मानसोपचारांची गरज आणि फायदे(मानसोपचार)
नोकरी, व्यवसाय, शिक्षणातले यश-अपयश, नातेसंबंधांतील गुंतागुंत अशा अनेक मानसिक ताणतणाव वाढविणाऱ्या समस्यांचा सामना आपल्यापैकी अनेक जण करत असतात. ताण वाढला की मग मधुमेह, उच्च रक्तदाब, मायग्रेन असे विविध आजार त्यांच्या पाठीशी कायमचे लागतात. अशा वेळी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी. मानसोपचारांच्या माध्यमातून विविध प्रकारचे मानसिक आजार आणि भावनिक समस्या दूर करण्यासाठी मदत मिळते.
पण त्याआधी मानसोपचार म्हणजे नेमके काय ते समजून घ्यायला हवे. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीतील व्याख्येनुसार ‘मानसिक पद्धतींनी मन किंवा व्यक्तिमत्त्वाच्या समस्यांवर उपचार करणे म्हणजे मानसोपचार.’ मानसोपचार वैयक्तिक पातळीवर करता येऊ शकतात किंवा जोडीवर, गटावर/समूहावर करता येतात. हे उपचार जसे समोरासमोर प्रत्यक्ष भेटून करता येतात तसेच ते अगदी फोन व इंटरनेटच्या माध्यमातूनही करता येऊ शकतात.
मानसोपचार तज्ज्ञाची भेट कधी घ्यावी?
१. भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण जात असेल तेव्हा मानसोपचार तज्ज्ञाची भेट घेऊन उपचार घ्यायला हवेत. आयुष्यात कधी ना कधी आपण दुःखी, चिंतातुर किंवा क्रोधित होत असतो आणि तसे होणे स्वाभाविक व सामान्य आहे. पण एखादी भावना दीर्घ काळासाठी असेल, त्यामुळे अनावर असे वर्तन आपणाकडून होत असेल किंवा भीती वाटत असेल आणि याचा दैनंदिन कामावर किंवा वाढीवर परिणाम होत असेल, तर अशा वेळी मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेणे हितावह असते.
२. कामाच्या ठिकाणी किंवा शाळेत तुमच्या क्षमतेनुसार कामगिरी होत नसेल, तर अशी मदत घ्यायला हवी. मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे लक्ष विचलित होते, एकाग्रता, स्मरणशक्ती, ऊर्जा यात कमतरता निर्माण होते. परिणामी, औदासीन्य येते, कामाच्या ठिकाणी मिळणारा आनंद कमी होतो किंवा काम करण्यास चालना मिळत नाही. कामातील स्वारस्य कमी होते आणि चुका होऊ लागतात. त्यामुळे उत्पादनक्षमता ढासळू लागते. याचा अतिरेक होऊन नैराश्य येऊ शकते.
३. मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे तुमच्या झोपेवर आणि भुकेवर परिणाम होतो. एखादी व्यक्ती चिंताग्रस्त असेल किंवा मानसिक संतुलन ढळलेले असेल तर त्यांना निद्रानाश होऊ शकतो, तर एखाद्याला नैराश्याने ग्रासले असेल तर ती व्यक्ती कायम झोपून राहू शकते. त्याचप्रमाणे खूप मानसिक ताण असेल तर काही जणांचे खाण्याचे प्रमाण वाढते, तर काही जण अत्यंत कमी खातात. त्यामुळे, तुम्ही बऱ्याच काळापासून नेहमीपेक्षा जास्त किंवा कमी खात असाल वा झोपत असल्याचे तुमच्या लक्षात आले तर तातडीने मानसोपचार तज्ज्ञाशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
४. तुम्हाला नाती निर्माण करणे आणि ती सांभाळणे कठीण जात असेल, आपल्या मानसिक आरोग्याचा आपल्या नात्यांवर विविध प्रकारे परिणाम होत असेल तर योग्य वेळी उपचार घ्यायला हवेत. मानसिक आजार असलेली व्यक्ती आपल्या जवळच्या व्यक्तींपासून दूर जाऊ शकते, नात्यांमध्ये असुरक्षितता निर्माण होऊ शकते किंवा भावनिक आधारासाठी दुसऱ्या व्यक्तीवर प्रमाणाबाहेर अवलंबून राहू शकते. समोरच्या व्यक्तीसोबत कायम वाद होत आहेत किंवा तुमच्या भावना व्यक्त करण्यात समस्या येत आहे असे वाटत असेल, तर मानसोपचारांनी फायदा होऊ शकतो.
५. तुमच्यावर मानसिक आघात झाला असेल, शारीरिक किंवा मानसिक शोषण किंवा एखाद्या आघाताला सामोरे जावे लागले असेल आणि त्यातून ती व्यक्ती पूर्णपणे बाहेर आलेली नसेल तर मानसोपचारांनी यावर आराम पडू शकतो.
६. मानसिक किंवा भावनिक समस्यांना सामोऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना अनेकदा आयुष्यापासून तुटलेपणा जाणवत असतो. परिणामी, त्यांना जी गोष्ट करण्यातून आधी आनंद मिळत असे तीच गोष्ट आता करताना आनंद होत नाही. उदा. एखादा छंद जोपासणे किंवा मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालविणे. अशा परिस्थितीत मानसोपचारांची मदत होऊ शकते.
७. तुम्ही दुःखात आहात- मग तो घटस्फोट असेल, एखाद्या जवळच्या व्यक्तीचा विरह असेल किंवा ती व्यक्ती कायमची सोडून गेली असेल; कोणत्याही प्रकारच्या दुःखावर मात करणे ही एक दीर्घ आणि वेदनादायक प्रक्रिया असू शकते. थेरपी किंवा समुपदेशनामुळे त्यातून लवकर बाहेर पडण्यास मदत होते.
८. ताणतणाव, चिंतातुरता आणि नैराश्यासारख्या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचा तुमच्या शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असतो. मानसिक समस्यांचा मध्यवर्ती चेता यंत्रणेवर परिणाम होत असतो. त्यामुळे अंतस्रावी, रोगप्रतिकारशक्ती, हृदयाच्या रक्तवाहिन्या, मेंदूतील रक्तवाहिन्या इत्यादींवर परिणाम होऊन आतड्यांमध्ये जळजळ होणे, मायग्रेन, सोरायसिससारखे आजार होतात. त्यामुळे डोकेदुखी, थकवा, स्नायूंमध्ये वेदना, हृदयात धडधड होणे, सततचे आजार, दीर्घ काळापासून असलेली सूज अशी लक्षणे दिसत असतील तर मानसोपचारांची मदत घेणे हितकारक ठरू शकते.
९. तुम्हाला स्वतःमध्ये सुधारणा करायची आहे, पण सुरुवात कुठून करायची ते समजत नाही. अशा वेळी मानसोपचार तज्ज्ञ तुमच्यातील सर्वोत्तम व्यक्तिमत्त्वास वाव मिळवून देऊ शकतात. तुम्ही अधिक चांगले व्हावे यासाठी नेमके काय करावे लागेल, हे समजून घेण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ तुम्हाला मदत करू शकतात.
१०. व्यसनमुक्तीसाठीही त्यांची मदत होते. जेव्हा एखादी व्यक्ती मानसिक किंवा भावनिक ताणाखाली असते तेव्हा ज्यातून काहीतरी आनंद मिळेल, बधीरपणा येईल किंवा लक्ष विचलित होईल असे काहीतरी करण्याकडे त्या व्यक्तीचा कल असतो. उदा. दारू, सेक्स आणि पॉर्नचा वापर करण्यात येतो. असे केल्याने हताशपणा, चिडचिड, नकारात्मक विचारांपासून तात्पुरता दिलासा मिळत असेल. पण दीर्घकालीन विचार केल्यास या गोष्टींवरील अवलंबत्व वाढते. मानसोपचारांचा उपयोग मानसिक समस्या आणि व्यसनमुक्ती अशा दोहोंसाठी होऊ शकतो.
आपल्या समाजात मानसोपचार घेण्याकडे फारसा कल दिसत नाही. डॉक्टर किंवा मनोविकृती तज्ज्ञांप्रमाणे यांना अजूनही मुख्य प्रवाहातील उपचार समजले जात नाही. मनोविकृतीतज्ज्ञ औषधे देतात, तर मानसोपचारतज्ज्ञ समुपदेशन करतात. जेव्हा रुग्णांना त्यांच्या समस्यांची जाणीव नसते म्हणजेच द्विमनस्कता यासारख्या (स्किझोफ्रेनिया) आजारांमध्ये मनोविकृती चिकित्सकांचे उपचार अधिक लाभदायी असतात. पण जेव्हा व्यक्तीला तिची समस्या माहीत असते, तेव्हा मानसोपचार पुरेसे असतात.
चांगला मानसोपचार तज्ज्ञ शोधण्याचे काही पर्याय:
१. आजूबाजूच्यांना विचारा॒: ताण येणे हे सामान्य आहे. अशा समस्येवर तुमच्या मित्रांनी किंवा नातेवाइकांनी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे आपल्या ओळखीच्या आणि विश्वासार्ह व्यक्तींकडून अशा एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाची शिफारस घ्या. तुम्ही आपल्या डॉक्टरां-कडूनही शिफारस घेऊ शकता. आयुर्वेद सत्ववजय हा एक प्राचीन मानसोपचार आहे. आता काही आयुर्वेदिक फिजि-शिअन्स ही थेरपी शिकले आहेत. या आधारे ते भावनिक समस्यांवर मात करण्यास मदत करू शकतात.
२. ऑनलाइन शोध घ्या॒: तुमच्या भागातील नामांकित मानसोपचार तज्ज्ञ शोधण्यासाठी ऑनलाइन सर्च करा. www.ayursattva.in या वेबसाइटवर आणि इतर स्थानिक संस्थांमध्ये ही माहिती मिळू शकेल. तुम्ही ऑनलाइन समुपदेशनाचा पर्यायही स्वीकारू शकता.
३. एक छोटीशी भेटवजा मुलाखत॒: मानसोपचार तज्ज्ञाला फोन करा आणि फोनवरूनच एक छोटीशी मुलाखत घ्या. कामाची वेळ, फी, लोकेशन याविषयी प्रश्न विचारून तुम्ही त्या मानसोपचार तज्ज्ञाचा अंदाज घेऊ शकता.
४. दोन मानसोपचार तज्ज्ञांनी सुरुवात करा. मानसोपचारांमध्ये मानसोपचार तज्ज्ञ आणि क्लाएंट यांचे परस्परांशी चांगले संबंध जुळणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे एकावर अवलंबून न राहता दोघांची नावे सुचविण्यास सांगा. याचा खर्च जरा जास्त होईल, पण यातून तुमच्यासाठी योग्य कोण याची तुम्हाला निवड करता येईल.
मानसोपचार तज्ज्ञाची निवड केल्यानंतर आणि समुपदेशन सत्र सुरू केल्यानंतर याचा फायदा होत आहे का, हे तपासून कसे पाहावे?
१. तुमच्यावरील मानसोपचार परिणामकारक व्हावेत असे वाटत असेल, तर तात्पुरता आराम पडणे अपेक्षित नाही तर तुमच्यात दीर्घकालीन बदल होणे अपेक्षित आहे. तुमच्यातील भावनिक प्रतिक्रिया किंवा गैरवर्तणूक यात थोडाफार तरी बदल होत असेल तर मानसोपचारांचा उपयोग होत आहे, असे समजावे.
२. जेव्हा रुग्ण (क्लाएंट) कोणतीही काळजी न करता किंवा मानसोपचार तज्ज्ञ क्लाएंटविषयी पूर्वग्रह तयार करतील याची भीड न बाळगता त्याची रहस्ये सांगेल तेव्हा क्लाएंट आणि थेरपिस्ट यांच्यातील नाते जवळकीचे आहे, असे समजावे. तसे होत असेल तर मानसोपचारांचा उपयोग होत आहे.
३. मानसोपचारांसाठी तुमचे नियोजन आणि ध्येय असणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया अनंत काळ चालणारी नसावी. भावनांना हाताळण्याचे कौशल्य तुम्ही आत्मसात केले पाहिजे आणि मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीविना तुम्हाला हे जमायला हवे.
४. मानसोपचारांचा उपयोग होत आहे, हे समजण्याचे संकेत खूपच सोपे आहेत. तुम्हाला मनातून चांगले वाटू लागते. तुम्ही पॅनिक अॅटॅक किंवा अँक्झायटी अॅटॅकवर उपचार घेत असाल तर त्यांची संख्या कमी होते. एका रात्रीत ते जाणार नाहीत. काही वेळा त्यात अपयश येणे हेसुद्धा सामान्य आहे. पण मानसोपचारांच्या माध्यमातून तुम्ही ज्या समस्या सोडवत आहात त्यांच्यामध्ये लक्षणीय कमतरता जाणवणे अपेक्षित आहे.
५. तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवायचा नसेल तर तीन किंवा चार महिन्यांमध्ये चिंतातुरता, नैराश्य कमी होणे अपेक्षित आहे. पण व्यक्तिमत्त्वातच काही आजार असेल, तर या प्रक्रियेला अनेक वर्षे लागू शकतात.
नात्यांमधील तणाव आणि भावनिक समस्या यात वाढ होत असताना तुम्ही मानसोपचाराची मदत घेणे टाळू नये. कुणीतरी आपल्याला हसेल या भयास्तव अशी भेट घेणे आजही अनेक जण टाळतात. पण मानसोपचार तज्ज्ञाची भेट घेणे हे एखाद्या सीएची किंवा कायदेतज्ज्ञाची मदत घेण्याइतके सर्वसामान्य आहे.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
डॉ. यश वेलणकर
(लेखक अनुभवी सायकोथेरपिस्ट आहेत.)