे तेल (विशेषतः काळ्या तिळाचे तेल) उत्कृष्ट आहे. हे तेल त्यात शिजवलेल्या अन्नाचे गुणधर्म वाढवण्यास मदत करते. त्यामुळेच आयुर्वेदातील बहुतांश औषधे ही तिळाच्या तेलातच बनवली जातात. अत्यंत कमी पाण्यात किंवा दुष्काळी भागातही याचे पीक घेता येते. संपूर्ण भारतभर तिळाचा वापर केला जातो. याचे काळे, पांढरे, लाल असे तीन प्रकार आहेत. काळे तीळ औषधे बनवण्यासाठी तर पांढरे तीळ स्वयंपाकात वापरतात.

उत्तम प्रतीच्या प्रथिनांचे आगार असलेले हे तीळ हृदयाला चांगल्या दर्जाचे फॅट्स पुरवतात. यातील मॅग्नेशियममुळे रक्तातील साखर तसेच रक्तदाब काही प्रमाणात नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तीळ शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते. तिळातील जस्त (झिंक) मुळे त्वचा तजेलदार राहते, सुरकुत्या येत नाहीत. कर्करोगापासून दूर राहायचे असेल तर रोजच्या आहारात तिळाचा समावेश जरूर करावा.

. ज्येष्ठमध :  मुखवासामध्ये गोडवा येण्यासाठी ज्येष्ठमधाची पावडर वापरली जाते. ज्येष्ठमधामुळे श्वसनमर्गातील कफ कमी होऊन खोकल्याला आराम पडतो. आवाज बसला असल्यास ज्येष्ठमध मधातून चाटायला देतात.

. गुंजापान :  अत्यंत विषारी बिया असणाऱ्या या झाडाची पाने चिंचेच्या पानासारखी दिसतात. ही पाने चवीला अत्यंत गोड असतात. ही पाने सुकल्यावरही त्यांचा गोडवा
कायम राहतो. तोंडाला कोरड पडली असेल, तोंड आले असेल तर ही पाने चावून खावीत. याव्यतिरिक्त मुखवास तयार करताना त्यात भोपळ्याच्या बिया, अक्रोड, चारोळी,
खोबऱ्याचा कीस घालून तुम्ही तो अजून चविष्ट करू शकता. त्याला सुगंधी करण्यासाठी गावठी गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या, भीमसेनी कापूरही घालता येतो. चव वाढवण्यासाठी त्यात अल्प प्रमाणात अनारदाना, हिंग व सैंधव वापरता येते.

अशा प्रकारे आपल्या स्वयंपाक-घरातील रोजच्या वापराचे घटक घेऊन तुम्ही हा ‘मुखवास’ घरच्या घरी बनवू शकता. कृत्रिम रंग, वास, चवविरहित असलेला हा पदार्थ आबालवृद्धांसह सर्वजण खाऊ शकतात. योग्य त्या प्रमाणात फॅट्स, प्रथिने, फायबर, अत्यावश्यक अमिनो अॅसिड, अँटीऑक्सिडंट आणि खनिजे असलेला हा मुखवास म्हणजे एक ‘सुपर फूड’च म्हणावे लागेल.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. शर्मिला कुलकर्णी

(लेखिका प्रसिद्ध आयुर्वेदिक स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.