आमची पार्टी, पोपटी पार्टी!
सुमारे २५ वर्षांपूर्वीची गोष्ट.
मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ परिसरात काही गाड्या उभ्या होत्या. त्यातली एक लाल दिव्याची गाडी होती. तेव्हाच्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये काम करणारे काही पत्रकार तरुण एका टमटमवजा वाहनातून उतरले आणि त्या गाड्यांपाशी पोहोचले. एक युवक लाल दिव्याच्या गाडीत शिरला, बाकीचे मागच्या एका गाडीत शिरले आणि सगळ्या गाड्यांनी रायगड किल्ल्याच्या दिशेने कूच केली. लाल दिव्याच्या गाडीत विराजमान होते तेव्हाचे रायगडचे जिल्हाधकारी, ज्येष्ठ कादंबरीकार, पानिपतकार, महानायककार विश्वास पाटील व त्यांच्या गाडीत शिरलेला युवक होतो मी.
पाटलांच्या मांडीवर एक मोठे मडके होते आणि तोंडाची सतत हालचाल होत होती… गाडी सुरू होताच त्यांनी मडके पुढे केले आणि म्हणाले, ‘‘घे गड्या, मस्त डबल अंड्याची, मटणाची पोपटी आहे…’’
मी मडक्यात हात घातला, हाताला शेंगा लागल्या वालीच्या. मग अंडं (डबल अंडं म्हणजे एका अंड्यात दोन बलक असलेले अंडं… पाटलांचा कुणी मित्र सव्वा लाख ‘पक्षी’ बाळगून होता. एवढ्या कोंबड्यांच्या अंड्यांमध्ये बरीच डबल अंडी निघतात, ती खास मित्रांसाठी राखली जातात, हे बोलता बोलता समजले). ते काढून खाल्ले. मग मटणाचा तुकडा शोधला.
पाटलांना लक्षात आले, या गड्याला पोपटी काय ती माहितीच नाही… (मला दुसऱ्या गाडीतल्या मित्रांची चिंता लागून राहिली… त्या गाडीतही पोपटीचे मडके होतेच, पण हे काय आहे आणि कसे खायचे हे सांगायला विश्वास पाटील नव्हते)…
माझे पोपटीअज्ञान पाहून विश्वासराव सांगू लागले, ‘‘अरे, त्या वालीच्या शेंगा खा कोवळ्या कोवळ्या… काय सुंदर रस भरलेला असतो त्यांच्यात… दातानं टुचुक्कन् तोडलं की तोंड रसानं भरून जातंय बघ गड्या’’ पोपटीतला बटाटाही मस्त रसदार लागत होता.
त्या प्रवासात गप्पांपेक्षा आक्वहा दोघांची तोंडे त्याहून अधिक महत्त्वाचे काम करण्यात अधिक मग्न होती. पोपटी चाखण्याचे काम महत्त्वाचे… गप्पा काय कधीही छाटता येतात…
हा पोपटीशी झालेला पहिला परिचय… एका जातिवंत खवय्या, दर्दी, रसिक माणसाच्या मार्गदर्शनात… तीही अव्वल चवीची पोपटी…
पण, तो परिचय तिथेच संपला. रायगड जिल्ह्याशी काही नाते नव्हते. मित्रपरिवारातही तिकडचे फारसे कोणी नव्हते आणि मुळात तोवर पोपटीचा गवगवा झालेला नव्हता. पोपटी पार्टी चलनात आलेली नव्हती. तिकडच्या शेतकरी मंडळींचा घरगुती पदार्थ, यापलीकडे बाहेर कुणाला फारशी काही कल्पना नव्हती.
सोशल मीडियाच्या उदयानंतर हे चित्र पालटले. यू ट्यूबवर पोपटीच्या रेसिपी यायला लागल्या, फेसबुकवर पोपटी पार्टीच्या चर्चा व्हायला लागल्या, फोटो पडायला लागले. २०१५ साली ‘मी मराठी लाइव्ह’ या दैनिकाचा संपादक असताना एका सहकाऱ्याचे मूळ गाव होते, पाली. त्याचे कुणी काका मामा तिथल्या एका बंगल्याचे केअरटेकर होते. तो बंगला भाड्याने मिळतो आणि मामा एक नंबर पोपटी बनवतात, हे कळल्यावर काही मोजक्या मंडळींची पोपटी पार्टी ठरली आणि हे प्रकरण नेमके बनते कसे ते पाहायला मिळाले.
मुळात पोपटी बनवायची ती थंडीच्या दिवसांत, गावाकडे, शेतावर किंवा मोकळ्या परिसरात. थंडीच्या दिवसांत अशासाठी की पोपटीचे दोन सगळ्यात महत्त्वाचे घटक म्हणे भामरूटचा / भांबरूटचा (भांबुर्डीचा) पाला आणि कोवळ्या वालीच्या शेंगा… हे दोन्ही घटक याच सीझनमध्ये मिळतात. असे म्हणतात, की या काळात शेतावर पिकाच्या राखणीला जाणारे जागरणात गप्पाटप्पा व्हाव्यात आणि गरम, ताज्या भाज्यांचे, साधेसोपे अन्न मिळावे म्हणून ही पोपटी लावायचे… पोपटीसाठी तिसरी अत्यावश्यक गोष्ट म्हणजे मडके. हे आता पोपटी स्पेशलही मिळायला लागले आहे, जरा पातळ कवचाचे. स्वच्छ धुतलेल्या मडक्यात भांबुर्डीचा पाला आतून अस्तरासारखा लावायचा. त्यावर वालीच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, मटारच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा अशा ताज्या भाज्या धुवून टाकायच्या (यात श्रद्धेनुसार कांदे, बटाटे आणि इतर कंदही पडतात). मसाला टाकायचा (काही ठिकाणी कोरडा मसाला, तर काही ठिकाणी ठेचून बनवलेला हिरवा मसाला; गरम मसाला यात जात नाही, असे जाणकार सांगतात). खडे मीठ टाकायचे. परत भांबरुटाचा पाला भरून मडके गच्च करायचे आणि आग पेटवून तिच्यावर ते उलटे करायचे, ही पोपटीची बेसिक शाकाहारी पद्धत.
पोपटी भाजत असताना भोवती बसायचे. शेकोटीचा आनंद घ्यायचा. गप्पा मारायच्या. तीस-चाळीस मिनिटांत पोपटीचा सुगंध सुटतो आणि मग मडके सरळ करून ठेवले जाते… ते आपसूक थोडे गार झाले की एका मोठ्या पसरलेल्या फॉइलवर किंवा परातीत उपडे करायचे आणि त्याच्याभोवती गोल बसून ज्याच्या हाताला जे येईल ते चाखायचे.
सगळ्या वस्तू गोळा करण्यापासून तो पोपटी लावणे, जाळ पेटवणे, ती भाजणे असा सगळा कार्यक्रम होईपर्यंत तीन-चार तास सहज जातात आणि ती बनवण्यात सगळ्यांचे हात लागलेले असल्याने प्रत्येकालाच ती आपण बनवली आहे, असे वाटते आणि ती जरा जास्तच चविष्ट लागते. बिनातेलाचा स्वादिष्ट आणि हेल्दी प्रकार!
हल्ली अशी शाकाहारी पोपटी कमी प्रमाणात मिळते. सर्वात जास्त मिळते, ती चिकन पोपटी. यात बाकीचे घटक तेच, फक्त त्यात चिकनचे तुकडे चिरा देऊन मसाला चोळून टाकायचे. ते चांगले शिजले पाहिजेत आणि रसदारही राहिले पाहिजेत, हे पोपटी बनवणाऱ्याचे कौशल्य. मटणाची पोपटी हा आणखी पुढचा प्रकार. तो फारच कमी चाखायला मिळतो. यात उकडलेले मटण टाकावे लागत असणार, नाहीतर ते शिजेपर्यंत बाकीच्या भाज्यांचा कोळसा व्हायचा. मांसाहारी पोपटीमध्ये सहसा उकडलेली अंडीही टाकतात.
अलीकडे खाडीची पोपटी असा एक उपप्रकार रायगडच्या किनारी प्रदेशांत सुरू झालेला आहे. त्यात मडक्याऐवजी पत्र्याचा डबा वापरला जातो आणि त्यात भांबरुटाच्या पाल्याच्या दोन थरांमध्ये सगळ्या भाज्या आणि त्यांच्यावर फॉइल ठेवून मसाला लावलेल्या चिंबोऱ्या, फंटूस किंवा इतर मासा आणि मोठ्या आकाराच्या कोळंबी यांचे थर लावले जातात. पत्र्याच्या डब्यामुळे ही पोपटी थोडी लवकर होत असणार आणि मासे लुसलुशीत राहत असणार.
पोपटी रंगाच्या ताज्या आणि कोवळ्या शेंगा आणि तसाच कोवळा पाला यांचा वापर करून बनते ती पोपटी, अशी व्युत्पत्ती करायला हरकत नाही. भांबरुटाच्या पाल्याला एक फार छान सुगंध असतो. तो या वेगवेगळ्या चवीच्या भाज्यांना, मांसाला, त्यांच्यातल्या मसाल्यांना एकरूप करून देतो आणि एक खमंग चव देतो.
गंमत म्हणजे, थंडीच्या दिवसांत ताज्या कोवळ्या भाज्या एकत्र आणून उकडायच्या आणि गरमागरम खायच्या, हा उपक्रम पालघर परिसरातही चालतो. तिकडे याच सीझनमध्ये तिकडच्या सीझनल भाज्या – यात वालीच्या शेंगा असतातच, पण सगळ्या प्रकारचे कंदही असतात, कोवळी वांगी असतात, कोनफळ, बटाटे, नवलकोल, पातीचा कांदा, तूर, चणे यांच्या शेंगा अशा भाज्यांना तीळ, मसाले, ओला नारळ, कोथिंबीर, गरम मसाला, हळद वगैरेंबरोबर मडक्यात भरून शिजवले जाते. याला म्हणतात उकडहंडी!
ती बनवली, उघडली आणि तिचा वास दरवळला की आपल्या लक्षात येते, हा सुगंध आपल्या परिचयाचा आहे. चव चाखल्यावर कळते, हा तर उंधियू. बरोब्बर! पालघर जिल्हा गुजरातच्या सीमेवरचा आहे. तिथली ही सांस्कृतिक सरमिसळ. आता बाजारचा गुजराती उंधियू तेलात तरंगणाऱ्या भाज्यांसह मिळतो, पण मूळ उंधियूची कृती ही अशीच बिनतेलाची, उकडहांडीची. वसईच्या पट्ट्यात काही ठिकाणी हिला बांडीही म्हणतात म्हणे!
मुंबई परिसरात राहत असाल तर हिवाळ्याच्या दिवसांत वेगवेगळ्या रिसॉर्टवर पोपटी पार्ट्यांची रेलचेल असते. त्या मानाने पालघर भागात उकडहंडी हा अजूनही घरगुती किंवा मित्र-नातेवाइकांच्याच पातळीवर राहिलेला प्रकार आहे. अलीकडे उकडहंडी मडक्याऐवजी गॅसवर, पातेल्यात किंवा कुकरमध्येही बनवली जाते. तुमच्याकडे शहरात कुणी भांबरुटाचा पाला घरपोच आणून देणार असेल तर तुम्ही पोपटीही कुकरमध्ये बनवू शकताच. अर्थात, चव आणि अनुभव यांच्यात प्रचंड कॉम्प्रोमाइझची तयारी ठेवायची. कितीही काही केले तरी मडके, आग, गावचे पाणी, ओबडधोबड मसाले आणि कोवळ्या भाज्या यांची गंमत कुकर पोपटीत येणार नाहीच.
पोपटी पार्ट्यांच्या रूपाने जे कमर्शियलायझेशन झाले आहे. त्यात अनावश्यक जास्त पैसे मोजून फसगतही अनुभवायला येते. काही वेळा भाज्यांच्या आस्वादाच्या तुलनेत उकडलेल्या मांसाचे प्रमाण अधिक असते… सगळ्या स्वादांचे एकमेकांशी लग्न लागलेले नसते. काही ठिकाणी हा ‘चाखण्या’चा म्हणजे मद्यपानासोबत चाखण्याचा आयटम म्हणून खाल्ला जात असल्याने तो जास्त मसाले टाकून अतिरेकी मसालेदार केला जातो. त्यात मूळ भाज्यांच्या उकडलेल्या स्वादाची गंमत राहत नाही… पोपटी लावणारा तरबेज नसेल तर चिकनच्या लुसलुशीत तुकड्यांऐवजी जळलेले मांसाचे कोळसे खाण्याचीही वेळ येते. तुम्ही एखाद्या फार्महाऊसवर किंवा रिसॉर्टवर जा किंवा आपल्या गावच्या घरच्या आवारात किंवा आपल्या शेतात पोपटी पार्टी करा- कोणीतरी पोपटीची तयारी करतेय, कोणीतरी पोपटी लावतेय आणि आपण अर्धवट शुद्धीतल्या अवस्थेत नंतर ती फक्त खाणार आहोत, असा कार्यक्रम असेल, तर निम्मी मजा गेली…
पोपटीच्या कामाला घरातले सगळे, मित्रमंडळी, पोरेटोरेही सगळी जुंपली पाहिजेत… कोणी शेंगा धुतंय, कुणी चिकन धुतंय, कुणी अंडी उकडतंय, कुणी हिरवं वाटण बनवतंय, कुणी भांबरूटाचा पाला घेऊन येतंय, अशा सगळ्या तयाऱ्यांमध्ये सगळ्यांचा सहभाग पाहिजे… पोपटी लावताना मदतीला चार लोक पाहिजेत, काही चुकले तर ‘नुसते हसायला’ काही बिनकामाचे कुचाळ मित्रही पाहिजेत… कुणीतरी ज्येष्ठ नागरिकाने आपल्या काळातली पोपटी कशी असायची, याच्या रसभरित कहाण्या सांगितल्या पाहिजेत… पोपटीचे मडके भरेपर्यंत आता थोड्या वेळात भूक लागणार, अशी अवस्था व्हायला पाहिजे… पोपटी शेकोटीवर गेली की तिच्याभोवती काटक्या घेऊन ढोसायला सगळे उभे पाहिजेत, त्यांना दटावायला, पोपटी उपक्रम सुफळ संपूर्ण करणारा एक ‘पोपटी प्रमुख’ पाहिजे… पोपटीचा खमंग वास सुटला की किंवा तापल्या मडक्यावर पाण्याचा हबका मारताक्षणी त्याची वाफ झाली की पोपटी तयार झाली हे कळते… त्यानंतर ती पानात उलटेपर्यंत धीर धरवला नाही पाहिजे… आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पोपटी कितीही बनवली तरी ती पुरली नाही पाहिजे… अजून थोडी हवी होती, असे वाटले पाहिजे… पण गप्पांनी मात्र सगळ्यांची पोटे भरली पाहिजेत…
अशी साग्रसंगीत पार्टी जमवता आली तरच पोपटीची मजा…
कारण हा काही फक्त एक खाद्यपदार्थ नाही, हा एक सोहळा आहे… माणसांना एकत्र आणणारा… जोडणारा… पुढच्या पोपटी पार्टीची ओढ लावणारा!
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
– मुकेश माचकर
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)