ई.एम.आय | EMI | Home Loam EMI | Personal Loan EMI | EMI Payment

ई.एम.आय.: एक जोखड | चंद्रशेखर ठाकूर | Know Everything About EMI | Equated monthly installment

 

संत तुकाराम महाराज पाचशे वर्षापूर्वी आर्थिक नियोजनाचा गुरुमंत्र अवघ्या आठ शब्दांत सांगून गेले आहेत. तो म्हणजे, “जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेच करी”. याचा अर्थ चांगल्या मार्गाने पैसा कमवावा आणि तो योग्य विचार करून, निरपेक्ष वृत्तीने खर्च करावा. तुकाराम महाराज खरोखरच द्रष्टे होते, कारण तेव्हापासूनच पाचशे वर्षांनंतर या भूमीवर क्रेडिट कार्ड, ई.एम.आय नावाचे एक ‘अस्वल’ धुमाकूळ घालणार आहे, हे त्यांना तेव्हाच दिसत असले पाहिजे !

माझ्या खिशात क्रेडिट कार्ड नावाचे अस्वल असतेहोय, अस्वलच ते ! फक्त गुदगुल्या करून हसवून मारणारे अस्वल !!! तर मी नको असलेली खरेदीसुद्धा करून घरी परतलो असतो, कारण क्रेडिट कार्डाद्वारे मी दुकानदाराला पैसे देऊ शकत होतो. म्हणजे आज फक्त खरेदी करायची व तब्बल चाळीस दिवसांत (किंवा अधिक) कधीही मी हे पैसे भरू शकत होतो. अगदी चाळिसाव्या दिवशी जरी पैसे भरले, तरी एक रुपया व्याज वैगरे द्यायला लागत नाही आणि इथेच अनावश्यक खरेदीला प्रारंभ होतो. क्रेडिट कार्ड वापरले असते, तर अर्थात त्या सामानाची किंमत माझ्या वतीने माझी बँक दुकानदाराला लगेच देत असते. ती किंमत माझ्याकडून माझी बँक ३९ दिवसांनंतर वसूल करणार इतकेच काय ते. मात्र काही कारणाने मी ती रक्कम चाळीस दिवसांत भरू शकलो नाही, तर प्रति दिन व्याजाची गणना सुरु होते, जी वर्षाला सुमारे तीस टक्के इतक्या घसघशीत दराने असते. तुकाराम महाराजांना अपेक्षित असलेला “उदास विचार” हा नव्हे.

पाचशे रुपये उत्पन्न असेल, तर त्यातले शंभर रुपये कर्ज काढून पाचशे अधिक शंभर म्हणजे सहाशे रुपये खर्च करतात. यालाच ‘ऋण काढून सण साजरा करणे’ असे म्हणतात !  .एम.आय म्हणजे easy monthly installment म्हणजेच सुलभ मासिक हप्ता जो म्हणतात, त्याचा उगम इथे होतो. घर घ्यायचे आहे, तर कर्ज काढणे (Home Loan) रास्त आहे, कारण आपल्याला कायमस्वरूपी त्या घरात राहायचे आहे. कुटुंबीयांसह सहलीसाठी जायचे असेल, तरी एक वेळ ई.एम.आय चा आसरा घेणे समजू शकतो, मात्र शेजाऱ्याकडे गाडी आहे म्हणून मीदेखील गाडी घेईन आणि दरमहा हप्ते भरत राहीन, ही वृत्ती आजकाल बोकाळली आहे. या वृत्तीतून क्रेडिट कार्डाचा जन्म होतो. सुलभ हप्ता म्हटले, तरी हा हप्ता सुलभ कधीच नसतो. कारण वर लिहिलेते व्याज हे चक्रवाढ पद्धतीने घेतले जात असल्याने त्याचा दर प्रत्यक्षात जास्तच पडतो, हे आपल्या लक्षातही येत नाही. अनेक वेळा तर असेही पाहण्यात येते, की एखाद्या जोडप्याकडे छोटीशी मारुती गाडी घेण्याइतके पैसे असतात. ते पैसे सात टक्के व्याजाने मुदत ठेव म्हणून बँकेत पडलेले असतात. मात्र त्या पैशातून गाडी न घेता १२ किंवा १३ टक्के व्याजाने बँकेकडून कर्ज (कार लोन) घ्यायचे, असा वेडेपणाचा व्यवहार केला जातो. कारण अनेकवेळा आपण ई.एम.आय भरतो आहे ही जणू काही प्रतिष्ठेची बाब समजली जाते.

या क्रेडिट कार्ड व मासिक सुलभ हप्त्याचे लाभार्थी खरेतर दुकानदार होत असतात कारण, ‘आपल्याला कुठे पैसे द्यायचेत’, या भावनेपोटी क्रेडिट कार्ड किंवा ई.एम.आय च्या माध्यमातून जास्तीत जास्त खरेदी करायला लोक उपयुक्त होत असतात. जेव्हा एखादी बँक क्रेडिट कार्ड देते तेव्हा त्याचबरोबर एक पत्रकही असते, ज्यात या संबंधीच्या अटी व नियम लिहिलेले असतात. मात्र हे सर्व वाचायचे म्हटले तर शक्य होत नाही, कारण ती अक्षरे इतकी बारीक असतात, की ती वाचता येत नाहीत. किंबहुना ते तुम्ही वाचू नये म्हणूनच ते इतके बारीक अक्षरात लिहिलेले असते,

आपल्याला क्रेडिट कार्ड देण्यात बँकेचाच अधिक फायदा होतो. म्हणून अनेकवेळा बँक आपण न मागताही कुरिअरने आपल्या घरी कार्ड पाठवून देते. व नकळत ते वापरण्याचा मोह आपणास होतो. आपण ते कार्ड वापरले नाही, तरी वार्षिक शुल्क आपल्या खात्यातून बँक वसूल करीत असते. त्यामुळे कार्ड नको असेल, तर तात्काळ ते परत करावे हे उत्तम.

आत्ता पैसे भरायचे नाहीत ना ? मग पाहू.” या मानसिकतेतून क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केली जाते. भले नंतर भरायचे असतील पण ते शेवटी आपल्यालाच भरायचे आहेत ना, हा विचार नको का करायला ? तात्पर्य हा भूलभुलैया बँका आणि दुकानदार यांनी उभा केला आहे आणि भाबडी, खर्चिक मनोवृत्तीची माणसे यात नकळत अडकतात. क्रेडिट कार्डच्या उलट स्थिती डेबिट कार्डच्या बाबतीत आहे. जेव्हा आपण डेबिट कार्डाद्वारे खरेदी करित असतो, तेव्हा आपल्या बँक खात्यातून तात्काळ पैसे वजा होत असतात.

क्रेडिट कार्डच्या वापरानंतर ठराविक वेळेत पैसे भरले नाही, तर बँक रग्गड पैसे व्याजरूपाने वसूल करते हे आपण पाहिलेच. पण त्याहीपेक्षा गंभीर आणि ध्यानात येण्याजोगी गोष्ट म्हणजे दीर्घ काळ आपण पैसे भरू शकलो नाही, तर वसुली करणारी बँकेची माणसे आपल्या घरी किंवा थेट कार्यालयातदेखील येऊन पोहोचतात व आपल्या अब्रूचे धिंडवडे निघतात. काही लोकांच्या खिशात आठदहा बँकांची क्रेडिट कार्ड दिसून येतात. हे एक प्रकारे व्यसनच आहे, कारण तितक्या बँकांतून खरेदी होणार आणि खर्चाचा बोजा तितका वाढणार. ही सगळी चंगळवादी जीवनशैली आपण पाश्चात्य लोकांकडून शिकलो, अन्यथा ‘अंथरूण पाहून पाय पसरावेत’, अशी आपली जीवनशैली होती. तात्पर्य, क्रेडिट कार्ड म्हणजेच ई.एम.आय हा शेवटचा पर्याय असावा, ती जीवनशैली असू नये !

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


चंद्रशेखर ठाकूर

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.